Historical sin | ऐतिहासिक पाप
ऐतिहासिक पाप

ताजमहाल ही जगातली सर्वात सुंदर व देखणी वास्तू आहे. ती पाहायला साऱ्या जगातून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून देशाला मिळणारे चलनही मोठे आहे. शहाजहान बादशहाने आपली लाडकी पत्नी मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ बांधलेली ही वास्तू आरंभापासूनच जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनली आणि जगातल्या थोड्या मानवनिर्मित आश्चर्यात तिची गणना झाली. अशा वास्तूचे जतन करणे हा राष्ट्रीय संपत्तीएवढाच देशाचा सांस्कृतिक वैभवाच्या रक्षणाचाही भाग आहे. पाश्चात्त्य देशातील अशा वैभवशाली वास्तूंचे रक्षण केवढे काळजीपूर्वक व दक्षतेने केले जाते ते पाहिले की ताजमहालकडे होत असलेल्या दुर्लक्षाविषयी आपलेही मन विषण्ण होते. या दुर्लक्षाबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व उत्तरप्रदेशच्या सरकारांना तंबी दिली असून या वास्तूचे जतन करता येत नसेल तर ती बंद करा किंवा सरळ पाडून टाका असे त्यांना वैतागाने ऐकविले आहे. देशातील सर्वाधिक सुंदर इमारतीचा असा शेवट झालेला देशातील कोणत्याही नागरिकाला आवडणार नाही. शिवाय तो देशाच्या सांस्कृतिक इतिहासावरील सर्वात मोठा डागही ठरेल. अलाहाबादेत मायावतीचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हापासूनच या वास्तूकडे सरकार जाणीवपूर्वक वा अजाणतेपणे दुर्लक्ष करू लागले. मायावतींना स्वत:चे पुतळे व त्याभोवती हत्ती या त्यांच्या निवडणूक चिन्हांची रांग उभी करण्याची जी खोड होती त्यापुढे त्यांना ताजमहालचे जागतिक महात्म्य जाणवलेही नाही. परिणामी पर्यावरणातील बिघाडामुळे ताजमहालचा संगमरवर पिवळा होऊ लागला आणि मायावतींच्या सरकारने त्याच्या यमुनेकडील भागात फुटकळ दुकाने बांधायलाही परवानगी दिली. मायावतींच्या पश्चात सत्तेवर आलेल्या अखिलेश यादवांनी त्या वास्तूचे जतन करण्याचे काही प्रयत्न केले. मात्र त्यासाठी हव्या असलेल्या साºया सोई व सुधारणा पुरविण्यात त्यांचेही सरकार अपुरेच पडले. आताचे योगी आदित्यनाथ यांचे भगवे सरकार हे ठरवूनच ताजमहालचा द्वेष करणारे आहे. या सरकारच्या मते ही जगातली सुंदर वास्तू नसून एका मुस्लीम राणीचा तो मकबरा आहे. आदित्यनाथांच्या हिंदुत्ववादाला असा मकबरा खुपणाराही आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारने प्रथम ताजमहाल ही वास्तू उत्तर प्रदेशच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून वजा केली. त्यामुळे स्वाभाविकच पर्यटनस्थळांना दिले जाणारे संरक्षण व त्यांच्या जतनाच्या यादीतूनही ताजमहाल वजा झाले. तेव्हापासून या वास्तूची अवकळा दिवसेंदिवस वाढत गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आज जे संतापाने ऐकविले त्यामागे एका देखण्या वास्तूला या सरकारांनी आज आणलेली ही अवकळा आहे. भारताचा इतिहास हा केवळ कोणा एका धर्माचा वा संस्कृतीचा इतिहास नाही. तो त्यात आलेल्या सर्वच धर्मांचा, राजांचा आणि राजवटींचा इतिहास आहे. तो जसाच्या तसा जतन करणे व त्याचे रक्षण करीत त्याचे सौंदर्य वाढवीत नेणे ही सरकारची सांस्कृतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी सरकारला मोठ्या प्रमाणावर जागतिक चलन प्राप्त करून देणारीही आहे. एका अर्थाने इतिहासाने वर्तमानाला दिलेले हे आर्थिक वरदान आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यामागे आदित्यनाथांच्या सरकारची धार्मिक वक्रदृष्टी असेल तर मात्र ते एका मोठ्या सांस्कृतिक व राष्ट्रीय अपराधाचे धनी ठरणारे सरकार ठरेल. भारतात जैन, बुद्ध, इस्लाम व ब्रिटिश राज्यांचा इतिहास सांगणाºया अनेक देखण्या वास्तू आज उभ्या आहेत. त्या या देशाच्या ऐतिहासिक वैभवासोबतच त्याच्या वर्तमान देखणेपणात भर घालीत आहेत. ताजमहाल ही या साºया वास्तूत सर्वाधिक देखणी व मौल्यवान वास्तू आहे. तिने जगभरच्या अनेक चित्रकारांना, कवींना व कलाकारांना प्रतिभेच्या प्रेरणा दिल्या आहेत. जगाच्या वाङ्मयात अमर झालेली व साºया जगात वाखाणली जाणारी ही भारतीय वास्तू आहे. अशा वास्तूचे जतन करण्याची जबाबदारी सरकार टाळत असेल तर तो त्याचा केवळ धार्मिक वा सांस्कृतिकच गुन्हा ठरणार नसून ते त्याचे ऐतिहासिक पाप म्हणूनही वर्तमानात नोंदविले जाणार आहे.

Web Title:  Historical sin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.