लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे?

By अतुल कुलकर्णी | Updated: April 13, 2025 11:01 IST2025-04-13T10:59:32+5:302025-04-13T11:01:30+5:30

हॉस्पिटलचा स्टाफ आणि हॉस्पिटलचे प्रमुख आजही लताबाईंशी प्लॅन्चेटच्या साह्याने संपर्कात असतात का?

How long have you been saying that Pandit Jawaharlal Nehru cried after listening to Lata Mangeshkar's songs? | लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे?

लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे?

-अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)

रा. रा. विजय वडेट्टीवार 
नमस्कार 
मेरी आवाज ही पहचान है... असं ज्या लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलले जायचे त्यांच्याबद्दल आपण केलेल्या बेधडक विधानांमुळे आमचे डोळे खाडकन उघडले. लतादीदी अशा होत्या...? यावर आमचा विश्वासच बसेना. त्यांच्यापेक्षा आमचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तुम्ही परखड, स्पष्ट बोलता. 

कोणतेही विधान करण्यापूर्वी त्या विषयाचा विचार किंवा अभ्यास करून तुम्ही बोलत नाही. हाच बिनधास्तपणा आम्हाला आवडतो. त्यामुळे तुम्ही, ‘‘कसले ते मंगेशकर कुटुंब. ही लुटारूंची टोळी आहे. यांच्यापैकी कुणी कधी दान केल्याचे पाहिले आहे का?’’ असे खूप काही बोललात. आपले हे अभ्यासू विचार आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनाही सांगितले पाहिजेत. कदाचित तुमच्या एवढा त्यांचा अभ्यास नसेल. 

‘‘दीदींचा आवाज हृदयाला भिडणारा, राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असा होता. त्यांचे संघर्षमय जीवन भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील...’’ असे सोनियाजींना वाटते. तुम्ही तुमचे मत त्यांना कळवून टाका, म्हणजे त्या त्यांचे विधान तात्काळ मागे घेतील. आपले नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात आपली बाजू घेतली. त्यामुळे ते देखील आपल्या सारखाच विचार न करता बिनधास्त बोलणारे आहेत, हे बघून बरे वाटले.

आत्ता या विषयाचा शेवटही तुम्हा दोघांनाच करावा लागेल. आज गोकुळात रंग खेळतो हरी..., ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे..., बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला..., असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ..., आज फिर जीने की तमन्ना है..., तू जहाँ-जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा..., ही अशी गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात तातडीने रेकॉर्ड करून घ्या. जर कोणी लताबाईंच्या आवाजातली ही असली हजारो गाणी ऐकली तर एकेकाला बघून घेईन असा दम भरा...! 

विजयभाऊ, आपला जन्म १२ डिसेंबर १९६२ चा. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात म्हणजे २७ जानेवारी १९६३ रोजी कवी प्रदीप यांनी लिहिलेले ‘‘ए मेरे वतन के लोगो..’’ हे गाणे लताबाईंनी दिल्लीतल्या नॅशनल स्टेडियममध्ये पहिल्यांदा सादर केले. त्यावेळी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अश्रू अनावर झाल्याचा इतिहास आहे. तो तातडीने बदलावा लागेल. 

पंडितजींच्या डोळ्यात काहीतरी गेले म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आले, असा काही संदर्भ मिळतो का ते लगेच शोधा. उगाच लताबाईंच्या गाण्यांवर कशाला आपल्या पंडितजींना रडू आले असे सांगत राहायचे..? हा इतिहास बदलावा लागेल... आपल्याशिवाय इतके उत्तम कार्य कोण करू शकेल?

लतादीदीला २००१ मध्ये भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्यावेळच्या सरकारवरही आपल्या  जोरदार टीकेचा आसूड ओढा. मंगेशकर हॉस्पिटलला कोणत्या सरकारच्या काळात जागा दिली याचाही शोध घ्या. जगाला आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या  लताबाईंच्या स्वभावावर आपण जागतिक व्यासपीठावरून व्याख्यानाचे नियोजन करा. 

पुण्याच्या ज्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या महिलेला दहा लाखांचे डिपॉझिट भरायला सांगणारे डॉक्टर लताबाईंचे नातेवाईक होते का? याचाही शोध घ्या. हॉस्पिटलचा स्टाफ आणि हॉस्पिटलचे प्रमुख आजही लताबाईंशी प्लॅन्चेटच्या साह्याने संपर्कात असतात का? म्हणून हे असे घडते का? यासाठी एक कमिटी बसवायला सांगा.

कोणीतरी सांगत होते की, दोन जातीत, दोन समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेणारे लोक आजूबाजूला असताना, आपण सुद्धा अशा लोकांच्या ट्रॅपमध्ये इतक्या सहजतेने सहभागी होत आहात. तीच सहजता आपल्या पक्षातल्या नेत्यांनी स्वीकारली की पाच वर्षे कसलाही त्रास होणार नाही...

यापुढे कोणीही लताबाईंनी गायलेले पसायदान ऐकायचे नाही, असाही आदेश तुम्ही काढून टाका. काही ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत, गायक हे विजय वडेट्टीवार कोण आहेत..? त्यांचा व्यवसाय काय आहे? अशी चौकशी करत होते... आपल्याला माहिती असावे म्हणून सांगून ठेवले. 

काही असो तुमच्याकडून आम्हाला अशाच विद्वत्तापूर्ण भाषणांची आणि विधानांची अपेक्षा आहे. शेवटी एकच, आपण आणि आपल्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी समाजासाठी काय काय दान केले याची यादी आपण त्या लुटारू कुटुंबाला दाखवली पाहिजे. होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 
- आपलाच बाबूराव

Web Title: How long have you been saying that Pandit Jawaharlal Nehru cried after listening to Lata Mangeshkar's songs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.