अग्रलेख : चीन ७० वर्षांचा झाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 05:38 IST2019-10-03T05:36:37+5:302019-10-03T05:38:41+5:30
चीनचे अध्यक्ष शी झिपिंग तहहयात अध्यक्ष आहेत. तेच राष्ट्रप्रमुख, लष्करप्रमुख, विधिमंडळप्रमुख व पक्षाचेही सर्वश्रेष्ठ नेते. या साऱ्या बळावर व नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या मुठीत ठेवला आहे.

अग्रलेख : चीन ७० वर्षांचा झाला...
अजूनही स्वत:ला ‘कम्युनिस्ट’ म्हणवून घेणा-या चीनने मंगळवारी आपला ७० वा वर्धापनदिन साजरा केला. साम्यवादी विचारसरणी आणि माओचा डावा विचार यांना कधीचीच तिलांजली दिलेल्या व १९७५ मध्येच जागतिक स्तरावर खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेल्या या देशाने नंतरच्या काळात जी वेगवान प्रगती केली तिने त्या देशाला जगातली दुस-या क्रमांकाची अर्थसत्ता, लष्करीसत्ता व महासत्ता बनविले. नाही म्हणायला, तो देश अजूनही माओ-त्से-तुंगाचे तैलचित्र आघाडीवर लावतो; पण त्याचा आताच्या चिनी राज्यकर्त्यांशी व त्यांच्या धोरणांशी काहीएक संबंध उरला नाही. गेल्या ४० वर्षांत चीनने उद्योग वाढविले, शेती विकसित केली, सैन्य अत्याधुनिक केले आणि आपली शस्त्रागारे अण्वस्त्रांनी व क्षेपणास्त्रांनी भरली. हे करतानाच जागतिक व्यापारात उतरलेल्या चीनने आपली वस्तू अत्यल्प दरात जगात आणून अमेरिकेपासून भारतापर्यंतच्या बाजारपेठा त्यांनी भरून टाकल्या. वाढलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या बळावर त्याने देशातील ७० कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणून त्यांना सुखवस्तू जीवन प्राप्त करून दिले. चीनची ही श्रीमंती त्याचा प्रवास करणा-या कोणत्याही प्रवाशाला जाणवणारी आहे.
माओच्या काळातला अर्धपोटी राहिलेला त्याचा ग्रामीण भागही आता सधन व समाधानी बनला आहे. एवढी आर्थिक आघाडी मिळवूनही चीनने आपली राजकीय हुकूमशाही मात्र कायम ठेवली आहे. ती ठेवत असतानाच तिला इलेक्ट्रॉनिक व अन्य माध्यमांची आणि अनेक कागदी निर्बंधांची जोड देऊन जनतेला सा-या बाजूंनी बांधून टाकले आहे. चीनची माणसे जगाचे बोलतात, श्रीमंतीने व नव्याने लाभलेल्या सुखवस्तू जीवनाची चर्चा करतात; पण राजकारणाविषयी बोलणे टाळतात. ‘त्याच्याशी आम्हाला फारसे कर्तव्यही नाही’ अशी त्यांची भाषा असते. २००१ मध्ये चीनने जागतिक व्यापार संघटना व आंतरराष्ट्रीय बँकेचे सदस्यत्व स्वीकारले, त्याआधी त्या देशाला अमेरिकेच्या निक्सन व किसिंजर यांनी भेट दिली. त्यामुळे तरी त्याच्या राजकीय बंदिस्तपणात काही फरक पडेल असे जगाला वाटले; पण तसे झाले नाही. आताचे चीनचे अध्यक्ष शी झिपिंग यांची त्या देशाने आपले तहहयात अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तेच राष्ट्रप्रमुख, लष्करप्रमुख, विधिमंडळप्रमुख व पक्षाचेही सर्वश्रेष्ठ नेते आहेत. १३० कोटी लोकसंख्येचा देश त्यांनी या सा-या बळावर व नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या मुठीत ठेवला आहे.
चीनमध्ये अशांतता नाही असे नाही. झीजियांग प्रांतात असंतोषाचा डोंब आहे. हाँगकाँगमध्ये लोकशाहीचा लढा आहे. मात्र, चीनच्या मुख्य भूमीवर त्याचा मागमूसही नाही. त्यातून त्या देशाने आपली आक्रमकता कायम ठेवली आहे. भारताचा आक्साई चीन हा प्रदेश आपला असल्याचा त्याचा दावा आहे. आता तो लेहच्या भागावरही हक्क सांगत आहे. अरुणाचलचा प्रदेश व उत्तर प्रदेशातील उत्तरेकडचे काही क्षेत्र त्याला त्याचे वाटत आहे. नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश व पाकिस्तान हे देश स्वत:च्या बाजूने वळविले आहेत. दक्षिण आफ्रिकेत त्याची मोठी गुंतवणूक आहे आणि आता त्याने प्रत्यक्ष अमेरिकेशी करयुद्ध सुरू केले आहे.
चिनी जनता मनातून किती प्रक्षुब्ध आहे हे जगाला कळायला मार्ग नाही; पण स्वातंत्र्याची भूक कोणत्याही समाजाला फार काळ शांत राहू देत नाही. चीनचा इतिहास व परंपरा मोठी आहे आणि त्याने राजघराणी पाहिली आहेत. शिवाय आज त्या देशात उच्चशिक्षितांचा, तंत्रज्ञांचा, वैज्ञानिकांचा व शास्त्रज्ञांचाही वर्ग मोठा झाला आहे. शिवाय चिनी स्त्री स्वतंत्र वृत्तीची आहे. हा वर्ग आताची हुकूमशाही किती दिवस चालू देईल आणि तिच्या दडपणाखाली राहील हा जगासमोरचा खरा प्रश्न आहे. चीन त्याला उत्तर देत नाही आणि जगालाही त्याचे सत्य कळण्याचा दुसरा मार्ग नाही. जगातल्या हुकूमशाह्या गेल्या ५० वर्षांत झपाट्याने कमी झाल्या. रशियाची हुकूमशाही सैल झालेली आपण आताच पाहिली. तेच वारे कधी तरी चीनमध्येही वाहू लागेल अशी आशा जगाने बाळगली आहे. ही हुकूमशाही असेपर्यंत जगही शांत राहणार नाही.