Grandpa's in awe ... Danger danger! | दादाऽऽ जरा जपून... वाट लय धोक्याची !

दादाऽऽ जरा जपून... वाट लय धोक्याची !

- सचिन जवळकोटे

‘सत्तेसाठी संघर्ष’ तसा राजकीय नेत्यांना नवा नाही; मात्र सरळसोट मार्ग सोडून अडचणीची अवघड वाट चोखाळणाऱ्या ‘रणजितदादा अकलूजकरां’चा वेगळा फोटो हाती पडतो, तेव्हा त्यांच्या या संघर्षमय मोहिमेची घ्यावीच लागते दखल. आता काहीजणांना वाटेल हा गड-कोटाच्या ट्रेकिंगचा विषय असेल. काहीजणांच्या मनात येईल हा सत्ताधाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या विरोधी भूमिकेचा प्रश्न असेल.

दादां’चा नवा ट्रॅक...

 गेल्या आठवड्यात ‘रणजितदादा अकलूजकर’ यांना मोबाईल कॉल केला असता, 'आप जिससे संपर्क करना चाहते हैं, वो किसी काम में व्यस्त हैं ।’ अशी उत्तरं कानावर पडू लागली. आॅलरेडी झेडपीत ‘राष्ट्रवादी’चा भावी अध्यक्ष सणकून पाडणाऱ्या ‘दादांची ही कुठली नवी मोहीम !’ या विचारानं आम्ही पामर गोंधळात पडलो. शोधाशोध केली, तेव्हा हाती (म्हणजे हातातल्या मोबाईलच्या स्क्रिनवर) पडला त्यांचा ट्रॅक सुटातला स्पोर्टी फोटो. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ‘दादांचा ट्रॅक चुकला की काय ?’ अशी खाजगी कुजबूज अकलूजमध्ये सुरू झालेली; मात्र त्यांनी ड्रेसचाही ट्रॅक बदलला हे या फोटोवरून प्रथमच समजलं. हा फोटो वासोटा गडावरचा. ‘सह्याद्री’ कड्याकपारीच्या अत्यंत दुर्गम अन् धोकादायक प्रदेशातला. अशा ठिकाणी ट्रॅकसूट घालून ‘दादा’ ‘ट्रेकिंग’ला गेलेले. नेहमीचा सरळसोट मार्ग सोडून अवघड वाटेनं कसंबसं निघालेले. सध्याच्या राजकारणातही त्यांची गत अशीच झालीय हा भाग वेगळा.
या आडवाटेवर कैक काटे पसरलेले. कैक धोकादायक दरडी आ वासून ठाकलेल्या. पायाखालची जमीनही निसरडी बनलेली. थोडीजरी चूक झाली तरी काय घडेल सांगता येत नाही. अशा परिस्थितीतही ‘दादा’ एकटेच (!) हा नवा मार्ग स्वीकारून पुढं चाललेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसतोय, तरीही सांगावंसं वाटतं, ‘दादाऽऽ जरा जपून...वाट लय धोक्याची !’

सावंतांच्या ‘तैनाती सैन्या’चं अब क्या होगाऽऽ?

इन-मीन सहा महिन्यांची कॅबिनेट सत्ता मिळाल्यानंतर ‘सावंतां’नी कैक अचाट प्रयोग केलेले. त्यातलाच एक म्हणजे निवडून येण्याची शक्यता असणारे गॅरंटेड उमेदवार बाजूला सारून स्वत:च्या हक्काचं नवं सैन्य तैनात केलेलं. ‘करमाळ्यात बागल, बार्शीत सोपल अन् सोलापुरात माने अशी तीन सीटं हमखास आणणारच’ असा विडाही त्यांनी ‘मातोश्री’ दरबारात घेतलेला...परंतु ‘तैनाती’ सैन्यानं स्वत:च्या पायावर तर दगड पाडून घेतलाच; वर पुन्हा सावंतांचीही विश्वासार्हता धोक्यात आणली.
आता सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे, ज्या ‘तानाजीं’च्या जीवावर हे सारे नेते आपला मूळ पक्ष सोडून ‘बाण’ धरायला गेले, त्यांची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झालीय; कारण ‘बाण’वाल्यांच्या पक्षात यांची पोहोच ‘सावंतां’पर्यंतच...कारण ‘तुमची मातोश्री पुण्यापर्यंतच...माझ्या आॅफिसपुरतीच,' अशी संस्कृतीच गेल्या सहा-सात महिन्यात पद्धतशीर तयार केली गेलेली. हीच अवस्था चौगुलेंच्या हरिभाऊपासून ठोंगे-पाटलांच्या राजाभाऊंपर्यंत. मूळ वृक्ष वठला की बांडगुळांची कशी वाट लागते, हे पुणे नाक्यावरच्या ‘शिवशक्ती’समोर थांबलं की स्पष्टपणे जाणवतं...असो...

ऐनवेळची पर्यायी सुपारी..

