Grandpa .. come to the castle! ‘Lakshmi on the lotus’ smiled to herself; Danger ticking! | दादा.. वाड्यावर या ! ‘कमळावरची लक्ष्मी’ हसली खुदकन्; घडाळ्याची टिकटिक वाजली धोक्यात!

दादा.. वाड्यावर या ! ‘कमळावरची लक्ष्मी’ हसली खुदकन्; घडाळ्याची टिकटिक वाजली धोक्यात!

- सचिन जवळकोटे

लीड वाढू लागला, तशा आवताडेंच्या बंगल्यातल्या आलिशान गाड्या पंढरपूरकडं सुसाटत निघाल्या. रस्त्यावरच्या गावांना वाटलं, मंगळवेढ्याचे नवीन आमदार डायरेक्ट मतमोजणी केंद्रावर पोहोचणार; पण नाही... या गाड्या थेट पंढरपूरच्या वाड्यावर थडकल्या. ‘प्रशांतपंत’ अन्‌ ‘समाधानदादा’ यांनी नजरेनंच एकमेकांना विजयी सलामी दिली. तिसऱ्या शत्रूचा काटा काढला म्हणून या दोन जुन्या दुश्मनांनी एकमेकांचं तोंडही गोड केलं. यावेळी ‘पंतां’च्या चेहऱ्यावर तरळलेलं ‘हुकुमती हास्य’ खूप कमी कार्यकर्त्यांना जाणवलं. कारण पुढची साडेतीन वर्षं ‘दादा..वाड्यावर या !’ हे परवलीचं वाक्य पंढरपूर- मंगळवेढ्याच्या राजकारणाची समीकरणं बदलविणारं होतं.

अखेर पंढरपूर- मंगळवेढ्याचा निकाल लागला. निकाल खरंतर भालके घराण्याचाच नव्हे, तर ‘घड्याळ’वाल्यांच्या प्रतिष्ठेचाही लागला. भीमातीरी पहिल्यांदाच कमळ फुललं.  ‘अजितदादां’चा अति आत्मविश्वास जेवढा नडला. तेवढाच परतालुक्यातील नेत्यांचा उतावळेपणाही घातक ठरला. डझनभर मंत्र्यांची फौज भीमथडी तळ ठोकून होती. मात्र, एकालाही मतदारांच्या मनाचा तळ चाचपता न आलेला. सारेच स्टेजवरून निकाल चाचपडत राहिलेले.

 ‘निमगाव’चे ‘संजयमामा’ पडद्यामागून सूत्रं हलवित होते. त्यांची शेती ‘उजनी’लगत. मात्र, याच भीमेचं पाणी पंढरीच्या वळचणीला गेल्यावर झटकन बदलतं, हे त्यांच्या लक्षातच न आलेलं. ‘फार्महाऊस’वर बड्या नेत्यांना खाऊ-पिऊ घालण्याइतकं पंढरीचं राजकारण सोप्पं नाही, हे कळायला त्यांना मतमोजणीचा दिवस पाहावा लागला. ‘फार्महाऊस’वरून सांगोल्याचे ‘दीपकआबा’ आठवले. त्यांच्याच तालुक्यातल्या विरोधकांनी पंढरीत येऊन विनाकारण ‘फार्म हौस’चं पर्सनल तुणतुणं वाजविलेलं. 

मंगळवेढ्यात लक्ष्मीदहिवडी टापूनं ‘आवताडें’ना साथ दिली. आता यात ‘लक्ष्मी’चं नाव असल्यानं ‘कमळ’वाल्यांचं ‘समाधान’ झालं, असं विरोधी पार्टीला वाटतं. मात्र, एक नक्की, हीच ‘लक्ष्मी’ तिकडच्या पस्तीस गावांमध्ये फिरवूनही रुसूनच बसली. शेवटच्या चार-पाच फेऱ्यांमध्ये ‘आवताडें’चा लीड याच गावांनी कमी केला. तहानलेल्या घशाची कोरड कधीही खुळखुळणाऱ्या खिशाचं ‘समाधान’ देऊ शकत नाही, याची जाणीव ठेवूनच या नव्या आमदारांनी आता प्रॅक्टिकल काम करायला हवं.

