मंगळावरील जीवन : मानवी उत्सुकतेला नवे पंख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 07:25 IST2025-09-29T07:25:23+5:302025-09-29T07:25:48+5:30
नासाने नुकतीच एक घोषणा केली आहे. त्यामुळे मंगळावर कधीकाळी खरेच जीवन होते का आणि मंगळावर माणूस घर करेल का, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

मंगळावरील जीवन : मानवी उत्सुकतेला नवे पंख!
साधना शंकर
लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी
मंगळाच्या लालसर धुळीच्या पृष्ठभागावर काही जैव चिन्हे शांतपणे पडून आहेत. हे साधे नमुने नाहीत, तर ‘पर्सिव्हरन्स’ या नासाने २०२१मध्ये पाठवलेल्या रोव्हरने गोळा केलेले मौल्यवान नमुने आहेत. या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट होते, जीवनाचे चिन्ह शोधणे. एक दिवस हे नमुने पृथ्वीवर परत आणले जातील आणि कदाचित मानवजातीच्या सर्वात जुन्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, ‘आपण या विश्वात एकटे आहोत का?’
यंदाच्या सप्टेंबर महिन्यात नासाने एक थरारक घोषणा केली. पर्सिव्हरन्सने मंगळावरील एका खडकात ‘संभाव्य जैवस्वाक्षरी’ (potential biosignature) सापडल्याचे निदर्शनास आणले. हे जीवनाचे ठोस पुरावे नाहीत. पण, या शोधामुळे उत्सुकतेला नवे पंख फुटले आहेत.
आज आपण मंगळाला पाहतो तेव्हा तो कोरडा, थंड आणि जीवनविहीन ग्रह दिसतो. पण, अब्जावधी वर्षांपूर्वी त्याचे रूप वेगळे होते, असे वैज्ञानिक मानतात. त्याकाळी मंगळावर दाट वातावरण आणि पाण्याचे साठे होते. म्हणजेच जीवन फुलण्यासाठी आवश्यक अट पूर्ण होत होती. म्हणूनच पर्सिव्हरन्स गेली चार वर्षे ‘जेझेरो क्रेटर’ नावाच्या प्रदेशात शोध घेत आहे. ही एक प्राचीन सरोवराची खळगी मानली जाते, जिथे कधी नदी वाहत होती. गेल्यावर्षी, या खळगीच्या तळाशी असलेल्या दरीत रोव्हरने सुमारे ३.५ अब्ज वर्षे जुन्या खडकांचे रासायनिक विश्लेषण तिथल्या तिथे करून त्याची माहिती पृथ्वीवर पाठवली.
यातील एक नमुना विशेष लक्षवेधी ठरला. त्याला ‘सॅफायर कॅनियन’ असे टोपणनाव दिले गेले असून, तो ‘चयावा फॉल्स’ नावाच्या ठिकाणी मिळाला. या खडकात माती व गाळाचे थर होते, जे पृथ्वीवर सहसा जीवाश्म जतन करण्यात उपयुक्त ठरतात. याशिवाय या खडकांवर आढळलेली चित्त्याच्या ठिपक्यांसारखी रचना संशोधकांना अधिकच आश्चर्यचकीत करून गेली. हे ठिपके सूक्ष्मजीवांशी संबंधित रासायनिक क्रियांमुळे तयार झाले असावेत, असा त्यांचा अंदाज आहे. म्हणूनच या शोधामुळे उत्साह आणि महत्त्व निर्माण झाले आहे.
तथापि, या जैवस्वाक्षरीचे खरे प्रमाण फक्त ते नमुने पृथ्वीवर आणल्यानंतरच मिळेल. तो एक अतिशय अवघड व खर्चीक उपक्रम आहे. नासा व युरोपियन स्पेस एजन्सीने स्वतंत्र ‘मार्स सॅम्पल रिटर्न मिशन’ जाहीर केले आहे. परंतु, त्यांचा कालावधी अजून निश्चित नाही. दरम्यान, चीनने मात्र २०२८मध्ये यासंदर्भात स्वत:ची मोहीम राबवण्याची धाडसी घोषणा केली आहे.
मंगळावर कधी जीवन होते का, हा प्रश्न फक्त वैज्ञानिक कुतूहलापुरता मर्यादित नाही. तो मानवजातीसाठी एक प्रतीक आहे. मंगळ म्हणजे पुढच्या पिढ्यांचे क्षितिज. पृथ्वी हळूहळू हवामानबदल, संसाधनांचा तुटवडा आणि तंत्रज्ञानाच्या झंझावाताने हादरत असताना, मंगळ ग्रह आपल्या जगण्याच्या आणि विस्ताराच्या स्वप्नांचे कॅनव्हास बनला आहे.
एकेकाळी अंतराळ संशोधन हे जागतिक सहकार्याचे प्रतीक होते. आज मात्र ते एक स्पर्धेचे रणांगण झाले आहे. मंगळाचे नमुने पृथ्वीवर कोण आधी आणणार? मंगळावर पहिले पाऊल कोण ठेवणार? प्रत्येक पायरी आता प्रतिष्ठा, सत्ता आणि अंतराळातील वर्चस्वासाठीची धाव बनली आहे. राष्ट्रांसोबतच मोठ्या कंपन्याही यात उतरल्या आहेत.
याचवेळी जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीशी झुंज देत आहे. त्यामुळे येणारे दशक केवळ अंतराळयात्रेचे नव्हे, तर मानवी संस्कृतीचे रूप पालटणारे ठरणार आहे. मंगळावर सूक्ष्मजीवांचे ठसे सापडोत वा न सापडोत, या शोधामुळे आपण अनेक नवे प्रश्न विचारायला लागलो आहोत. कारण मंगळावरील प्रत्येक खडक फक्त त्या ग्रहाविषयी नसतो, तो आपल्या मानवी जिज्ञासेचा आणि अखंड शोधयात्रेचा पुरावा असतो!