हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 05:56 AM2023-12-05T05:56:57+5:302023-12-05T05:57:41+5:30

हमासच्या हल्ल्याची योजना इस्रायलला वर्षभरापूर्वीच कळली होती, याचा अर्थ हे गुप्तचरांचे अपयश नव्हते; तर निर्णयप्रक्रियेच्या स्तरावरील गलथानपणा होता!

Hamas Attack on Israel History Repeating?; This is what happened in 1973 | हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते

हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते

वप्पाला बालचंद्रन, माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय

न्यूयॉर्क टाइम्समध्ये १ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेली माहिती खरी मानायची तर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे असेच म्हणावे लागेल. व्यक्तीश: या माहितीला मी खूपच महत्त्व देईन; कारण रोनेन बर्गमन आणि ॲडम गोल्डमन हे दोघेही माझ्या मते इस्रायलच्या सुरक्षा क्षमतेविषयीचे जाणकार निरीक्षक आहेत. ते म्हणतात ‘इस्रायलवर ७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्याची योजना इस्रायली अधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वीच कळली होती. याचा अर्थ हे गुप्तचरांचे अपयश नव्हते; तर १९७३ साली जे घडले त्याप्रमाणे निर्णयप्रक्रियेच्या स्तरावर गलथानपणा झाला.

‘इन्टेलिजन्स ओव्हर सेंचुरी’(२०२२) या माझ्या पुस्तकात ‘योम किप्पूर युद्ध’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरब इस्रायल संघर्षांचा १९७३ चा दाखला मी दिला आहे. ६ ऑक्टोबर १९७३ ला इजिप्त आणि सीरियाच्या संयुक्त फौजांनी सॅबथ ऑफ सॅबथना चांगला धडा शिकवला होता. संपूर्ण इस्रायल त्यावेळी प्रायश्चित्ताची भाषा करत होते. प्रारंभीच्या धक्क्यानंतर इस्रायलने प्रतिहल्ला केला. हल्लेखोर फौजांचे त्यांनी बरेच नुकसान केले. २५ ऑक्टोबरला युद्धबंदी होउन लढाई संपली. इस्रायल त्यात स्पष्टपणे विजयी झाले. युद्ध संपल्यानंतर गुप्तचर यंत्रणा असफल झाल्याच्या आरोपाने डोके वर काढले. उच्चस्तरीय निर्णय प्रक्रियेच्या अपयशाकडेही बोट दाखवले गेले. परिणामी पंतप्रधान गोल्डा मायर आणि संरक्षणमंत्री मोशे दायान यांना राजीनामा द्यावा लागला. मोसादने अचानक हल्ला होण्याची पूर्वकल्पना दिली होती. परंतु ‘अमन’ या लष्करी गुप्तचर यंत्रणेने ती फेटाळून लावली असा मुख्य आरोप त्यावेळी झाला होता. दुसरा एक मुद्दा म्हणजे इस्रायली लष्करी गुप्तचर यंत्रणेला ठामपणे असे वाटत होते की अरब युद्धात उतरणार नाहीत. कारण त्यांचे मोठे नुकसान होईल. 

१९६७ मध्ये सहा दिवस चाललेल्या युद्धानंतर इस्रायली जणू अजिंक्य झाले होते हे म्हणणे त्यावेळी अमेरिकेनेही मान्य केले होते असे मी माझ्या पुस्तकात म्हटले आहे. खुद्द इस्रायली अधिकाऱ्यांनी ज्याचे सांकेतिक नामकरण जेरीको वॉल असे केले होते त्या ४० पानी युद्ध योजनेमध्ये इस्रायली शहरांवर ताबा मिळवणे, विभागीय मुख्यालयासह लष्करी तळ ताब्यात घेणे, त्याचप्रमाणे गाझा पट्टीभोवती असलेली तटबंदी तोडणे याची सुनियोजित योजना आखण्यात आलेली होती. अग्निबाण सोडून या हल्ल्यांना सुरुवात होईल असेही त्या कागदपत्रांत म्हटले होते. हमासच्या सैन्याला आतमध्ये घुसता यावे यासाठी सीमेवर लावण्यात आलेले सुरक्षा कॅमेरे आणि स्वयंचलित मशीनगन्स या ड्रोन्सच्या साह्याने उडवून देण्याचे ठरले होते. तसेच पॅराग्लायडर्स, मोटरसायकल्स आणि पायदळाचाही वापर होणार होता. सात ऑक्टोबरलाही असेच घडले. २६-११ च्या हल्ल्याच्या बाबतीत जसे घडले तसेच. फक्त या हल्ल्याची तारीख कळलेली नव्हती.

या कागदपत्रांमध्ये इस्रायली सैन्याचे तळ कोठे आहेत, किती मोठे आहेत, त्यांची संपर्क प्रणाली तसेच इतर संवेदनशील माहितीही उल्लेखलेली होती. इस्रायलचा लष्करी दलातूनच ती गेली होती किंवा कसे याबाबत प्रश्नही उपस्थित झाले. लेखक म्हणतात ‘इस्रायली तज्ज्ञांना ठामपणे असे वाटत होते की अशा प्रकारचा आणि स्वरूपाचा हल्ला हमासच्या क्षमतेबाहेर आहे. ६ ऑक्टोबर १९७३ रोजी ‘योम किप्पूर युद्ध’ सुरू झाले त्या वेळीही असेच घडले होते. इस्रायली सिग्नल इंटेलिजन्सच्या यूनिट ८२०० मधील एका ज्येष्ठ विश्लेषक महिला अधिकाऱ्याने देशाच्या तज्ज्ञांनी काढलेल्या निष्कर्षांबद्दल आक्षेप घेतला होता. हमासने हल्ला करण्याची दिवसभराची रंगीत तालीमही केली होती. गाझा विभागातील एका कर्नलने या महिला अधिकाऱ्याचे म्हणणे धुडकावून लावले. शेवटी निष्कर्ष मांडताना लेखक म्हणतात, ‘हल्ला  करण्याची क्षमता हमासमध्ये नाही हा घातक, चुकीचा विश्वास अधिकाऱ्यांनी बाळगला. १९७३ मध्ये असेच घडले होते. हमास हिंमत करणार नाही हा दृढ विश्वास त्यांच्यात इतका बिंबला होता की त्याच्या विरूद्ध ढळढळीत दिसणाऱ्या घडामोडींकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

Web Title: Hamas Attack on Israel History Repeating?; This is what happened in 1973

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.