युद्धकाळातही इस्रायल आनंदी देशांत ‘टॉप टेन’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:10 IST2026-03-21T09:10:18+5:302026-03-21T09:10:41+5:30
सध्याच्या युद्धकालीन परिस्थितीत तर आनंदाची सगळीच परिमाणं बदललेली आहेत. त्यामुळेच अनेकांचं या रिपोर्टकडं लक्ष लागून होतं.

युद्धकाळातही इस्रायल आनंदी देशांत ‘टॉप टेन’!
जगातला सर्वांत आनंदी देश कोणता? आणि जगातला सर्वांत दु:खी देश कोणता? या यादीत भारत किंवा आपला देश कुठल्या स्थानावर आहे? ही माहिती जाणून घेण्याची जगभरातील अनेकांना उत्सुकता असते. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र दरवर्षी जाहीर करीत असलेला ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’ आणि त्याच्या निष्कर्षाकडे अनेकांचं लक्ष लागून असतं. सध्याच्या युद्धकालीन परिस्थितीत तर आनंदाची सगळीच परिमाणं बदललेली आहेत. त्यामुळेच अनेकांचं या रिपोर्टकडं लक्ष लागून होतं.
गेली अनेक वर्ष फिनलंड या यादीत पहिल्या स्थानावर आहे. २०२६च्या अहवालातही त्यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. जगातल्या सर्वाधिक आनंदी देशांतील पहिले दहा देश आहेत फिनलंड, आइसलंड, डेन्मार्क, कोस्टा रिका, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड, इस्रायल, लक्झेंबर्ग आणि स्वित्झर्लंड. भारत या यादीत ११६व्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओढग्रस्तीनं आणि आर्थिक संकटांनी त्रस्त असलेल्या पाकिस्तानचा क्रमांक मात्र भारतापेक्षा वर आहे. असं असलं तरी या अहवालात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते इस्रायलनं. गेल्या काही वर्षांपासून हा देश संघर्षातून जातो आहे. आधी हमासबरोबर आणि आता इराणबरोबर त्यांचं युद्ध सुरू आहे. तरीही या देशानं जगातल्या ‘टॉप टेन’ आनंदी देशांमध्ये आपला क्रमांक यंदाही कायम राखला आहे.
गेल्या काही वर्षांत इस्रायल सातव्या ते नवव्या क्रमांकाच्या दरम्यान फिरत होता. २०२३ आणि २०२४च्या सुमारास त्याचा क्रमांक आठवा होता. आधीपासूनच तो ‘टॉप टेन’मध्ये मजबूतपणे टिकून होता. मात्र यंदाही त्यानं आपली ही जागा कायम ठेवली असल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. साहजिकच अनेकांना हा प्रश्न पडला की, सतत संघर्ष, दहशतवादी हल्ले आणि युद्धजन्य परिस्थिती असतानाही एखादा देश ‘आनंदी’ कसा राहू शकतो?
- याचं उत्तर या अहवालाच्या मोजमापाच्या पद्धतीत दडलं आहे. ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’ हा केवळ बाह्य परिस्थिती किंवा युद्धावर आधारित नसतो, तर नागरिकांचं वैयक्तिक समाधान, सामाजिक आधार, सरकारवरचा विश्वास, आरोग्य, आर्थिक स्थिरता आणि जीवनमान यावर तो अवलंबून असतो. इस्रायल गेल्या काही काळापासून मोठ्या आव्हानांना तोंड देत असला तरी तिथली आरोग्यव्यवस्था अत्यंत मजबूत आहे, लोकांचं उत्पन्न उच्च पातळीवर आहे, देशानं तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. त्याचबरोबर तिथे सामाजिक एकजूट मोठ्या प्रमाणावर दिसते. संकटाच्या काळात लोक एकमेकांना मदत करतात. आपल्याला काहीही झालं, आपला देश कितीही संकटात असला तरीही आपण एकटे पडणार नाही आणि समाज, सरकार आपल्या पाठीशी उभं राहील हे त्यांना ठाऊक आहे. हीच भावना त्यांच्या आनंदाच्या पातळीला आधार देते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट ‘रेझिलिअन्स’- म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीतून सावरण्याची क्षमता. इस्रायलचे नागरिक अनेक दशकांपासून संघर्षाला सामोरे जात आहेत, त्यामुळे मानसिकदृष्ट्या ते अधिक सक्षम झाले आहेत. म्हणूनच बाह्य संकट आलं तरी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समाधानावर त्याचा तितका परिणाम होत नाही. उलट, संकटात एकजूट वाढते आणि समाज अधिक मजबूत बनतो. याउलट, अनेक विकसित देशांमध्ये आर्थिक प्रगती असूनही सामाजिक एकटेपणा, तणाव आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यामुळे आनंदाची पातळी घसरताना दिसते.