शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

इवलीशी मुंगी, तिने बदलला सिंहांच्या शिकारीचा पॅटर्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 6:58 AM

इवलीशी मुंगी अख्खे निसर्गचक्र बदलू शकते. हत्ती, सिंह, रानम्हैशींसारख्या महाकाय प्राण्यांचे जगणे-मरणे या छोट्याशा मुंगीने बदलून टाकले आहे.

श्रीमंत माने

मुंगीने हत्तीला कानात काहीतरी सांगितले आणि हत्तीला भोवळ आली, ही लहान मुलांमधील नेहमीची गमतीदार गोष्ट अगदीच हसण्यावारी नेण्यासारखी नाही. इवलीशी मुंगी अख्खे निसर्गचक्र बदलू शकते. हत्ती, सिंह, झेब्रा किंवा रानम्हैशींसारखे महाकाय प्राण्यांचे जगणे-मरणे त्या इवल्याशा मुंगीमुळे बदलू शकते. हे वाचून, ऐकून आश्चर्य वाटेल. पण ते खरे आहे. केनियातल्या लैकिपिया या जगप्रसिद्ध अभयारण्यात जंगलाचा राजा अशी ओळख असलेल्या सिंहाला केवळ मुंग्यांमुळे शिकारीची सवय, पद्धत बदलावी लागल्याचे आढळून आले आहे. फ्लोरिडा विद्यापीठाचे टॉड पाल्मर, वायोमिंग विद्यापीठाचे जेकब गोहीन, द नेचर कंझरवन्सीचे कोरिना रिगिनोस यांच्याशिवाय केनिया, कॅनडा, अमेरिका व इंग्लंडमधील पर्यावरण अभ्यासकांनी केनियातील लैकिपिया अभयारण्यात जवळपास वीस वर्षे बदलत्या निसर्गचक्राचा अभ्यास केला. त्यासाठी कॅमेरा ट्रॅप, सिंहांना सॅटेलाईट- ट्रॅकड् कॉलर लावून त्याद्वारे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. सायन्स नियतकालिकात जानेवारीच्या शेवटी या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. 

जंगलसफारीसाठी जगभर लोकप्रिय असलेला हा भाग विस्तीर्ण अशा गवताळ कुरणांचा आहे. तिथल्या झाडाझुडुपांमध्ये प्रामुख्याने बाभळीची झाडे आहेत आणि हत्ती, जिराफ अथवा झेब्रा यांसारख्या तृणभक्षी मोठ्या प्राण्यांचे पालनपोषण झाडाझुडपांच्या पाल्यावरच होते. त्यातही बाभळीच्या झाडांवर थोडे अधिक. मोठ्या डोक्यांच्या पाहुण्या मुंग्यांची पैदास वाढण्याआधी या बाभळीच्या झाडाखोडांवर स्थानिक मुंग्या असायच्या. या यजमान मुंग्या जंगलाच्या, झाडाझुडपांच्या रक्षण करायच्या. हत्ती किंवा झेब्रा बाभळीचा पाला खायला गेले की त्यांना मुंग्यांचे दंश व्हायचे. या स्थानिक मुंग्यांचा डंखही अत्यंत वेदनादायी. कारण, त्यांनी डंख मारला की फॉर्मिक ॲसिड प्राण्यांच्या शरीरात टाकले जायचे. त्यामुळे प्रचंड वेदना व्हायच्या आणि झाडांचे रक्षण व्हायचे. साधारणपणे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पाहुण्या मुंग्या अभयारण्यात दाखल झाल्या आणि त्यांनी लैकिपिया भागातल्या मूळ रहिवासी मुंग्यांवर हल्ले चढविले. त्यांची अंडी, अळ्या, कोष खाऊन टाकले. मूळ रहिवासी मुंग्यांची वस्ती नष्ट होऊ लागली. परिणामी, पाच ते सातपटीने चराई वाढली. झाडाझुडपांचा आडोसा कमी झाला. नुसतेच गवताचे कुरण उरले. शिकार करण्यासाठी सिंहांच्या कळपाला आवश्यक असलेल्या लपायच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे हल्ल्यासाठी चालून येणारे सिंहांचे कळप झेब्रांना सहज दिसू लागले व त्यांना बचाव करण्यासाठी वेळ मिळू लागला. झेब्राच्या शिकारी घटल्या. मग सिंहांनी शिकारीसाठी रानम्हैशी किंवा गव्यांना लक्ष्य बनवायला सुरुवात केली. एकतर म्हैशी झेब्राइतक्या चपळ नाहीत. त्यांचे वजन अधिक. आकार मोठा आणि विशेषकरून त्या कळपाने राहतात. त्यामुळे कळपावर हल्ला केला की, सिंहांना सहज शिकार मिळू लागली. कळपातील दुबळ्या म्हैशी हल्ल्यांना सहज बळी पडू लागल्या. हा सगळा बदल अवघ्या वीस वर्षांमध्ये झाला. २००३ साली सिंहांच्या शिकारींमध्ये झेब्राचे प्रमाण ६७ टक्के होते. ते २०२० साली ४२ टक्क्यांपर्यंत घसरले. म्हैशींच्या शिकारीचे प्रमाण २००३ साली शून्य टक्के होते. ते २०२० साली ४२ टक्क्यांवर पोहोचले. या पाहुण्या मुंग्यांचा उपद्रव जिथे आहे त्या भागापेक्षा जिथे त्या नाहीत अशा भागात झेब्राच्या शिकारीचे प्रमाण २.८ पट अधिक असल्याचे आढळून आले. 

हिंदी महासागरातील मॉरिशस हे मूळ असलेल्या आणि तिथून जगाच्या विविध भागात पोहोचलेल्या या पाहुण्या मुंगीचे शास्त्रीय नाव आहे - फिडोली मेगासेफाला. मॉरिशस बेटावरून ही मुंगी विषुववृत्ताच्या अवतीभोवतीच्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात पोहोचली. जिथे ती पोहोचली तिथे तिने पर्यावरणाची जबर हानी केली. दगडांखाली, लाकडाच्या ओंडक्याच्या आश्रयाने या मुंग्यांची संख्या वाढत गेली आणि हळूहळू तिथले निसर्गचक्र बदलले. विशेष म्हणजे या मुंग्यांचा समूह केवळ मुंग्यांच्या इतर प्रजातींवरच हल्ला करतो. आपल्यापेक्षा मोठ्या आकाराच्या सजीवांवर त्या शक्यतो हल्ला करीत नाहीत. ही मुंग्यांची प्रजाती जीवसृष्टीतल्या शंभर भयंकर घुसखोरांपैकी एक मानली जाते. केनियात आढळून आले की वर्षभरात पन्नास मीटर या वेगाने या मुंग्यांचा समूह अवतीभोवतीचा परिसर ताब्यात घेतो. या वेगाने जिथे जिथे त्यांचा विस्तार झाला तिथे निसर्गचक्र बदलले, पर्यावरणावर परिणाम झाला. 

(लेखक लोकमत, नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)   

shrimant.mane@lokmat.com 

टॅग्स :forestजंगलEnglandइंग्लंडscienceविज्ञान