Join us  

Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?

परदेशी खेळाडूंचे आयपीएल सोडून मायदेशात परतणे भारताच्या काही माजी खेळाडूंना आवडलेले नाही... महान फलंदाज सुनील गावस्कर आणि माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हे त्यातले परिचयाचे आणि नावाजलेली नावं...

By स्वदेश घाणेकर | Published: May 16, 2024 4:10 PM

Open in App

- स्वदेश घाणेकर

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ अंतिम टप्प्यात आला आहे... कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स यांनी प्ले ऑफचे तिकीट पटकावले आहे आणि चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद उर्वरित दोन जागांसाठी सध्या आघाडीवर आहे. आयपीएल २०२४ची फायनल २६ मे रोजी होणार आणि २ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. त्यासाठीच आता आयपीएल २०२४ मधील काही परदेशी खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशाच्या दिशेने प्रवासाला लागले आहेत... जॉस बटलर, कागिसो रबाडा, लिएम लिव्हींगस्टन, विल जॅक्स, फिल सॉल्ट आदी काही प्रमुख खेळाडू एव्हाना मायदेशात पोहोचलेही आहेत.. पण, त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य सध्या चर्चेचा विषय बनलाय... कारण, त्यांचे आयपीएल सोडून मायदेशात परतणे भारताच्या काही माजी खेळाडूंना आवडलेले नाही... महान फलंदाज सुनील गावस्कर आणि माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हे त्यातले परिचयाचे आणि नावाजलेली नावं...

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी श्रीलंका, बांगलादेश असे काही संघ अमेरिकेत दाखल झाले आहेत. पाकिस्तानचा संघ इंग्लंडवरून थेट अमेरिकेला जाईल. आयपीएल २०२४ मुळे भारतीय संघातील खेळाडू दोन बॅचमध्ये ( २५ व २६ मे) अमेरिकेला जाणार आहे. आयपीएलमुळे भारतीय खेळाडू आधीच थकले आहेत आणि त्यात त्यांना अमेरिका व कॅरेबियन येथील वेळेशी जुळवाजूळव करून घेण्यात वेळ जाणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता इतर संघांनी प्रवासाला सुरुवात केली आहे. लवकरच ते मुख्य स्पर्धेपूर्वी काही सराव सामनेही खेळतील. मग राष्ट्रीय कर्तव्यासाठी परदेशी खेळाडूंनी आयपीएलचा अखेरच्या टप्प्याकडे पाठ फिरवली तर काय झालं?

महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी काही काळापूर्वी भारतीय खेळाडूंच्या आयपीएलला प्राधान्य देण्यावरून खडेबोल सुनावले होते. विशेषतः विराट कोहलीचा दाखला त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला होता. देशासाठी खेळायची वेळ येते तेव्हा काही खेळाडू मानसिक थकवा, आराम, विश्रांती अशी कारणं देऊन सुट्टी घेतात.. तेच खेळाडू आयपीएलमधून कधी विश्रांती घेतल्याचे आठवत नाही, असा टोला गावस्करांनी लगावला होता. मग, आता जर राष्ट्रीय कर्तव्यासाठी परदेशी खेळाडू त्यांच्या देशाला प्राधान्य देत असतील तर काय चुकले? चला आपण मान्य करूया, फ्रँचायझी मोठी रक्कम मोजून या खेळाडूंना आपल्या संघात करारबद्ध करतात, मग त्यांनी पूर्ण स्पर्धा खेळायलाच हवी. पण, म्हणून त्यांनी वर्ल्ड कपसारख्या प्रमुख स्पर्धेसाठी फ्रँचायझी लीगला प्राधान्य देणे योग्य आहे का? या प्रश्नावर जरा गावस्करांनी किंवा इरफान पठाणने आपले मत मांडायला हवं.

या आयपीएलमुळे भारतीयांनी डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, सुनील नरीन, आंद्रे रसेल, ख्रिस गेल.. आदी खेळाडूंना आपलेसे केले. त्यामुळे जेवढी गर्दी ही विराट, रोहितला पाहण्यासाठी होते तेवढी या परदेशी खेळाडूंसाठीही होते. इरफानच्या मतानुसार जर पूर्ण आयपीएल खेळायची नसेल तर येऊ नका, हे मान्य केल्यास खरंच आयपीएलमध्ये रंगत राहील का?

यंदाच्याच आयपीएलचा विचार केल्यास ट्रॅव्हिस हेडने नुसता धुरळा उडवला आहे... पॅट कमिन्सची सनरायझर्स हैदराबादने कर्णधार म्हणून नियुक्ती केली आणि त्याच्या रणनीतीने कमाल करून दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी याच पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघाने वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला हरवले होते, तेव्हा त्याला शिव्या पडल्या होत्या. तोच कमिन्स आता हैदराबादच्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. कमिन्सने SRH च्या सलामीची जबाबदारी हेडवर सोपवली आणि त्याने ११ सामन्यांत २०१.८९च्या स्ट्राईक रेटने व ५३.३० च्या सरासरीने ५३३ धावा चोपल्या आहेत... सुनील नरीन ( ४६१ धावा व १५ विकेट्स), फिल सॉल्ट ( ४३५ धावा) व आंद्रे रसेल ( २२२ धावा व १५ विकेट्स) हे KKR चे सुपरस्टार आहेत.

विल जॅक्स ( २३० धावा) सारखा हिटर RCB ला मिळाला आहे आणि तोही वर्ल्ड कपसाठी मायदेशी परतला आहे. निकोलस पूरन, त्रिस्तान स्तब्स, मार्कस स्टॉयनिस, जॉस बटलर, हेनरिच क्लासेन, जॅक फ्रेझर मॅकगर्स ही नावे आहेत, जे आयपीएलचा यंदाचा पर्व गाजवत आहेत. त्यामुळे जर ही नावे समजा वगळली तर खरंच आयपीएलमध्ये मजा राहील का? ही फक्त फलंदाजांची यादी आहे. गोलंदाजांमधील अशीच परदेशी नावे वगळली तर खरंच इंडियन प्रीमिअर लीग ही फक्त भारतीय खेळाडूंची होईल, परंतु त्यात परदेशी खेळाडूंमुळे येणारी रंगत, रोमांच तसाच कायम राहील का? त्यामुळे इरफान पठाणला बोलायला काय जातंय! 

टॅग्स :आयपीएल २०२४इरफान पठाणजोस बटलर