‘देवेंद्र नागपूरकरां’नी ‘प्रशांतपंतां’वर मोठा विश्वास टाकून मोठा जुगार खेळलेला. मात्र, ‘पंतां’नी या अनोख्या डावात भरभरून माप टाकत आपलं राजकीय भवितव्यही मजबूत करून ठेवलेलं. आता एकवर एक आमदार फ्री. विधानपरिषद फायनल. प्रचाराच्या वेळी नाराज कार्यकर्त्यांना ते एकच सांगायचे, ‘आधी आपण घरातला शत्रू संपवू. पंढरपूर तालुक्यात अगोदर आपण मजबूत होऊ. मग मंगळवेढ्याचा विचार करू,’ यावेळी ते जुनी आठवणही उलगडायचे.

 ‘औदुंबरअण्णां’चं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी १९८० साली ‘पंताच्या वाड्या’नं डिंगरे तात्यांना सपोर्ट केलेला. आधी ‘अण्णा गट’ संपविला. मग इतरांचा ‘कार्यक्रम’ केला.  आताही ‘भालके गट’ संपविण्यासाठी ‘आवताडें'चा ‘डिंगरे’ केलेला. 

आता या ऋणातून उतराई होण्यासाठी पुढची साडेतीन वर्षं मंगळवेढ्याची गाडी पंतांच्या वाड्याबाहेर थांबेलही.  ‘दादाऽऽ वाड्यावर या!’ असं स्वागत ‘पंतां’कडून केले जाईलही.  मात्र, इतर स्पर्धक ठेकेदारांची टेंडरं मॅनेज करायची सवय असलेले हे ‘समाधान’दादा आता ‘पंतां’च्या हुकुमतीला मॅनेज होणार का, हा उत्सुकतेचाच विषय.  यावर लिहायला पुढची दोन-तीन वर्षं आहेतच.  तोपर्यंत लगाव बत्ती..

‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अन्‌ ‘हात दाखवून अवलक्षण’ या दोन म्हणींमध्ये किमान चार- पाच ‘खोक्यां’चा फरक असतो, याची वास्तववादी जाणीव आता ‘शैलाताईं’ना झाली असेलच.  ‘अजितदादा’ अन्‌ ‘जयंतराव’ यांची महामंडळाची ऑफर धुडकावून यांनी काय कमावलं? अर्रर्रऽऽ आजच्यापेक्षा जास्त मतं तर त्यांना त्यांच्या कुरूल झेडपी गटात पडली होती की राव. इलेक्शनमधला खर्च वाचवून अजून ‘पाच-सात खोकी’ वर टाकली असती, तर एखादा खांडसरी प्रोजेक्ट तयार झाला असता. ‘लोक समोर गोड-गोड बोलतात; पण मतं काही देत नसतात,’ याचा कटू अनुभव असलेल्या ‘राज’यांचा ‘मनसे’ पक्ष आता ‘ताईं’साठी राहिलाय केवळ शिल्लक. उगाच नाही ‘दिलीपभाऊ’ इलेक्शनपासून दूर राहतात. तोपर्यंत लगाव बत्ती..

घड्याळ का बंद पडलं?

1} ‘काटे’ फिरण्यासाठी लागणारी ‘बॅटरी’ चार्ज न करता आलेली.
2} कैक निवडणुकांचा अनुभव असणारी मुरब्बी स्थानिक फळी शेवटपर्यंत दूरच राहिलेली.
3} गाड्या भरभरून आणलेली बाहेरची नेते मंडळी फक्त स्टेजवर भाषणं ठोकून निघून गेलेली.
4} भाऊबंदकीची गुपचूप चूल भडकाविण्याऐवजी ‘बबनरावां’चा उघड पाठिंबा घेण्याची खेळी करण्यात पार्टी कमी पडलेली.
5} ‘थोरले काका बारामतीकर’ दवाखान्यात असल्याने चमत्कार घडवू शकणारी त्यांची एकही सभा न घेता आलेली.

कमळ का फुललं ?

१) ‘कमळ’ हे ‘लक्ष्मी’चं आवडतं आसन. याची प्रचिती दोन दिवस अगोदर गावोगावी आलेली.
२) परफेक्ट मॅनेजमेंट अन्‌ प्रोफेशनल सिस्टीम कामाला आलेली.
३) पडळकर अन्‌ जयसिद्धेश्वरांसारख्या ‘सामाजिक’ नेत्यांनी आपली हक्काची एकगठ्ठा मतं फुटू न दिलेली.
४) दोन्ही तालुक्यांतील शक्ती एकत्रित आल्यानं विजयाची समीकरणं जुळलेली.
५) सहानुभूतीची लाट सारून वीज कनेक्शन कट अन‌् ऊस बिल प्रश्न पेटविण्यात नेते मंडळी यशस्वी झालेली.

Web Title: Grandpa .. come to the castle! ‘Lakshmi on the lotus’ smiled to herself; Danger ticking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.