उधळीत ये रे गुलाल, मित्रा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:06 IST2026-01-01T11:04:55+5:302026-01-01T11:06:28+5:30
या नव्या वर्षात जन्म घेणारी जगातील जवळपास ७५ टक्के बालके एकविसाव्या शतकातील पाऊण भाग अनुभवून थेट बाविसावे शतक पाहू शकतील. होय, लोकसंख्या शास्त्रानुसार आता जगाचे सरासरी आयुष्यमान पंचाहत्तर वर्षांच्या पुढे गेले आहे.

उधळीत ये रे गुलाल, मित्रा...
गुरुवारी सकाळची तांबूस सूर्यकिरणे पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रमाक्रमाने पृथ्वीचा एकेक भाग पादाक्रांत करीत येतील, आपली प्रिय वसुंधरा नववर्षाच्या पहिल्या सूर्यकिरणांनी न्हाऊन निघेल, तेव्हा एक अद्भुत घडेल. या नव्या वर्षात जन्म घेणारी जगातील जवळपास ७५ टक्के बालके एकविसाव्या शतकातील पाऊण भाग अनुभवून थेट बाविसावे शतक पाहू शकतील. होय, लोकसंख्या शास्त्रानुसार आता जगाचे सरासरी आयुष्यमान पंचाहत्तर वर्षांच्या पुढे गेले आहे. अवघ्या ४०-५० वर्षे आयुष्यमानाच्या आफ्रिकेतील सब-सहारा टापूसह त्या खंडातील बहुतेक भाग आणि पश्चिम व दक्षिण आशियातील काही गरीब देश वगळता, जगातील बहुतेक देशांचे सरासरी आयुर्मान आता ऐंशीच्या घरात आहे. परिणामी, जगातील बहुसंख्य लोक बाविसावे शतक पाहण्याचे स्वप्न बाळगू शकतात. अर्थात, केवळ त्यावर विसंबून राहायला नको. कदाचित पुढच्या काही दशकांमध्ये माणूस मृत्यूवर मात करण्याच्या ध्येयाच्या जवळ जाऊ शकेल.
जीवघेण्या आजारांवर, असाध्य रोगांवर उपचार निघतील आणि जणू चमत्कार घडेल. मग या इतक्या मोठ्या आयुष्याचे करायचे काय? तर उत्तर सोपे आहे, आनंदात जगायचे. मावळत्या वर्षातील सगळ्या कडू आठवणी पाठीवर टाकायच्या. अहमदाबादचा भयंकर विमान अपघात विसरायचा. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी विसरायची. असे वाईट काही मनाच्या खोल तळावर टिकूच द्यायचे नाही. दहशतवाद्यांचा पहलगाममधील अमानवी हल्ला किंवा दिल्लीतील स्फोट पूर्णपणे विसरायचे नाहीत, तर त्यातून धडा घ्यायचा. सामान्यांच्या रक्षणाची व्यवस्था चाकचाैबंद करायची. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या. पुन्हा ऑपरेशन सिंदूरची गरजच भासणार नाही, याची तजवीज करायची. जेणेकरून सरकार, समाज वगैरेंची सारी व्यवस्था दीनदुबळ्यांच्या आयुष्यात उजेडाची पेरणी करण्यासाठी वापरता येईल. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या पोटात सकाळ-संध्याकाळी सुखाचे चार घास घालता येतील. पुन्हा कोण्या शेतकऱ्याला सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी मूत्रपिंड विकायची वेळ येणार नाही.
दमड्यांची ददात कुणाच्या आयुष्याची दैना करणार नाही. होतकरूंना शिक्षण व बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल. पोरीबाळी सुरक्षित ठेवता येतील. दुर्गम, डोंगराळ भागातल्या बायाबापड्यांना आरोग्यसेवा पुरविता येतील. दवाखान्यापर्यंत गचके खात जाणारी त्यांची बांबूची झोळी किंवा खाटेची जागा एखादी सुसज्ज रुग्णवाहिका घेईल, अशी व्यवस्था करता येईल. शहरे-गावे-खेड्यांमधील शाळा गजबजतील, चिमुकल्यांच्या किलबिलाटाने पाखरांची दैना उडेल, असे काहीतरी करता येईल. हे असेच व्हायला हवे ना. कारण, अपघात-दुर्घटना, हिंसाचार-रक्तपात व आक्रोशाच्या लाटेत आपली मने चिणून गेली आहेत. काळीज उदास व मेंदू बधीर झाले आहेत.
सुख-समाधान, आनंदासाठी प्रत्येकजण व्याकूळ आहे. अमूल्य असे मानवी जीवन वाट्याला येऊनही जगण्यातला आनंद, आप्तमित्रांशी संवाद, आयुष्यातील गोडवा, असे सारे काही हरवले आहे. म्हणून मग आपण कसल्यातरी पडद्यावरच आनंद शोधायचा प्रयत्न करतो. व्यक्ती ते करतेच, समष्टीचेही असेच आहे. मुला-मुलींनी क्रिकेटचे जगज्जेतेपद जिंकल्यानंतर सामूहिक आनंद होतो. आपण जल्लोष करतो. फटाके फोडतो. एखादा सिनेमा एकाचवेळी व्यक्ती व समूहाचे रंजन करतो, आल्हाद देऊन जातो. हा आनंद, आल्हाद, मोद नव्या वर्षाचा आधार व्हायला हवा. दु:ख वाटल्याने जसे कमी होते, तसा आनंद वाटल्याने वाढतो.
म्हणून वैयक्तिक जीवनातील आनंदाचे क्षण वेचता व वाटता यायला हवेत. आनंद सापेक्ष असतो, म्हणून आपण स्वत:च ती सापेक्षता बनायचे असते. नव्या वर्षात हे समाजाशी, समूहाशी, समष्टीशी सापेक्ष बनण्याची संधी ठरावेत असे अनेक क्षण आयुष्यात येणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप देतानाच आपल्या प्रिय भारतदेशाची अर्थव्यवस्था जपानला मागे ढकलून चाैथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आयुष्याचे सोने व जगण्याची चांदी तेजीत आहे. जागतिक व्यापाराची स्पर्धा आपण जिंकतो आहोत.
अमेरिकन स्वप्नाचा आधार असा एचवन-बी व्हिसाचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे. फुटबाॅल, क्रिकेटच्या जागतिक स्पर्धा होणार आहेत. नवे चित्रपट येणार आहेत. कला-क्रीडा-संस्कृतीच्या क्षेत्रात नवनिर्मितीचे अनेक प्रयोग होणार आहेत. मराठी माणसांसाठी नव्या वर्षाची सुरुवात साहित्य संमेलनाने होत आहे. आता तुम्ही म्हणाल, यात मनोरंजन कुठे आहे? तर आता महापालिका व नंतर जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये ती कमतरता राहणार नाही, याची काळजी आपले राजकारणी घेतच आहेत ना..!