जयंत नारळीकर... आकाशीचा अढळ तारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:58 IST2025-05-21T09:57:57+5:302025-05-21T09:58:57+5:30

वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी, यासाठी सर्वदूर प्रयत्न होत होते. सर्वसामान्य माणसांच्या भल्यासाठी विज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे, विज्ञाननिष्ठ पायावर देश उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका होती. नारळीकर हे त्या स्कूलचे विद्यार्थी...

Jayant Narlikar The unwavering star of the sky | जयंत नारळीकर... आकाशीचा अढळ तारा

जयंत नारळीकर... आकाशीचा अढळ तारा

डॉ. जयंत नारळीकर भारतात परतले, तेव्हा नेहरू पर्व संपलेले होते. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चौदाव्या दिवशी आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावणाऱ्या नेहरूंच्या वाटेने देश निघाला होता. मूलभूत संशोधनासाठी नवनवीन संस्था उभ्या राहत होत्या. वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी, यासाठी सर्वदूर प्रयत्न होत होते. सर्वसामान्य माणसांच्या भल्यासाठी विज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे, विज्ञाननिष्ठ पायावर देश उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका होती. नारळीकर हे त्या स्कूलचे विद्यार्थी. ही गोष्ट सहा दशकांपूर्वीची. एका तरुण मराठी शास्त्रज्ञाने विश्वनिर्मितीच्या रहस्याची एका अर्थाने उकलच तेव्हा केली होती. या संशोधनामुळे जगभर खळबळ उडाली. त्यामुळेच मानवी आकलनाच्या पुढील वाटा प्रशस्त झाल्या.

डॉ. जयंत नारळीकर या अवघ्या पंचविशीतल्या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडला. त्यांचे गुरु फ्रेड हॉयल यांच्यासोबत केलेल्या या मांडणीने जयंत नारळीकर हे नाव जगभर पोहोचले. मात्र, प्रयोगशाळेत संशोधन करून पेटंट आणि पुरस्कार मिळविणे हे नारळीकरांचे स्वप्न कधीच नव्हते. विवेकी आणि विज्ञानवादी समाज निर्माण व्हावा, हा त्यांचा ध्यास होता. या स्वप्नासाठी त्यांनी सर्व स्तरांवर काम केले. विज्ञान हा प्रांत केवळ वैज्ञानिकांचा नाही, सामान्य माणसांचा आहे. रोजच्या जगण्यात वैज्ञानिक भान असायला हवे, सारासार विवेक असायला हवा, हा त्यांचा आग्रह. त्यासाठी त्यांनी उदंड लिहिले. विज्ञान किती सुरस असू शकते आणि खरा वैज्ञानिक हा तत्त्वज्ञच असतो, हे समजून घ्यायचे असेल तर नारळीकरांचे लेखन वाचायला हवे. 

‘आयुका’सारखी संस्था त्यातूनच तर त्यांनी उभी केली. नारळीकरांना तसा वारसाही लाभला होता. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी. नारळीकरांचे विज्ञानप्रेम त्यामुळे तसे स्वाभाविकच. मात्र, त्यांची वैचारिक भूमिका हा खास अभ्यासण्याचा विषय.  नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलनाचे डॉ. नारळीकर अध्यक्ष होते. प्रकृतीच्या कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत हे खरे; मात्र त्यांनी त्या भाषणात आपली भूमिका नेमकेपणाने मांडली होती. ‘खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांनादेखील कळत नाही, हे पाहून मन खिन्न होते’, असे तेव्हा त्यांनी सांगितले. एखादा माणूस किती द्रष्टा असावा! १९७५ मध्ये त्यांनी ‘पुत्रवती भव’ ही कथा लिहिली. त्या गोष्टीत गर्भाचे लिंग ठरवता येण्याची क्षमता मिळाली तर काय गोंधळ उडेल याचे वर्णन होते. 

गर्भलिंग निदानामुळे तशीच परिस्थिती उद्भवलेली नंतर आपण पाहिली. कन्येचा गर्भ असल्यास तो पाडण्याचे क्रूर काम होऊ नये म्हणून कायदा करावा लागला. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या त्यांच्या आत्मकथनातून हा मुलुखावेगळा माणूस अधिक नेमकेपणाने उलगडत जातो. ‘माणूस’ म्हणून त्यांचे मोठेपण अधोरेखित होत जाते. या पुस्तकाच्या समारोपात ते म्हणतात, ‘विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावरदेखील अंधश्रद्धांचा पगडा आहे!’ काळ कठीण आहे; पण आपल्याला काम करावेच लागेल, असेही ते एखाद्या कार्यकर्त्याच्या असोशीने सांगत. 

डॉ. नरेंद्र दाभोलकरांसोबत एक प्रयोग नारळीकरांनी केला होता. कुंडली आणि त्यातून उभे राहिलेले थोतांड याचा खरा चेहरा उघड करत, नारळीकरांनी कठोर धर्मचिकित्सा केली. त्याची किंमतही चुकवली. मात्र, व्यवस्थाशरण होत मूग गिळून गप्प बसणे त्यांनी मान्य केले नाही. छद्मविज्ञानाला नाकारताना आपली भूमिका तेजस्वीपणे मांडली. नारळीकर हे वैज्ञानिक खरेच. मात्र, त्यांचे नाते संत तुकारामांशी आहे. ‘नवसे कन्या पुत्र होती, तर का करणे लागे पती’, असा रोकडा सवाल विचारणारा तुका ‘अणूरेणूया थोकडा’ होत आकाशाएवढा झाला. विवेकी समाज घडवण्यासाठी अव्याहत संशोधन, लेखन, प्रबोधन करणाऱ्या जयंत नारळीकरांना त्यामुळेच ‘आकाशाशी जडले नाते’ अशी अनुभूती आली. आकाशाच्या उंचीचा हा माणूस. त्या नभांगणावर ‘जयंत नारळीकर’ हे नाव कायमचे कोरले गेले आहे.

Web Title: Jayant Narlikar The unwavering star of the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.