मैत्री हीच भारताच्या स्वधर्माची पूर्वअट! भारतीय गणराज्याच्या स्वधर्माचे हे आद्य सूत्र होय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 06:52 IST2026-02-12T06:51:38+5:302026-02-12T06:52:07+5:30
भारतीय प्रजासत्ताकाचा स्वधर्म स्पष्ट करणारी चार सूत्रे धार्मिक, सामाजिक, राजकीय आंदोलनांच्या आधारे अधोरेखित करता येतात. त्या सूत्रांची चर्चा!

मैत्री हीच भारताच्या स्वधर्माची पूर्वअट! भारतीय गणराज्याच्या स्वधर्माचे हे आद्य सूत्र होय
योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया
भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना केवळ ७६ वर्षांपूर्वीच झालेली असली तरी त्याचा ‘स्वधर्म’ अत्यंत प्राचीन आहे. तीन हजार वर्षांपूर्वीच त्याचा पाया घातला गेला होता. आजचे आपले गणराज्य म्हणजे ‘भारतवर्ष’, ‘हिंदुस्तान’ आणि ‘इंडिया’ अशा तीन प्रवाहांचा त्रिवेणी संगम आहे. हा स्वधर्म आपल्याला प्राचीन भारताच्या सनातन मूल्यांत शोधता येणार नाही, तर तो विविध आंदोलनांच्या आविष्कारात आढळेल. प्रथम बौद्ध आणि जैन धर्मदर्शनांनी, त्यानंतर सुफी आणि भक्ती परंपरांनी आणि आधुनिक काळात राष्ट्रीय आंदोलनाने प्रस्थापित सत्तेला ललकारले; आपल्या सभ्यतेच्या मूल्यांचा मूळ अर्थ शोधला आणि जनमानस ढवळून काढले. भारतीय प्रजासत्ताकाचा स्वधर्म ढोबळमानाने स्पष्ट करणारी चार सूत्रे आपल्याला याच धार्मिक, सामाजिक आणि राजकीय आंदोलनांच्या आधारे अधोरेखित करता येतील. या आणि यापुढील तीन लेखांत ही चार सूत्रे मी विशद करणार आहे.
यातील पहिले सूत्र आहे- ‘मैत्री’. भिन्नभिन्न मते, पंथ, संप्रदाय आणि अनुचरांचे समूह यांचे सहजीवन हे नेहमीच भारतीय समाजाचे एक अंगभूत लक्षण राहिले आहे. सहअस्तित्व ही केवळ अपरिहार्यता न राहता, एक आदर्श म्हणून ते विकसित करण्याचे प्रयत्न येथील समाज आणि शासनकर्ते सुरुवातीपासूनच करत आले आहेत. ऋग्वेदात मित्र ही देवता मिलाफ, समन्वय आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. छांदोग्य उपनिषदात मित्र हा सामंजस्याचे प्रतीक आहे. बुद्धांनी याचाच विस्तार करून मैत्री (पाली भाषेत ‘मेत्ता’) हा चार ब्रह्मविहारांपैकी एक आदर्श म्हणून मांडला आहे. मैत्री म्हणजे द्वेषहीनता आणि समभाव. सम्राट अशोकाने द्वेषहीनता, अहिंसा आणि स्नेह यांची सांगड सामाजिक सद्भावाशी घातली. सर्वधर्मसमभाव ही शासकीय नीती आणि संयम हा सामाजिक आदर्श बनवून, अशोकानेच पंथनिरपेक्षतेचा पाया घातला.
