‘पार्थची भूमिका, भाषा हीच अधिकृत’ असा आदेश काढा!
By अतुल कुलकर्णी | Updated: April 12, 2026 13:22 IST2026-04-12T13:21:51+5:302026-04-12T13:22:32+5:30
NCP News: तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या गोड मानून... अगदी हल्ली तुमच्या पक्षात जे काही चालू आहे, ते तुम्ही जसे गोड मानून घेत आहात अगदी तसेच..! काही म्हणा, पण पार्थ पवार शब्दाला पक्का ठरला. ‘बारामतीमधील काँग्रेसची उमेदवारी मागे घेण्यासाठी आपण कोणालाही भेटणार नाही, कोणाला बोलणार नाही, जे व्हायचे ते होईल...’ असे त्याने ठणकावून सांगितले होते.

‘पार्थची भूमिका, भाषा हीच अधिकृत’ असा आदेश काढा!
- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
प्रिय सुनील तटकरे जी
नमस्कार म्हणायचे की
जय महाराष्ट्र की जय श्रीराम...?
तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या गोड मानून... अगदी हल्ली तुमच्या पक्षात जे काही चालू आहे, ते तुम्ही जसे गोड मानून घेत आहात अगदी तसेच..! काही म्हणा, पण पार्थ पवार शब्दाला पक्का ठरला. ‘बारामतीमधील काँग्रेसची उमेदवारी मागे घेण्यासाठी आपण कोणालाही भेटणार नाही, कोणाला बोलणार नाही, जे व्हायचे ते होईल...’ असे त्याने ठणकावून सांगितले होते. तसेच तो वागला. शिवाय ‘काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे,’ अशी भविष्यवाणीही करून टाकली होती. तुम्ही इतकी वर्षे राजकारणात आहात; पण तुम्हाला कधी अशी भविष्यवाणी करता आली नाही. ती हिंमत पार्थने दाखवली. त्यासाठी अभ्यास लागतो. त्यामुळे त्याचे खरे तर तुम्ही अभिनंदन केले पाहिजे. जे त्याच्या आजोबांना, त्याच्या वडिलांना जमले नाही, ते त्याने करून दाखवले. तुम्हाला कोणालाही पार्थचे यश आणि त्याचे पुढे जाणे कदाचित आवडले नसेल. त्यामुळे त्याच्याविरोधात तुम्ही उलट-सुलट प्रतिक्रिया देत आहात. उलट तुम्ही तर काँग्रेसने मोठेपणा दाखवून योग्य निर्णय घेतला, असे सांगितले. त्यासाठी काँग्रेस हाय कमांडचे आभारही मानले. अजित पवार यांच्या निधनानंतर भावनिक आणि राजकीय स्थैर्य राखणारे पाऊल या निमित्ताने उचलले गेले असे सूचित केले. पार्थसारखा करारीपणा तुम्हाला दाखवता आला नाही. काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यामुळे काँग्रेसचा डाउनफॉल सुरू झाला, असे तुम्ही म्हणू शकला असतात. त्यामुळे पार्थची बाजू उचलून धरता आली असती; पण ते तुम्ही केले नाही. तुमचे चुकलेच.
कोणी कसे वागावे, कोणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पार्थच्या परस्पर रोहित पवार यांनी काँग्रेस पक्षाची माफी मागितली... रोहितने माफी मागितल्याचे खासदार सुप्रियाताईंनी सांगून थेट ‘हा शेवटी संस्कारांचा भाग आहे,’ असे स्पष्ट केले... पार्थच्या आई सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांना फोन केला. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतल्याबद्दल पार्थचे बंधू जय पवार यांनी काँग्रेसला धन्यवाद दिले. या सगळ्याचा आणि पार्थचा काय संबंध? त्याने माफी मागितली का? नाही ना... त्याने काँग्रेसला धन्यवाद दिले का...? नाही ना... पार्थच्या या धोरणी आणि दूरदृष्टीच्या राजकारणाबद्दल तुम्ही त्याचे जाहीर अभिनंदन करायला हवे. उलट तुम्ही काँग्रेसला धन्यवाद देऊन मोकळे झाला. पुढे चालून काँग्रेसमध्ये जायचा तर विचार नाही ना..?
तुम्ही असे वागता आणि तिकडे तुमचे मोठे साहेब आणि आमच्या पार्थचे आजोबा वेगळेच काहीतरी बोलतात. हातात चॅनलचे बूम घेऊन अमुक नेत्याने असे विधान केले आहे, त्यावर तुमचे काय मत आहे, असे तमुक नेत्याला विचारणाऱ्यांनी थेट शरद पवार यांनाच पार्थच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा त्यांनीसुद्धा ‘पार्थ यांच्यात किती परिपक्वता आहे, हे मी आज सांगू शकत नाही,’ असे विधान केले. आपला नातू एवढी धडपड करत असताना, इतकी ठाम भूमिका घेत असताना, आजोबांनी तरी असे बोलण्याची गरज होती का? ‘पार्थ ज्या पक्षाचा सदस्य आहे, त्या पक्षाचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. त्यामुळे आमच्या पक्षाच्या अंतर्गत विषयात अन्य पक्षाच्या नेत्यांनी बोलायची गरज नाही,’ असे तुम्ही सांगू शकला असतात. पण तुम्ही तसे काही म्हटल्याचे आमच्या ऐकिवात नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपली अडचण होऊ नये, असे तर वाटले नाही ना तुम्हाला..?
आजच्या तरुण पिढीला पार्थची भाषाच आवडते आणि समजते. जुन्या नेत्यांना तुम्ही हीच भाषा आत्मसात करायला सांगा. त्यामुळे कोणाचा तरी एकाचा डाऊनफॉल नक्की होईल आणि पार्थचे शब्द खरे ठरतील. ते शब्द खरे ठरवण्यासाठी तरी तुम्ही तुमच्यासह पक्षातील सगळ्या नेत्यांना ‘पार्थचीच भाषा यापुढे अधिकृत भाषा मानली जाईल,’ असा आदेश काढा. बाकी तुम्ही कसे आहात? नॅपकिनवाले भरतशेठ काय म्हणतात... तुम्हीदेखील नॅपकिन आणले की नाही..? असो.
- तुमचाच, बाबूराव