The kids came to school, let them breathe a little! | मुलं शाळेत आली, त्यांना थोडा श्वास घेऊ द्या !

मुलं शाळेत आली, त्यांना थोडा श्वास घेऊ द्या !

दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी काही जिल्ह्यांत का असेना, कालपासून राज्यातल्या निदान काही शाळा उघडल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट समोर  उभे दिसत  असताना शाळा  सुरू करण्याचा निर्णय ना पालकांच्या पचनी पडला आहे, ना शिक्षकांच्या, ना संस्थाचालकांच्या. याबाबतीतली तीव्र जनभावना लक्षात घेऊन रविवारी रात्री केलेल्या भाषणात मुख्यमंत्री ऐनवेळी हा निर्णय मागे घेतील, असा एक अंदाज व्यक्त केला जात होता; पण मुख्यमंत्र्यांनी तसे काही केले नाही आणि बावीस जिल्ह्यांत का असेना, काल शाळेची घंटा वाजलीच!  कोरोनाचे संकट अजूनही गेलेले नाही. व्हायरसच्या दहशतीचे ढग विरलेले नाहीत. तथापि, मुलांचे शिक्षण थांबू नये, या हेतूने शाळा सुरू करायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘आता फार झाली सुटी; काहीही करून शाळा उघडा’, ‘फार घाई होतेय, शिक्षण नाही जीव महत्त्वाचा आहे. शाळा नका उघडू’ असे भिन्न मतप्रवाह दिसत आहेत. शाळा सुरू करण्याबाबत सर्वसहमती होणे कठीण आहे. काहीशी संभ्रमाची स्थिती असताना काही शाळांचे दरवाजे उघडले आहेत.

शाळेतली मुलांची उपस्थिती अनिवार्य नाही हे शासनाने आधीच स्पष्ट केलेले असल्याने पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार आहेत का, हे येत्या एका दोन दिवसांत स्पष्ट होईलच.  या परिस्थितीत ज्यांच्यावर शाळा सुरू करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे, त्या मुख्याध्यापकांचे आणि शिक्षकांचे काम सोपे नाही. संसर्गाचे भय असताना  त्यांना अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे. शालेय इमारती, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे, पाण्याची मुबलक सोय उपलब्ध करणे तसेच हँडवॉश स्टेशन्स उभारणे, साबणासारख्या गोष्टी शाळेत उपलब्ध करणे याची खबरदारी घ्यायला लागेल. इतक्या महिन्यांनी एकमेकांना भेटणाऱ्या मुलांना शारीरिक अंतर पाळायला लावणे किती कठीण आहे, हे  ज्यांनी शाळेत काम केले आहे त्यांनाच केवळ कळू शकेल. अनेक आव्हानांचा मुकाबला करायला लागणार आहे. कोरोनासोबत शिक्षण सुरू ठेवताना शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा/संस्थाचालकांची जबाबदारी वाढणार आहे. सध्याच्या असाधारण परिस्थितीत या जबाबदारीचे स्वरूप कोरोनाआधीच्या स्थितीपेक्षा खूप वेगळे असणार आहे. म्हणूनच याचे गांभीर्य जास्त आहे.

