महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय कोलांटउड्यांचा मतदारांना उबग

By किरण अग्रवाल | Published: October 22, 2019 09:49 PM2019-10-22T21:49:50+5:302019-10-22T22:17:15+5:30

मतदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून गृहीत धरले जात असले, तरी मतदार आता सुज्ञ झाला आहे व तो राजकारणात वाढीस लागलेल्या अनिष्ट तडजोडी तसेच प्रकारांबद्दल चीड व्यक्त करताना दिसत आहे

Maharashtra Election 2019 voting percentage decreases due to leaders change political parties ahead of election | महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय कोलांटउड्यांचा मतदारांना उबग

महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय कोलांटउड्यांचा मतदारांना उबग

Next

- किरण अग्रवाल

मतदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून गृहीत धरले जात असले, तरी मतदार आता सुज्ञ झाला आहे व तो राजकारणात वाढीस लागलेल्या अनिष्ट तडजोडी तसेच प्रकारांबद्दल चीड व्यक्त करताना दिसत असून, त्यातूनच त्याच्या मनात निवडणुकीबाबत नकारात्मकता वाढीस लागली आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांत मतदानाचा टक्का घटला असल्याचे म्हणता यावे.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जे मतदान झाले त्यात जागोजागी मतदानाचे प्रमाण घसरल्याचे लक्षात आले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असताना असे घडून आले आहे. निवडणूक ही कोणतीही असो, त्याकडे लोकशाहीचा उत्सव म्हणून बघितले जाते. या उत्सवात सर्वच मतदारांनी सहभागी होण्याची अपेक्षा केली जात असते. बऱ्याचदा मतदार व्यवस्थेला दोष देताना दिसतात. परंतु ही व्यवस्था सुधारण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करताना दिसत नाही. त्यामुळे शासनाबरोबरच सामाजिक संस्थाही निवडणुकांच्या तोंडावर मतदान जागृतीच्या मोहिमा राबवताना दिसतात. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच ठिकाणी अशी जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात केली गेली होती. ठिकठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांची शुद्धीकरण मोहीम राबविताना दुबार नोंदणीकृत व मयत मतदारांची नावे वगळल्याने मतदार संख्येची जाणवणारी सूज कमी झाली होती. याखेरीज नवमतदारांच्या नोंदणीला संपूर्ण राज्यातच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एकट्या नाशिक जिल्ह्याची आकडेवारी द्यायची तर सुमारे २४ हजार तरुणांना या निवडणुकीत पहिल्यांदा आपला मताधिकार बजवायची संधी मिळाली होती. महिला मतदारांचीही संख्या पुरुषांच्या जवळपास बरोबरीने होती. तरुण व महिला आता स्वयंप्रज्ञेने विचार करू लागल्याने ते मतदानासाठी हिरिरीने बाहेर पडल्याचे दिसूनही येत होते. तरी टक्का घसरलेला दिसून आला.

विशेष म्हणजे, मतदानाबद्दल अधिकचे स्वारस्य जागविण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. दिव्यांग मतदारांसाठी ने-आणची व्यवस्था करतानाच मतदान केंद्रांवर व्हीलचेअर व मदतनिसांची खास व्यवस्था करण्यात आली होती. लेकुरवाळ्या मातांसाठी काही मतदान केंद्रांवर पाळण्याची व्यवस्थादेखील ठेवण्यात आली होती. पाण्यापासून ते प्रथमोपचारापर्यंत काळजी घेतानाच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एकेक सखी मतदान केंद्र साकारून तेथील सूत्रे संपूर्णत: महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती. गुलाबी फुग्यांनी व आकर्षक रांगोळ्यांनी अशी केंद्रे सजविली गेली होती. सदर शासकीय प्रयत्नांखेरीज काही व्यावसायिक आस्थापनांनीही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आपल्याकडील चीजवस्तूंच्या विक्रीसाठी सवलतींच्या व बक्षिसांच्या योजना घोषित केल्या होत्या. काही ग्रामपंचायतींनी फुलांच्या माळा व तोरण वगैरे बांधून तसेच आलेल्या प्रत्येक मतदारास गुलाबपुष्प देऊन स्वागत केलेलेही दिसून आले. हे सारे कशासाठी केले गेले, तर मतदानाचे प्रमाण वाढून लोकशाही व्यवस्था अधिक सुदृढ व्हावी व ती वर्धिष्णू ठरावी म्हणून. पण तरीदेखील अपवाद वगळता अनेक ठिकाणी गेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झालेले दिसून आले.

का झाले असावे असे? याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, राजकारणात तत्त्व व निष्ठांना तिलांजली देत निडरपणे ज्या तडजोडी केल्या जाताना दिसून येत आहेत त्यामुळे असे झाले असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बोलून दाखविली जात आहे. यंदा तर घाऊक पद्धतीने पक्षांतरे झाल्याने मतदारांच्या मनात त्याबद्दलची एक नकारात्मकता निर्माण झाली. सत्तेची संधी घेतानाच सत्तेच्या वळचणीला जाऊन आपल्या अयोग्य व्यवहाराला संरक्षण मिळवू पाहण्याचा यामागील हेतू न जाणण्याइतपत मतदार आता अशिक्षित राहिले नाहीत. शिवाय जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या आदल्या रात्री होणारे लक्ष्मीदर्शनाचे कथित प्रकारही सुज्ञांना अस्वस्थ करणारे ठरले आहेत. या एकूणच वाढत्या प्रकारात आपल्या मताचा उपयोगच न राहिल्याची भावना बळावल्यानेच की काय, मतदानाकडे पाठ फिरवली गेली असावी. त्यातूनच मतदानाचा टक्का घसरला. बरे, हे काही दोन-चार मतदारसंघांत झाले असे नाही. नाशिक जिल्ह्याचे उदाहरण द्यायचे तर १५ पैकी तब्बल १२ मतदारसंघांत हा टक्का घसरला आहे. छगन भुजबळ पुत्र पंकज उमेदवारी करीत असलेल्या नांदगाव मतदारसंघात तब्बल ७ टक्क्यांपेक्षा अधिकने मतदान घसरले आहे. तर सिन्नरमध्ये ५ टक्क्यांपेक्षा अधिकने ग्राफ खाली आला आहे. जिल्ह्यात ज्या तीन मतदारसंघांत मतदान वाढले त्यात निफाडची वाढ ही २ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अन्य कळवण व देवळा या दोन्ही मतदारसंघांतील मतदानाची वाढ ही एक टक्क्याच्या आतच म्हणजे अंशत: म्हणावी अशी आहे. एकूणच बहुसंख्य मतदारसंघांत घटलेले मतदानाचे प्रमाण पाहता त्याचा निकालावर काय परिणाम होईल व कुणाची जय-पराजयाची गणिते कशी सुटतील हा भाग वेगळा, परंतु मतदारांचा जो निरुत्साह यानिमित्ताने समोर येऊन गेला आहे आणि त्यामागील जी कारणे गृहीत धरता येणारी आहेत ती चिंता बाळगून चिंतन करावयास भाग पाडणारीच आहे हे नक्की.  
 

Web Title: Maharashtra Election 2019 voting percentage decreases due to leaders change political parties ahead of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.