नवीन ‘प्रभारीप्रमुख’ जेव्हा पद घेऊन सोलापुरात आले, तेव्हा ‘फ्लेक्सवरचे बाप’ अन् ‘मुठीतल्या नोटा’ भविष्यातली चुणूक दाखवून गेल्या. खरंतर, हा दोष ‘बरडें’चाही नसावा; कारण कैक वर्षे खुर्चीपासून दूर राहिलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची घुसमट अशी बाहेर पडली; मात्र यातही एक गंमत. ‘बरडें’ना मिळालेली ही अकस्मात खुर्ची त्यांच्या ‘प्रामाणिक अन् निष्ठावान’ भूमिकेमुळं, असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम. गोड गैरसमज. केवळ ‘सावंतां’चे पंख छाटण्यासाठी ऐनवेळी हाती लागलेली धारदार सुरी म्हणून ‘बरडें’चा वापर केला जातोय, हे न समजण्याइतपत जुने शिवसैनिक नसावेत भोळे. जाता-जाता अजून एक ब्रेकिंग न्यूज. कालच म्हणे ‘मातोश्री’कारांशी ‘सावंतां’चा मोबाईलवरून संपर्क झालेला. कैक गैरसमज दूर केले गेलेले. आता लवकरच प्रत्यक्ष भेटीतून म्हणे वाढलेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न; कारण ‘सावंतां’ना सत्ता तर ‘मातोश्री’ला एकेक ‘आमदार’ महत्त्वाचा. तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून...आलं का लक्षात...लगाव बत्ती...

कांबळेअण्णां’चं काय झालं ?

‘सामना’ चित्रपटात पत्रकारांच्या तोंडी एक डायलॉग अख्खा चित्रपटभर वाजविण्यात आलेला. तो म्हणजे ‘कांबळेचं काय झालं ?’ अगदी तस्साऽऽच प्रश्न सध्या जिल्ह्यातल्या मीडियाला पडलाय. ‘करमाळ्याच्या कांबळेअण्णांचं काय झालं ?’...कारण एकीकडं ‘बाण’वाल्यांच्या ‘महाआघाडी’ला दणका देत ते ‘अकलूजकरां’च्या ‘कमळा’सोबत गेलेले. ‘बंडखोर अध्यक्ष’ म्हणून निवडून आलेले; मात्र नंतर पुन्हा ‘मातोश्री’वर जाऊन ‘मीच कसा निष्ठावान अध्यक्ष’ हेही भासवून आलेले. त्यामुळं कुणालाच काही कळेनासं झालं की, ‘कांबळेअण्णा' नेमके कुणाचे...ते ‘कमळ’वाल्यांचे, ‘अकलूजकरां’चे की ‘बाण’वाल्यांचे ?.. आता ‘नारायणआबां’च्या नेतृत्वाखाली ही नवी खेळी की खुद्द ‘अकलूजकरां’च्याच मार्गदर्शनाखाली ही तिरकी चाल ?...कारण ‘घड्याळ’ अन् ‘हाता’शी पंगा घेतलेल्या ‘अकलूजकरां’ना ‘बाण’ कधीही जवळचा वाटू शकणारा. क्यूं की सत्ता कुछ भी कर सकती है...लगाव बत्ती...

राजपुत्रांचं दुर्भाग्य!

सध्या जिल्ह्याच्या राजकारणात ‘नेतेपुत्रां’ची नवी फळीच तयार झालीय. नुकतंच मिसरूड फुटलेल्या कोवळ्या लेकरांनाही मजबूत खुर्ची हवीहवीशी वाटू लागलीय. मात्र या पार्श्वभूमीवर ‘अनगर’ अन् ‘निमगाव’चे ‘राजपुत्र’ थोडेसे अनुभवी. तरीही या दोघांना यंदा झेडपीनं दगा दिला. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. ‘निमगाव’च्या ‘बबनदादां’नी अन् ‘अनगर’च्या ‘पाटलां’नी आयुष्यभर कैक कार्यकर्त्यांना भरभरून पदं दिलेली. मात्र स्वत:च्याच मुलांना हक्काच्या झेडपीत ते साधी खुर्चीही देऊ शकले नाहीत,         किती हे दुर्भाग्य.
सध्या आमदार असलेल्या कैक नेत्यांनीही पूर्वी झेडपी चालविलेली. त्यावेळीही टोकाचं राजकारण चालायचं; मात्र एक आदर्शवत संस्कृती या नेत्यांनी जपलेली. परंपरा टिकविलेली. मात्र आता दोन-पाच पेट्यांसाठी हजारो लोकांनी निवडून दिलेल्या मतांना अन् विश्वासाला कलंक फासणारी ‘मेंबर मंडळी’ उदयास आलीत. रस्त्यावरच दुकानदारी थाटून बसलेल्या या धंदेवाईक 'पेटीबहाद्दरां'नी ‘लोकप्रतिनिधी’ या शब्दालाच काळीमा फासलाय, हे मात्र शंभर टक्के निश्चित. कुठल्याच पक्षावर कुणाचाच वचक राहिलेला नाही, हेच यातून सिद्ध झालेलं.    लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Grandpa's in awe ... Danger danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.