फक्त एक पोस्ट आणि ९ अब्ज डॉलर्सचा तोटा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:59 IST2026-01-02T10:58:47+5:302026-01-02T10:59:12+5:30
रशियन अब्जाधीश ओलेग टिंकोव यांनी स्वत:च याबाबत आपली आपबिती सांगितली आहे.

फक्त एक पोस्ट आणि ९ अब्ज डॉलर्सचा तोटा!
केवळ एका सोशल मीडिया पोस्टनं रशियाच्या एका उद्योजकाचं ८० हजार कोटी रुपयांचं नुकसान झालंय. हे ऐकून आपल्या कोणालाही ही बातमी खोटी किंवा अफवा वाटेल, पण असं झालंय खरं. रशियन अब्जाधीश ओलेग टिंकोव यांनी स्वत:च याबाबत आपली आपबिती सांगितली आहे.
ओलेग टिंकोव हे कधीकाळी रशियाच्या बँकिंग क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव होतं. कॉर्पोरेट जगतात कधी कधी छोटंसं विधानही किती भारी पडू शकतं, याचं उदाहरण टिंकोव यांच्या आयुष्यकथेतून समोर येतं. टिंकॉफ बँकेचे संस्थापक असलेल्या ओलेग टिंकोव यांनी रशियानं युक्रेनबरोबर सुरू केलेल्या युद्धाला ‘वेडेपणा’ म्हणणारी एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती. त्यामुळे त्यांना आयुष्यभराची कमाई गमवावी लागली. या एका पोस्टमुळे त्यांना तब्बल ८० हजार कोटी रुपयांचं (सुमारे नऊ अब्ज डॉलर) इतकं नुकसान साेसावं लागलं. त्यांच्या या पोस्टमुळे क्रेमलिनची त्यांच्यावर वक्रदृष्टी झाली आणि क्रेमलिनच्या दबावाखाली त्यांना आपल्या बँकेतील हिस्सेदारी अक्षरश: कवडीमोल भावात विकावी लागली. युद्धावर टीका केल्यानंतर त्यांना सरकारनं प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. टिंकॉफ बँकेतली त्यांची हिस्सेदारी त्यांना फक्त तीन टक्के खऱ्या मूल्यावर विकावी लागली. या व्यवहारात त्यांना नऊ अब्ज डॉलरचं थेट नुकसान झालं. टिंकोव यांनी पुढे रशियन नागरिकत्वही सोडून दिलं.
२०२२ मध्ये रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर, ओलेग टिंकोव यांनी इंस्टाग्रामवर कडक संदेश पोस्ट केला होता. त्यांनी युद्धाला ‘वेडेपणा’ म्हणत रशियन लष्कराची तयारी, नेतृत्वातील त्रुटी आणि देशातल्या भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, मला या वेड्या युद्धात एकही फायदा दिसत नाही. निरपराध लोकं आणि सैनिक मारले जात आहेत. आपल्याच देशाचं त्यामुळे नुकसान होतं आहे. रशियन लष्करी नेतृत्वावरही टोला मारत त्यांनी म्हटलं होतं, हँगओव्हरमधून उठल्यावर रशियन जनरल्सना कळलं की आपल्या सैन्याची अवस्था किती वाईट आहे! रशियातले ९० टक्के लोक या युद्धाच्या विरोधात आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.
बीबीसी आणि न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतींमध्ये टिंकोव यांनी सांगितलं, त्या एका पोस्टनं क्रेमलिनमध्ये मोठी खळबळ उडवली. काहीच दिवसांत त्यांना धमकीचे फोन येऊ लागले. मला सांगितलं गेलं, की बँकेतील हिस्सेदारी विक, ब्रँडवरून नाव हटव, नाहीतर बँकेचं राष्ट्रीयीकरण केलं जाईल. मला सल्ला नाही, तर फक्त धमकी देण्यात आली. मी जणू ‘ओलिस’ असल्यासारखा होतो..
अखेर एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी बँकेतली हिस्सेदारी विकली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना संपत्तीच्या खऱ्या मूल्याच्या फक्त तीन टक्के भागच मिळाला, ज्यामुळे त्यांचं नेटवर्थ नऊ अब्ज डॉलर्सनी कमी झालं! ओलेग टिंकोव हे रशियातले अत्यंत यशस्वी उद्योजक होते. त्यांनी टिंकॉफ बँक सुरू केली होती. रशियातली सर्वांत आधुनिक, डिजिटल-फर्स्ट ओळख असलेली ही बँक. एकेकाळी ते रशियातल्या श्रीमंतांच्या यादीत होते, पण आता ते निर्वासित आयुष्य जगत आहेत. टिंकोव यांचं म्हणणं आहे, त्यांना फक्त आर्थिकदृष्ट्याच उद्ध्वस्त केलं गेलं नाही, तर त्यांनी दशकांच्या मेहनतीनं उभ्या केलेल्या बँकेवरून त्यांचं नावही पुसण्याचा प्रयत्न झाला!..