‘शेवटी सज्जन माणसेच जिंकतात’, ही श्रद्धा की अंधश्रद्धा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 04:55 IST2026-01-07T04:54:55+5:302026-01-07T04:55:13+5:30
सज्जन असणे ही टाकावू, प्रभावहीन गोष्ट झाली आहे की काय, अशी शंका येण्याच्या या कालखंडात ‘सज्जनशक्ती’चा शोध; दर पंधरा दिवसांनी!

‘शेवटी सज्जन माणसेच जिंकतात’, ही श्रद्धा की अंधश्रद्धा?
डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस
सज्जन आणि शक्ती हे दोन शब्द एकत्र करून निर्माण होणारा एक साधा सोपा शब्द ‘सज्जनशक्ती’! डॉ. नरेंद्र दाभोलकर त्यांच्या विवेकवादाच्या मांडणीमध्ये कायम हा शब्द वापरायचे. आपण कोणतीही विचारधारा मानत असू किंवा कोणतीच विचारधारा मानत नसू. वेगवेगळे देव आणि धर्म मानत असू किंवा अजिबात मानत नसू, आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात राहत असू तरी सज्जनशक्ती म्हटले की, त्याचा अर्थ कोणत्याही माणसाला सहज उलगडेल. प्रत्यक्षात सज्जनशक्तीविषयी आजूबाजूची परिस्थिती तपासून बघायची ठरली तर काय चित्र दिसते?
गल्लीपासून केवळ दिल्लीपर्यंतच नाही तर अगदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनपर्यंत सांप्रतकाळी सगळ्यात अडचणीत असलेली गोष्ट कोणती?- असा अभ्यास करायचा ठरला तर त्यामध्ये सज्जनशक्तीचा अगदी वरती नंबर लागेल!
काही ताजी उदाहरणे.. गल्लीपासून सुरुवात करू. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यात सज्जनशक्ती तर खूप दूरची गोष्ट; सज्जन व्यक्ती आणि सज्जनपणा यांचादेखील दुरान्वये संबंध राहिलेला नाही! पैशाचा पाण्यासारखा वापर, जातधर्माची टोकदार गणिते, बिनविरोध निवडणुका, संपूर्ण विधिशून्य युत्या आणि आघाड्या याला उधाण आल्याचे चित्र आहे.
आता दिल्लीमधील उदाहरण पाहूया. आपल्या देशाच्या राजधानीमध्ये गेल्या दहा-बारा वर्षांत हवा इतकी खराब झाली आहे की, ज्याचे नाव ते! या दिल्ली शहरात आपल्या देशाचे पंतप्रधान आणि सर्व मंत्रिमंडळ राहते, देशाचे राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, सर्व प्रमुख माध्यमकर्मी राहतात.
ते सगळे हीच हवा रोज फुफ्फुसात घेतात; पण परिस्थितीमध्ये काहीही फरक नाही! उलट ती दिवसेंदिवस खराबच होत चालली आहे. इतकेच नाही, तर दिल्लीमधील हवेच्या प्रदूषणाविषयी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या सज्जनांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची बातमी नुकतीच येऊन गेली!
देशाच्या बाहेर जगाचे सत्ताकेंद्र म्हणून अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनचे उदाहरण बघूया. तिथल्या राष्ट्राध्यक्ष महोदयांनी तर कहरच केला आहे. मनात आले की, एका देशावर हल्ला कर, कुठल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला उचलून आण, असे सर्व चालले आहे. सकृतदर्शनी सज्जन असणे ही प्रभावहीन गोष्ट झाली की काय, अशी शंका मनात येण्याच्या कालखंडात त्याच सज्जनपणा आणि सज्जनशक्ती याविषयी आपण या सदरात बोलणार आहे.
सज्जनपणा म्हणजे नक्की काय? तो माणसांच्या मध्ये कुठून आला? तो खरंच वाढवता येतो का? याविषयी आपण बोलणार आहे. जेव्हा आजूबाजूची परिस्थिती विपरीत असते तेव्हा सज्जनपणाने वागावे? की जे चालू आहे त्याच्याचमध्ये आपलाही सूर मिसळून द्यावा, अशा गोष्टींच्या विषयीदेखील आपण बोलूया.
अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपला सज्जनपणा न सोडण्याचे सामर्थ्य माणसामध्ये कुठून येते, याचापण आपण शोध घेऊ. आपल्या आजूबाजूला अशा विपरीत परिस्थितीत सज्जनपणा टिकवून लढणाऱ्या प्रेरणादायी व्यक्ती आणि घटनांना भेटूया. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ‘शेवटी विजय हा सज्जनशक्तीचाच होतो’ हे आपण स्वत:ला परत परत सांगत असलेले विधान हे श्रद्धा आहे की, अंधश्रद्धा तेदेखील तपासून पाहूया.
hamid.dabholkar@gmail.com