Latest news of brotherhood and brotherhood !!! | भावकी आणि भाऊबंदकीची लेटेस्ट खबर!!!

भावकी आणि भाऊबंदकीची लेटेस्ट खबर!!!

सचिन जवळकोटे

इंद्र दरबार आज खचाखच भरलेला होता; पण सगळीकडे मात्र पुरता सन्नाटा पसरलेला. प्रत्येकजण खाली मान घालून बसलेला, कारण प्रत्येकाच्या हातातला मोबाइल चमकत होता. ‘अमृता वहिनीं’चा गळा ‘लतादीदीं’पेक्षाही किती सुरेल, हे पटवून देणारी ‘डिजिटल भक्तां’ची पोस्ट पाहण्यात काहीजण दंग होते. सांगलीच्या ‘सदाभाऊं’नी कोल्हापूरच्या ‘शेट्टीं’कडं बघत म्हटलेलं ‘याद तेरी आयेगीऽऽ मुझको बडा सतायेगीऽऽ’ हे गाणं ऐकण्यातही काहीजण रमले होते. 

एवढ्यात इंद्र महाराजांना नारदांनी ‘झूम कॉल’ केला. स्क्रीनवर  पहात महाराजांनी प्रश्न केला, ‘दरबारात हजर होण्याऐवजी भुतलावरून  असा आभासी संपर्क का  साधताहात नारदा?’  हातातली वीणा वाजवत नारद उत्तरले, ‘क्षमा असावी महाराजऽऽ कोरोनामुळे सर्वत्र संचार करण्यावर बरीच बंधनं आलीत. त्यामुळे मी इथंच अडकून पडलोय.’  ‘पण  मुंबईत सारं ठीक आहे ना’ - या प्रश्नावर मुनी उत्तरले, ‘मंत्रालय ठीक; परंतु इथला निम्मा कारभार ‘मातोश्री’वरूनच ऑनलाइन चालतो महाराज.’ दचकलेल्या दरबारातून प्रतिप्रश्न केला गेला, ‘मग बाकीचं मंत्रालय कोण चालवत?’

गालातल्या गालात हसत नारद उत्तरले, ‘बाकीचं ‘कृष्णकुंज’वरून चालतं. इकडे जेवढे रोज ‘लाइव्ह  होतात, तेवढीच माणसं तिकडं प्रत्यक्ष भेटायला जातात.’ गोंधळलेल्या महाराजांनी पुन्हा पुढं विचारलं,  ‘मग राज्याचा कारभार नेमकं चालवतं तरी कोण’  आता मात्र गंभीर होत नारद मुनी सांगू लागले, ‘हेच विचारण्यासाठी मी ‘मलबार हिल’च्या ‘भवना’त गेलो; पण तिथून मला थेट ‘बारामती’ला पाठवण्यात आलं. तिथं ‘थोरले काका’ काही भेटले नाहीत. ‘धाकटे दादा’ मात्र लाडक्या ‘ताईं’च्या आग्रहाखातर फायलींवर फटाफट सह्या ठोकत होते’. हे ऐकून कौतुकाश्चर्यानं इंद्र महाराजांचा पुढचा प्रश्न कानावर आदळला, ‘अरे वा.. म्हणजे ‘बारामती’ची भावकी आता गुण्यागोविंदानं नांदू लागली म्हणायचं. पण हा आदर्श राज्यातील इतर घराणी का घेत नाहीत...’ 
लोकांच्या मनातला प्रश्न विचारला जाताच मुनी म्हणाले, ‘हेच तर मराठी राजकारणाचं दुर्दैव म्हणायचं. ‘परळी’च्या भावा-बहिणीला  ‘थोरल्या काकां’नी एकाच बैठकीत बसून उसाचा रसही पाजला, मात्र ऊसतोड कामगारांच्या कोयत्यासारखीच दोघांची जीभ धारदार राहिली, महाराज. ‘पुसद’च्या ‘नाइकां’ची पुढची पिढी वडीलधाऱ्यांच्या पायाला हात लावत असली तरी दोन्ही भावंडांच्या मधून राजकीय विस्तू काही जाता जात नाही. ‘अकलूज’च्या मोठ्या ‘पाटलां’ना ‘कमळा’नं ‘मोहित’ केल्यानंतर ‘बारामतीकरां’नी ‘धाकट्यां’च्या हातात अप्रत्यक्षपणे ‘धवल घड्याळ बांधलं’ ‘पण मग मुनीवर,  ‘नाशिक’ची ‘हिरे’ भावंडं आता जशी एकमेकावर उघडपणे आरोप करण्याचं टाळतात, तसं ‘साताऱ्या’त का होत नाही.’

अजून एक प्रश्न विचारला जाताच नारदांनी डोकं खाजवलं, ते म्हणाले, ‘दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र अन् साताऱ्यात शिवेंद्र असा जबरदस्त फार्म्युला निवडणुकीत ठरला होता. मात्र तिकडं नागपूरचे पंत लटकले अन् इकडं बिच्चारे साता-याचे धाकटे राजे अडकले. ‘माण-खटाव’च्या ‘गोरे’ भावंडांनी तर निवडणुकीपूर्वीच ‘कमळ-धनुष्यबाणा’ची युती तोडलेली. दोघे एकमेकांच्या विरोधात  लढले होते, महाराज!’
 

‘पण मुनीवर, गेल्या वर्षी पहाटे गुपचूप शपथ घेणारे ‘धाकटे दादा’ यंदा मात्र दिवाळीच्या पहाटे आपल्या आप्तेष्टांसोबत अभ्यंगस्नानासाठी जमले होते. भावकी टिकविण्याची जी कला या घराण्याला जमली, तशी बाकीच्या घराण्याची भाऊबंदकी कशी संपणार..’  इंद्र महाराजांनी पुन्हा तोच प्रश्न रेटून विचारला, तेव्हा मिस्कीलपणे हसत हळूच मुनी उत्तरले, ‘ज्या दिवशी ‘थोरले काका’ आपल्या गाडीत रोहित अन् ‘पार्थला एकत्र घेऊन फिरतील, त्याचवेळी इतर भाऊबंदकीही नक्कीच संपुष्टात येईल, तोपर्यंत नारायणऽऽ नारायणऽऽऽ’’

(लेखक लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

Web Title: Latest news of brotherhood and brotherhood !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.