आठ महिन्यांनंतर शाळा सुरू होत आहेत. कोरोनाकाळ लहान मुलांसाठी ‘काळ’ बनून आला होता. हसणाऱ्या, खिदळणाऱ्या मुलांवर अचानकपणे प्रचंड बंधनं लादली गेली. सक्तीने घरात थांबायची वेळ आली. खेळणं, फिरणं पूर्ण बंद झाल्यामुळे मुलांच्या दृष्टीने घरांना कोंडवाड्याचं स्वरूप प्राप्त झालं. मित्र-मैत्रिणींच्या भेटी बंद झाल्या. एकीकडे कोरोना साथीची प्रचंड दहशत, त्यासोबत आलेली बंधनं, तर दुसरीकडे ऑनलाइन शिक्षण नावाची आलेली दुसरी साथ. अनेक मुलं या कात्रीत सापडली. मुलं जेव्हा शाळेत येतात, तेव्हा ती केवळ शिकत नाहीत. मैत्र-मैत्रिणींच्या भेटी, गप्पागोष्टी, खेळणं, हास्यविनोद अशा कितीतरी गोष्टी सुरू असतात. त्यातून ताण आपसूक निवळत जातात. शिक्षणाशिवाय शाळा म्हणजे मुलांसाठी आनंदाचा बिंदू असतात. कोरोनाकाळात आई-वडील, नातेवाईक मुलांसोबत असूनही योग्य तो  संवाद नसल्याने मुलांच्या त्रासात भर पडली. मोठ्यांकडून मुलांचा छळ होत असल्याच्या ऑनलाइन तक्रारी वाढत गेल्या. खेळ बंद झाले आणि मानसिक, भावनिक कोंडमारा झाल्यामुळे मुलांच्या आनंदी वृत्तीचा निर्देशांक हळूहळू कमी कमी होत गेल्याचं गंभीर वास्तव समोर आलं. कोरोनाकाळ म्हणजे मुलांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण कालखंड होता. अजूनही आहे.
या सर्व पृष्ठभूमीवर नववीपासूनच्या मुलांसाठी शाळेची कवाडं उघडली गेली आहेत.  अर्थात, शिक्षणाची गाडी रुळावर यायला बराच काळ जाणार आहे. कोरोना संकटाची भीती मनात असल्यामुळे शाळेत येताना, आल्यानंतर पुरेशी खबरदारी घ्यायला लागेल. त्याचे वेगळे ताण असणार आहेत. ‘शाळेची सवय’ मोडली आहे. अनेक प्रकारच्या प्रतिकूलता मुलांच्या वाट्याला आलेल्या असतात. व्यथा, वेदनांचे भुंगे कोवळं मन कुरतडत असतात. शिक्षणासाठी भावनिक सुरक्षितता महत्त्वाची असते. अशा वातावरणात शाळेत आलेल्या मुलांना विषय शिकवायची घाई करणं अन्यायकारक होईल.

आधीपासून आपली मुलं त्रासात आणि ताणात जगत आहेत. वाढत्या वयासोबत येणाऱ्या समस्या, शिकवलेलं समजत नाही याचे ताण आहेत... शिवाय स्क्रीन ॲडिक्शनमुळे स्क्रीन टाइम वाढला आहे, त्यातून मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. काही मुलांना व्यसनं जडली आहेत. याशिवाय ‘शिकून काय होणार?’- अशा हतबल भावनेने करिअरविषयी मनात डोकावणारा  निराशाजनक विचार मुलांना कमालीचा वैफल्यग्रस्त बनवत आहे. ही मनोवस्था लक्षात घेता मुलांच्या मानसिक आरोग्यावर भरपूर काम करायची गरज  आहे. मुलांच्या मनाची मशागत करायच्या हेतूने त्यांचं समुपदेशन काळाची गरज बनली आहे.  म्हणूनच शाळा सुरू झाल्यानंतर गणित-विज्ञान शिकवायची सक्ती, घाई करण्याऐवजी जीवनकौशल्यांवर भर देणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता  अधिक असेल. शारीरिक अंतर राखून कोणते खेळ खेळता येतील, याचाही विचार करावा लागेल. खेळ, गाणी, गोष्टी, कला, नाटक, पुस्तक वाचन, मातीकाम, कागदकाम अशा मुलांना आवडणाऱ्या गोष्टींकडे आमच्या औपचारिक शिक्षणाने नेहमी दुर्लक्ष केलं आहे. वास्तविक शाळेत यांची रेलचेल असायला हवी. इथे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची जबाबदारी मोठी आहे. कोरोनासोबत शिकताना, शिकवताना प्रत्येक टप्प्यावर पालक, विद्यार्थी यांच्या समुपदेशनाची गरज भासणार आहे. यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण करावं लागेल. शासनाने याचा जरूर विचार करावा.
जगण्याच्या वाटेत येणाऱ्या आनंदाचा आणि अडथळ्यांचा विचार करणारं, त्यांना तोंड  द्यायला सक्षम बनवणारं शिक्षण महत्त्वाचं. कोरोनानंतरच्या न्यू नॉर्मल काळात तर पुस्तकी अभ्यासापेक्षा जीवनकौशल्यांचीच गरज मुलांना जास्त लागणार आहे. याबद्दल शाळा बोलू लागल्या तरच त्या मुलांना अधिक जवळच्या वाटतील.  संकटाला संधी मानायची आपल्याकडे रीत आहे, कोरोनाकाळ ही संधी मानायला हवी. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने ही संधी दवडली आहे, असं इथे खेदाने नमूद करायला हवं.

Web Title: The kids came to school, let them breathe a little!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.