अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
By यदू जोशी | Updated: October 10, 2025 07:18 IST2025-10-10T07:17:34+5:302025-10-10T07:18:58+5:30
सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही दादा शांत राहतात. चिडणे सोडून त्यांनी महायुतीचा धर्म स्वीकारलेला दिसतो...

अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
- यदु जोशी,
राजकीय संपादक, लोकमत
विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले अजित पवार यांनी सुचविले की, ‘अनुकंपा तत्त्वावरील नोकरी तीन अपत्ये असलेल्यांना मिळत नाही, हे ठीक आहे; पण पहिला मुलगा वा मुलगी असेल आणि नंतर जुळे झाले तरी मिळत नाही हे बरोबर नाही...’ विलासराव त्यावर हसले अन् त्यांनी पहिलं मूल झाल्यावर दुसऱ्यांदा जुळे झालेले असेल तर अनुकंपावर नोकरी दिली जाईल, अशी सुधारणा केली. परवा मात्र, अजित पवार यांना वेगळाच अनुभव आला. एक माणूस आला त्यांच्याकडे. म्हणाला, ‘दादा! तीन मुले आहेत म्हणून मला अनुकंपावर नोकरी देत नाहीत; पण ते खरे नाही, मला दोनच मुले आहेत, म्हणजे तिसरा मुलगा आहे; पण त्याला मी दत्तक दिले आहे.’
त्या पठ्ठ्याचे उत्तर ऐकून दादा अवाक् झाले. तिसरे मूलच नाही हे दाखवण्यासाठी त्याने मुलगा दत्तक देण्याची आयडिया लढवली होती. पूर्वीचे दादा असते तर ‘काय खोटं बोलतो’ म्हणून चिडले असते; पण हल्ली दादांनी चिडणेच सोडले आहे.
आपल्याच ऑफिसमध्ये समजा ते वैतागलेच तर ‘तुम्ही मला चिडायला लावू नका’ एवढेच म्हणतात म्हणे. कडक शिस्तीचे, रागीट असे दादा कधी हसतील आणि हसवतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते; पण स्वत:ला इतके बदलवून घेणारा दुसरा नेता गेल्या दहा-वीस वर्षांत बघितला नाही. पूर्वी मनासारखे नाही झाले तर ते संतापायचे, आता त्यांनी समजून घेतले आहे. ‘ एक मिनिट!’... असे कधी-कधी जरा रागात म्हणतात; पण दुसऱ्याच मिनिटाला ते चक्क विनोद वैगेरे करतात.
ते का बदलले?
वयाच्या पासष्टीत अजितदादांनी स्वत:ला का बदलवून घेतले असेल? शरद पवार होते तोवर त्यांना फटकळ वागता-बोलता येत होते; पण आता ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, पक्षाला पुढे नेण्याची जबाबदारी निभावताना त्यांना स्वत:त बदल करणे आवश्यक वाटले असावे. रोखठोक बोलणे, शब्दाला जागणे, वेळ पाळणे हे गुण तर त्यांच्यात आहेतच; पण अलीकडे ‘नवे दादा’ बघायला मिळतात. ..आपली पायरी समजून घेतली की, पडण्याचा धोका नसतो. अजित पवार यांना म्हणूनच तो धोका नाही; एकनाथ शिंदे यांना मात्र आहे. सरकारमधील सगळेच निर्णय आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत हे दिसत असतानाही अजितदादा शांत राहतात. त्यांच्या नियोजन विभागाच्या अखत्यारित असलेल्या आणि सरकारचा सगळा संवेदनशील डेटा असलेल्या संस्थेचे प्रमुखपद खूप लाडावून ठेवलेल्या एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याला देण्याचे चालले आहे; पण तरीही दादा शांत आहेत. महायुतीचा धर्म त्यांनी स्वीकारला आहे.
त्यांना फ्री हँड आहे का?
राज्य सरकार दरवर्षी एक लाख कोटी रुपये विविध प्रकारच्या लाभार्थींना वाटते. त्यात लाडक्या बहिणी, शेतकरी, वृद्ध निराधार, दिव्यांग असे अनेक घटक असतात. येत्या मार्चपर्यंत राज्याच्या डोक्यावरचे कर्ज १० लाख कोटी रुपयांच्या घरात जाईल. विविध सामाजिक महामंडळांना समान निकषावर निधी दिला जातो. त्याऐवजी अतिवंचितांसाठी वेगळे निकष असावेत हा विचार मनात असूनही मांडणे आजच्या अपरिहार्यतेत अजित पवार यांना शक्य होत नाही. शेतीपासूनच्या उत्पन्नाला प्राप्तिकर लागू होत नसल्याने आठ लाखांच्या उत्पन्न मर्यादेत अनेक जण सरकारी योजनांचा मस्त लाभ घेतात. अशांना अटकाव करण्याचा विचार दादांनी मांडला, तर लगेच बाहेर त्याची चर्चा होते की, ते अमूक समाजाच्या विरोधात आहेत. लाडकी बहीण योजनेत एकाच घरातील चार-पाच महिलांना लाभ मिळत आहेत, ते बंद करून एका घरात एक वा दोन महिलांनाच लाभ दिला पाहिजे, असे खरेतर वित्तीय शिस्त असलेल्या कोणालाही वाटेल; पण दादा तसे बोलले, तर लगेच ते लाडक्या बहिणींच्या विरोधात असल्याचे चित्र तयार केले जाईल. त्यामुळे ‘आपण कशाला भानगडीत पडायचे?’ असा विचार ते करीत असावेत. कठोर वित्तीय निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अजूनही ‘फ्री हँड’ दिलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर कदाचित तो दिला जाईल. संग्राम थोपटे भाजपमध्ये गेले म्हणून त्यांच्या साखर कारखान्याला ४५० कोटी रुपयांची थकहमी देण्याचा अव्यवहार्य निर्णय एरवी अजितदादांनी कधीच घेतला नसता. थोपटे हे पवारांचे पारंपरिक विरोधक आहेत म्हणून नाही तर व्यवहार्यतेच्या निकषावर... पण तेवढे स्वातंत्र्य दादांना आहे कुठे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा पूरग्रस्तांसाठी ३१६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले, तेव्हाच त्याचा फटका विकासकामांना बसणार हे सांगितलेच आहे, निवडणुकांनंतर त्याचा प्रत्यय येईल. मुख्यमंत्र्यांची वा भाजपची अडचण होईल, अशी कोणतीही खेळी ते खेळत नाहीत. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी अजितदादा मुख्यमंत्र्यांकडे टोकाची नाराजी बोलून दाखवत नाहीत. ते जुळवून घेतात; कोणी याला माघार म्हणेल; पण भविष्यासाठीचे ते शहाणपण ठरेल. अजित पवार हे भाजपचे तुलनेने अधिक विश्वासार्ह मित्र बनत आहेत.
yadu.joshi@lokmat.com