आजचा अग्रलेख: गृहकलह चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:24 IST2025-11-18T11:23:30+5:302025-11-18T11:24:20+5:30
कौटुंबिक नाती ही काचेच्या भांड्यासारखी असतात. तडा गेला की पुन्हा सांधता येत नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत लालुप्रसाद यादव यांच्या राजदचा दारुण पराभव झाला आणि यादव कुटुंबातील यादवी चव्हाट्यावर आली.

आजचा अग्रलेख: गृहकलह चव्हाट्यावर
कौटुंबिक नाती ही काचेच्या भांड्यासारखी असतात. तडा गेला की पुन्हा सांधता येत नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत लालुप्रसाद यादव यांच्या राजदचा दारुण पराभव झाला आणि यादव कुटुंबातील यादवी चव्हाट्यावर आली. लालूंची कन्या रोहिणी आचार्य हिने राजदची धुरा सांभाळणाऱ्या तेजस्वी यादव व त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आणि घर सोडले. अन्य तीन मुलींनीही लगोलग घर सोडले. लालूंचा दुसरा पुत्र तेजप्रताप यापूर्वीच कौटुंबिक व राजकीयदृष्ट्या विभक्त झाला आहे.
राजदचा संपूर्ण ताबा तेजस्वीने घेतला आहे. तेजस्वी यांचे खासगी सचिव राहिलेले संजय यादव यांचाच तिकीटवाटपावर या वेळी वरचष्मा होता. दुसरे आहेत महंमद रेमज. रेमज व तेजस्वी यांचा परिचय क्रिकेट खेळताना मैदानावर झाला. रेमज यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप आहेत. रेमज यांनी निवडणुकीची सर्व रणनीती आखली होती. तिसरे आहेत रेचल यादव. हे रेचल तेजस्वी यांचे नातलग. निवडणूक प्रचारात तेजस्वी यांच्यासोबत सावलीसारखे होते. रोहिणी सिंगापूरमध्ये वास्तव्याला असतात. वडिलांच्या पक्षाच्या प्रचाराकरिता त्या भारतात आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की, ठिकठिकाणी लागलेल्या प्रचारांच्या बॅनरवरून पक्षाचे संस्थापक लालुप्रसाद यादव यांचीच छबी गायब आहे.
तेजस्वी यांचा चेहरा दाखवून मते मागितली जात आहेत. ही बाब खटकली असतानाही त्यांनी प्रचार केला. मात्र निकालानंतर न राहवून त्यांनी या पराभवाची जबाबदारी तेजस्वी आणि त्यांच्या भोवतीची चौकडी स्वीकारणार का, असा सवाल केला. त्यामुळे पारा चढलेल्या तेजस्वी यांनी चप्पल उगारल्याचा आरोप रोहिणी यांनी केला आहे. या निवडणुकीत लालूंचे दुसरे पुत्र तेजप्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दलाच्या वतीने काही उमेदवार उभे केले होते. ते पराभूत झाले. तेजप्रताप यांना अलीकडेच नितीश सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली. आता भाजप तेजप्रताप यांना पंखाखाली घेऊन तेजस्वी यांच्या विरोधात उभे करणार याचे स्पष्ट संकेत आहेत. बिहारमधील अन्य नेते रामविलास पासवान यांच्या आजारपणात त्यांचे पुत्र चिराग व बंधू पशुपतीकुमार पारस यांच्यातील संघर्ष उफाळून आला. चिराग यांनी पारस यांना रामविलास यांना भेटूही दिले नव्हते. भाजपने पासवान कुटुंबातील या मनभेदाचाही खुबीने वापर करून घेतला.
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव व राज या दोन भावांत वितुष्ट आले. परस्परांनी अत्यंत तिखट शब्दांत एकमेकांवर हल्ले केले. आता अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यावर दोघांनी परस्परांशी हातमिळवणी केली आहे. या दोघांना राजकीय यश लाभले तरच ते बरोबर राहतील, अन्यथा परस्परांवर आरोप करून पुन्हा विभक्त होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळता येत नाही. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे बीडमधील राजकारण त्यांचे पुतणे धनंजय हेच सांभाळत होते. राजकीय वारस म्हणून पंकजा यांचा उदय झाल्यावर संघर्षाची ठिणगी पडली. या बहीण-भावांनी एकमेकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची एकही संधी सोडली नाही. प्रमोद महाजन यांची हत्या होऊन इतकी वर्षे उलटली. त्यांच्या हत्येच्या कारणांवरून त्यांचे या हत्या प्रकरणातील आरोपी राहिलेले दिवंगत बंधू प्रवीण यांच्या पत्नी सारंगी व महाजनांचे दुसरे बंधू प्रकाश यांच्यात काही दिवसांपूर्वी ‘तू तू मै मै’ झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांना आमनेसामने उभे राहिलेले महाराष्ट्राने पाहिले. अंबानींपासून लोढांपर्यंत अनेक उद्योगपतींच्या कुटुंबातील संघर्ष तीव्र झाल्याचे व अगदी कोर्टकज्जे झाल्याचे पाहण्यात आले. सत्ता व पैसा असलेल्या सर्वच कुटुंबांत संघर्षाची ठिणगी पडते ती ‘वारस कोण?’ यावरून. सत्तेच्या पदावर गेलेल्या व्यक्तीला ‘व्यवस्था’ राबवण्याकरिता चौकडी लागते. याच चौकडीतील मतलबी लोक मग नेत्याच्या असहायतेचा लाभ उठवतात. त्यांना विरोध करणाऱ्यांबद्दल नेत्यांचे कान भरतात. हलक्या कानाचे नेते चौकडीच्या सल्ल्याने कारभार करतात. चौकडीच्या सल्ल्याने केलेली सत्ता आणि संपत्तीची वाटणी पक्षपाती झाल्यावर कलह सुरू होतो. राजकारणात अगोदरच अनेक वैरी तयार केलेले असतात. ते अशा संधीची वाट पाहत असतात. अनेकदा कष्टाने उभारलेली राजकीय, औद्योगिक साम्राज्ये ढासळतात. राबडी देवींपासून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या ‘महाराणी’ वेबसिरीजच्या चौथ्या भागात कौटुंबिक कलहाचा सामना करणारी राणी भारती स्क्रीनवर दिसत असताना रिअल लाइफमध्ये राबडींच्या कुटुंबात तेच व्हावे हाही योगायोगच!