‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:07 IST2025-04-20T12:03:42+5:302025-04-20T12:07:16+5:30
AI Emotional Support: वेळेचा अभाव, समाजातील मानसिक आरोग्याबाबत असलेली कुजलेली धारणा, आणि वैयक्तिक गोष्टी कोणाशी शेअर करायच्या या संकोचामुळे अनेकदा लोक मानसिक त्रास सहन करत राहतात.

‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
-डॉ. अमेय पांगारकर, एआय तज्ज्ञ
आजच्या जगात तंत्रज्ञान हे आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये प्रवेश करत आहे, मग ते शिक्षण असो, आरोग्य असो की मानसिक आधार. आजकाल नैराश्य, एकाकीपणा, चिंता, तणाव यासारख्या मानसिक आजारांबाबत जागरूकता वाढली असली, तरी अजूनही अनेक लोक मानसोपचारतज्ज्ञांपर्यंत पोहोचत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दर एक लाख लोकांमागे ७५० मानसोपचारतज्ज्ञ आहेत.
वेळेचा अभाव, समाजातील मानसिक आरोग्याबाबत असलेली कुजलेली धारणा, आणि वैयक्तिक गोष्टी कोणाशी शेअर करायच्या या संकोचामुळे अनेकदा लोक मानसिक त्रास सहन करत राहतात. अशावेळी एक नवीन दिशा म्हणून लोक ‘एआय थेरपी’चा आधार घेऊ लागले आहेत.
एआय थेरपी ही २०१६-१७ नंतर विशेष चर्चेत आली. आता एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यासारखे विचार करणारे, बोलणारे, आणि संवाद साधणारे सॉफ्टवेअर. ‘एआय थेरपी’ म्हणजे एआय आधारित सिस्टीम वापरून वापरकर्त्याचे संवाद घेणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे, भावनिक आधार देणे आणि शक्य असल्यास योग्य उपाय सुचवणे.
चॅट-जीपीटी, वोबोट, व्यासा यासारखे एआय आधारित चॅटबॉट्ससारखी मॉडेल्स व्यक्तीच्या विचारांवर प्रतिक्रिया देतात, प्रश्न विचारतात, सल्ला देतात किंवा केवळ ऐकून घेतात – जसे एक मानसोपचारतज्ज्ञ करतात. ते संवाद साधतात, समजून घेतात, सल्ला देतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते “ऐकतात”.
रात्री दोन- अडीच वाजता जागे आहात? कोणाशीतरी बोलावं वाटतंय? तुम्हाला वाटतं की तुम्ही कोणाला सांगू शकत नाही, अशावेळी कोणी नसेल तरी चॅट-जीपीटी आहेच. एआय हे तंत्रज्ञान २४/७ उपलब्ध असतं.
कधीही, कुठेही, कोणत्याही अडचणीच्या क्षणी आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करता येतो. बऱ्याचदा मानसोपचारकांची फी ही सर्वसामान्य माणसांना परवडणारी नसते आणि आपण काही शेअर केलं तर आपल्याला कोणी जज करेल, ही भीती असतेच! एआय कधीही जज करत नाही – त्यामुळे लोक मोकळेपणाने बोलू शकतात.
खरंच एआय समजून घेतं का?
माणूस आणि एआय यामध्ये एक मूलभूत फरक आहे – ‘भावना’. एआय काहीही, आपल्याला हव्या त्या वेळी समजून घेतो, पण तो ‘अनुभव’ करत नाही. त्यामुळे एखाद्याचं दुःख ‘समजून घेणं’ हे एआय करू शकत नाही.
एआयचा ‘समजणं’ किंवा समजावून सांगणं हा तुम्ही दिलेल्या डेटावर आधारित प्रतिसाद आहे – अनुभवावर नाही. तो कधीच माणसासारखा तुमच्या आवाजातल्या कंपनातून, डोळ्यातल्या अश्रूंमधून भावना ओळखू शकत नाही. एआयचं ‘ऐकणं’ हे प्रभावी असलं, तरी त्यात माणसाची मायेची ऊब असणं शक्य नाही.
एआय थेरपी ही कधीच मानसोपचारकांचा पर्याय होऊ शकत नाही. पण ती एखाद्या व्यक्तीला बोलतं करण्यासाठी सहायक माध्यम ठरू शकते.
मानसिक आरोग्याची सुरुवात ही संवादातून होते, आणि चॅट-जीपीटी किंवा इतर एआय सिस्टीममुळे एखादी व्यक्ती पहिल्यांदा मोकळेपणाने बोलू लागली, तर ते सकारात्मक पाऊल नक्कीच ठरू शकतं. एआय थेरपी ही एक सकारात्मक पाऊल आहे; पण ती एकटी पुरेशी नाही.
आपल्या भावनांना वाचा फोडण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि खरं ऐकण्यासाठी अजूनही ‘माणूसपण’च हवं असतं. म्हणूनच, एआय थेरपीला सहयात्रीसारखं म्हणून पाहायला हवं – अंतिम पर्याय म्हणून नव्हे. एआयला हाताशी धरून, पण माणुसकीला हृदयाशी धरून मानसिक आरोग्य उत्तम ठेवूया..!!