शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

माया जगावीच; पण स्वातीचाही बळी जाऊ नये!

By shrimant maney | Published: November 23, 2021 9:43 AM

निसर्गाच्या साखळीत सर्वोच्च स्थानी असलेल्या वाघांचे रक्षण व्हायलाच हवे; पण त्यासोबतच मानव-वन्यजीव संघर्षही कुठेतरी आवरता घेतला जायला हवा!

- श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

पुण्या-मुंबईच्या हौशी वनपर्यटकांपासून थेट जगभरातील सेलेब्रिटींचे आकर्षण असलेल्या चंद्रपूरनजीकच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात शनिवारी दु:खदायक घटना घडली. पुढच्या वर्षीच्या वाघांच्या गणनेसाठी त्यांच्या पाऊलखुणा टिपणाऱ्या वन खात्याच्या पथकातल्या स्वाती ढुमणे नावाच्या महिला वनरक्षकावर माया नावाच्या वाघिणीने झडप घातली. सकाळी सातची वेळ. कोलारा गेटपासून चार किलोमीटर अंतरावर ते पथक जंगलाची कामे करीत होते. पर्यटकांचाही एक जत्था तिथे होता. पलीकडे वन पथक व अलीकडे त्यांच्यावर नजर रोखून गवतात बसलेली वाघीण असे एरव्ही चित्तथरारक वाटावे असे छायाचित्रही त्या पर्यटकांनी टिपले. ते पुढे निघून गेले आणि वाघिणीने झडप घातली. थोड्या वेळानंतर ३८ वर्षांच्या स्वाती ढुमणे यांचा मृतदेह जवळच आढळून आला. अकरा वर्षांपूर्वी वनरक्षक म्हणून रूजू झालेल्या स्वाती या ताडोबा-अंधारीतल्या पहिल्या वनशहीद. घनदाट जंगलात रात्री-बेरात्री काम करणाऱ्या, कधी वन्य प्राणी तर कधी तस्करांपासून भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या कहाण्या आतापर्यंत शहरी मंडळींनी माेठ्या उत्सुकतेने वाचल्या असतील. ती भीती, तो धोका नेमका काय असतो, हे स्वाती ढुमणे यांच्या मृत्यूने अधोरेखित झाले.

स्वातीच्या मृत्यूनंतर वन्यजीव खात्याने तिच्या पतीला तातडीची आर्थिक मदत दिली. मुख्यमंत्र्यांनी नंतर तिच्या कुटुंबीयांना १५ लाखांची मदत जाहीर केली; पण हा मामला एवढ्यापुरता मर्यादित नाही. ज्या जंगलप्रदेशातून रोज वाघांच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर, गुराखी मरण पावल्याच्या बातम्या येतात, तिथे माणसे आणि श्वापदांमधील संघर्ष तीव्र झाल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही. विशेषत: पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जवळपास रोजच, तर कधी वर्धा, कधी नागपूर जिल्ह्यात अशा व्याघ्रबळींच्या घटना घडतात. तिकडे पश्चिम घाटात, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बिबट्यांचे हल्ले ही गंभीर समस्या उभी आहे. शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर, रानात जनावरे चारणारे गुराखी वन्य श्वापदांपासून सुरक्षित राहावेत, मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी सरकारने समिती नेमली आहे. शेताला सौरउर्जेची कुंपणे, सोलर पंपाने पाणी उपसून भरावयाचे वनतळे यांसारख्या उपाययोजनांवर अधूनमधून चर्चा होते. काही वर्षांपूर्वी जंगलांचे रक्षण करण्यासाठीच्या ग्रीन पोलीस नावाच्या स्वतंत्र व्यवस्थेची खूप चर्चा झाली. नंतर तो प्रस्ताव कुठेतरी बारगळला. दरम्यान, व्याघ्र प्रकल्पांमध्ये कर्मचाऱ्यांसाेबत एसटीपीएफ नावाचे एक प्रशिक्षित पथक तैनात करण्याची तरतूद आहे.

परिसरात वाघ आहे का, असेल तर काय दक्षता घ्यायची, असे प्रशिक्षण या पथकाला दिलेले असते. स्वाती ढुमणे यांनी ते पथक सोबत देण्याची मागणी केली होती; परंतु देण्यात आले नाही, असा आरोप त्यांचे पती संदीप सोनकांबळे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेनेही स्वाती ढुमणे यांचा मृत्यू गंभीरतेने घेतला असून, संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी सोमवारी, मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर वनशहिदांचा दर्जा, मृत्यूनंतर कुटुंबाला एक कोटीची मदत, स्वसंरक्षणार्थ हेल्मेट, फायरिंग गन ही साधने पुरविण्याची मागणी प्रधान मुख्य वनसंरक्षक अर्थात वनबलप्रमुख साईप्रकाश यांच्याकडे केली आहे. या संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या जून २०२१ अखेर मागच्या तेरा वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वन विभागांमध्ये मिळून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २४३ व्यक्तींचा मृत्यू झाला व २०२५ लोक जखमी झाले. या कालावधीत वनश्वापदांनी २१ हजार पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला तर तब्बल १ लाख ३२ हजार गुरेढोरे जखमी झाली.

निसर्गाच्या साखळीत सर्वोच्च स्थानी असलेल्या वाघांचे रक्षण व्हायलाच हवे. त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असतातच. वाघांची व बिबट्यांची संख्या वाढली तर तो आपल्या देशाभिमानाचा विषय असतो. खुद्द पंतप्रधान त्यासाठी देशवासीयांचे अभिनंदन करतात. हे सारे व्हायलाही हवे. सोबतच मानव-वन्यजीव संघर्षही कुठेतरी आवरता घेतला जावा. अवतीभोवती काहीतरी धोका आहे, असे समजून माणसांवर झडप घालणारी माया वाघीण या संघर्षासाठी दोषी ठरत नाही. माया वाघिणीला वाचवायला हवेच; पण सोबतच स्वाती ढुमणे यांच्यासारख्या वन कर्मचाऱ्यांचा बळी जाऊ नये, याकडेही सरकारचे लक्ष असायला हवे.

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प