‘आकाशाशी नाते’ जोडलेला जयंतदादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:11 IST2025-05-21T10:11:30+5:302025-05-21T10:11:53+5:30
गेल्याच महिन्यात भेटलो, तेव्हा असं वाटलंही नाही की ही शेवटची भेट असेल...

‘आकाशाशी नाते’ जोडलेला जयंतदादा
५ एप्रिलला पुण्याहून मुंबईला परतत होतो. वासुदेव (माझे पती) सहज बोलून गेले ‘जयंतदादांसारखी माणसं यापुढे दुर्मीळ असतील’... मलाही ते शब्दश: पटलं. त्यादिवशी सकाळी आम्ही उभयता केवळ जयंतदादाला भेटायला म्हणून पुण्याला गेलो होतो. खूप गप्पागोष्टी झाल्या. मंगला वहिनीची अनुपस्थिती जाणवत होती; पण तसं न दाखवता आम्ही अगदी क्रिकेटसकट कितीतरी विषयांवर बोलत होतो.
जयंतदादानं तो तपासत असलेले नवीन लेखनाचे प्रिंटआउट वाचायला दिले. त्यात ‘मोरू परतून आला’ या शीर्षकाखाली माझ्या बाबांबद्दल प्रेमपूर्वक आदरानं भरभरून लिहिलं होतं. दिग्विजयी भाच्यानं लाडक्या मोरू मामाला दिलेली ती प्रेमाची पावती वाचून मन भरून आलं. माझे वडील जयंतहून फक्त ८ वर्षांनी मोठे होते. त्यामुळे त्यांच्यात भावाभावांचं सख्य होतं.
पोटभर गप्पा करून आरामात निघालो. पण मन त्याच्या आठवणींनीच गुंतलं होतं. जयंतदादा माझा सख्खा आतेभाऊ... भारताचं भूषण असला तरी माझ्या बाबांना ‘माझे मोरूमामा’ असं प्रेमानं संबोधणारा, माझ्या आईच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या दिवशी हक्कानं बोलणारा, कोविडमुळं अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही माझ्या पहिल्या पुस्तकासाठी कौतुकानं प्रस्तावना लिहिणारा... कुटुंबाशी जिव्हाळा जपून असलेला मनमिळाऊ भाऊ !
लहानपणापासून जयंत जात्याच अतिशय हुशार. त्यात आई-वडील-मामा असं तिहेरी मार्गदर्शन मिळाल्यामुळं संस्कृत, गणित, विज्ञानच नव्हे तर काव्य-शास्त्र-विनोद-साहित्य असे नानाविध संस्कार नकळत घडत गेले होते. माझ्या वडिलांनी (सुप्रसिद्ध गणिती प्रा. मो. शं. हुजूरबाजार) रोज रात्री घरच्या फळ्यावर एक आव्हानात्मक गणित लिहून सकाळपर्यंत जयंतनं ते सोडवून दाखवायचं असा उपक्रम सुरू केला होता. परिणामी जयंतला गणिताची अतिशय गोडी लागली ती कायमची! जयंतदादा आणि मंगलावहिनी एक परिपूर्ण जोडी होती. सहजीवनाचा मनमुराद आस्वाद घेत, एकमेकांचा आदर करत पुढं केम्ब्रिजहून भारतात परत येऊन दोघेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले. गीता, गिरिजा आणि लीलावती या त्यांच्या कन्या आज आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वानं नावाजल्या जात आहेत.
वाराणसीत शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचा वारसा चालवत केम्ब्रिजला उच्च शिक्षणासाठी गेलेला हा माझा भाऊ रँग्लर जयंत नारळीकर म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध झाला. सन्मानाच्या ‘पद्मविभूषण’ सन्मानासह राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळत गेले. त्यानं साध्यासोप्या मराठी भाषेत लिहिलेल्या रंजक मराठी विज्ञान कथा वाचत एक पिढी मोठी झाली. गणित आणि विज्ञान सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नारळीकर दाम्पत्यानं घेतलेले विशेष परिश्रम आजही चर्चेचा विषय आहेत.
दोन वर्षांपूर्वी मंगलावहिनी गेली. तिच्या विरहाचं दु:ख मनात कायम होतं; पण त्यावर मात करून जयंतनं कालपरत्वे ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. इतकं उत्तुंग यश मिळालं तरी जमिनीवर पाय घट्ट रोवून ‘आकाशाशी नाते’ जडवून बसलेला माझा जयंतदादा. गेल्याच महिन्यात भेटलो, तेव्हा असं वाटलंही नाही की ही शेवटची भेट असेल...
- सुधा हुजूरबाजार-तुंबे, मुंबई