सुलह-ए-कुल नीतीद्वारे अकबराने अशोकाच्या याच धोरणाचा विस्तार केला : ‘बादशहा कोणत्याही धर्माचे पालन करणारा असो, प्रजेला आपापला धर्म, पूजाअर्चना आणि रूढीपरंपरांचे पालन करण्याची पूर्ण मोकळीक असेल. सक्तीने धर्मपरिवर्तन होणार नाही. धार्मिक बाबी, संस्था आणि विधीपालनात राज्यसंस्था कोणताही हस्तक्षेप करणार नाही. प्रशासकीय कायदेकानून कोणत्याही विशिष्ट धर्माचे असणार नाहीत. शासन सर्व धर्मक्षेत्रे आणि संस्थांना संरक्षण आणि अनुदान देईल.’ - अकबराचे हे धोरण आधुनिक अर्थाने सेक्युलर नव्हते; पण अकबराने भारताचा स्वधर्म नीट ओळखला होता. संविधानातील पंथनिरपेक्षता म्हणजे अशोक आणि अकबर यांच्या धोरणाचाच विस्तार आहे. आजच्या भारतात ‘सेक्युलर’ हा शब्द याच अर्थाने वापरला जातो. सर्व धर्मसंप्रदायांना समदृष्टीने पाहणे आणि एकाच संप्रदायाच्या वर्चस्वाला विरोध करणे हाच आपल्या ‘धर्मनिरपेक्षते’चा सर्वसामान्य अर्थ आहे; परंतु शब्दांचा पूर्वेतिहास आणि गर्भितार्थ पाहता धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरवाद यापैकी कोणत्याच शब्दातून हा अर्थ नीट व्यक्त होत नाही. कारण आपल्याकडे धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा शब्द आपला समाज नैतिक मूल्यांबाबत उदासीन असल्याचा गैरसमज अकारण पसरवतो. या अर्थाने राज्यघटनेच्या अधिकृत प्रतीत वापरलेला पंथनिरपेक्षता हा शब्द अधिक संयुक्तिक आहे.
शब्द कोणताही असो, अशोक आणि अकबरापुढे असलेलेच आव्हानच आजही आपल्यासमोर आहे. भिन्नभिन्न धर्म व दृष्टिकोन असलेल्या माणसांमध्ये समभाव निर्माण करणे आणि वर्चस्ववाद, द्वेष आणि हिंसेला आळा घालणे ही दोन्ही आव्हाने जुनीच आहेत; पण वर्तमान परिस्थितीत ती अधिक तीव्र झाली आहेत. विविध धर्मसमूहांतील हानिकारक रूढींमध्ये सुधारणा करण्याची जबाबदारीही आजची राज्यसंस्था झटकू शकत नाही. या आव्हानाला तोंड देण्यासाठी ‘मैत्री’ आणि ‘सुलह-ए-कुल’ हाच मार्ग स्वीकारून आपल्याला सर्वधर्मसमभाव परिभाषित करावा लागेल. ही ‘देशी दृष्टी’ धार्मिकतेचा सन्मान करते. धर्माबाबत ती मुळीच उदासीन नाही. कारण धर्म हा तर नैतिकतेचा स्रोत आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माबाबत मात्र ती निष्पक्ष आहे. मैत्रीभावातून उदयाला आलेली असल्याने ही दृष्टी सर्व धार्मिक समुदायांबद्दल समभाव बाळगते. वेगवेगळ्या पंथांदरम्यान परस्परविश्वास आणि सन्मानाचे नाते रुजवत आवश्यक तेथे धार्मिक समुदायांतर्गत होत असलेले शोषणही थांबवणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी आहे.
राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत धर्मनिरपेक्षता हा शब्द केव्हा आणि का घातला गेला ही चर्चा निरर्थक आहे. आपल्या राज्यघटनेची मूलभूत बांधणीच मुळात सर्वधर्मसमभाव या तत्त्वानुसार झालेली होती. या अर्थाने सर्वधर्मसमभाव ही केवळ घटनात्मक तरतूद नाही; सभ्यतेच्या मूलभूत मूल्यांपैकी ते एक मूल्य आहे. भारत देशाला अखंड राखण्यासाठी स्वीकारलेली ती एक अनिवार्य पूर्वअट आहे. भारतीय गणराज्याच्या स्वधर्माचे हे आद्य सूत्र होय.
yyopinion@gmail.com