अग्रलेख: शरण आणि मरणाचे हिंदोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 07:06 IST2026-02-24T07:05:16+5:302026-02-24T07:06:02+5:30
एका बाजूला सुरक्षा दलाची विशेष पथके जंगलप्रदेशात एकेक नक्षलवादी, त्यांचे नेते टिपून टिपून मारत आहेत, तर दुसरीकडे असे शरणागतीचे वर्तुळ पूर्ण होत आहे.

अग्रलेख: शरण आणि मरणाचे हिंदोळे
हिंसक माओवाद्यांचा शरणागत नेता मल्लोजुला वेणुगोपाल म्हणजेच भूपती गेल्या गुरुवारी 'लोकमत'ला मुलाखत देताना आगतिकतेने सांगत होता की, 'जगलो-वाचलो तरच गोरगरिबांवरील अन्यायाविरुद्ध लढू शकू, हा विचार आधीच मनात आला होता. संघटनेचा सरचिटणीस बसवाराजू पोलिसांशी चकमकीत मारला जाण्याच्या आधीच आपण गणपती, देवजी व बसवाराजूसमोर शरणागतीचा प्रस्ताव मांडला होता. तो त्यांना मान्य झाला नाही. नंतर मे २०२५ मध्ये बसवाराजू मारला गेला.
तेव्हा संघटनेचे नेतृत्व भूपतीऐवजी देवजीकडे जाण्यामागे तो प्रस्ताव कारणीभूत ठरला. बसवाराजूच्या मृत्यूचा बदला देवजीला घ्यायचा होता. मग, ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साठ सहकाऱ्यांसह भूपती शरण आला आणि ज्याने शरणागतीला तीव्र विरोध केला त्या देवजीनेही रविवारी तेलंगणात पोलिसांपुढे गुडघे टेकले.
एका बाजूला सुरक्षा दलाची विशेष पथके जंगलप्रदेशात एकेक नक्षलवादी, त्यांचे नेते टिपून टिपून मारत आहेत, तर दुसरीकडे असे शरणागतीचे वर्तुळ पूर्ण होत आहे. वर्षभर आधी भूपतीची पत्नी तारक्का, त्यानंतर मृत किशनजीची पत्नी म्हणजे भूपतीची भावजय सुजाता शरण आली.
काल देवजीने नांगी टाकली. आता तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये एम. लक्ष्मण राव उर्फ गणपती आणि तिकडे झारखंडमध्ये मिशीर बेसरा ऊर्फ सागर उर्फ शामल हे दोघेच प्रमुख नेते माओवाद्यांच्या चळवळीत आहेत. अर्थात, त्यांचेही दिवस भरले आहेतच.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेनुसार येत्या मार्चअखेरीस या चळवळीचा नायनाट होईल. कदाचित, गणपती व सागरच्या रूपाने हे यश केंद्र व राज्य सरकारांना मिळेल. त्यातही देवजीची शरणागती निर्णायक ठरेल. २००७ मध्ये राणी बोदली कॅम्पवर हल्ल्यात ५५ पोलिसांचे बळी, २०१० मध्ये केंद्रीय राखीव दलाच्या तब्बल ७६ जवानांचा बळी घेणारा ताडमेटला हल्ला आणि त्यानंतर २०१३ मध्ये अनेक काँग्रेस नेत्यांचे जीव घेणाऱ्या झिरमघाटी हल्ल्याची योजना व अंमलबजावणी देवजीची.
माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे १९९१ मध्ये सिनेस्टाइल अपहरण त्यानेच केले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना आत्राम यांच्या सुटकेसाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले. तोवर देवजीने धर्मरावबाबांना १७ दिवस जंगलात ठेवले होते. अशा अनेक गुन्ह्यांसाठी तब्बल दहा कोटींचे बक्षीस असलेला हा जहाल सर्वोच्च मोहरा पोलिसांना शरण येणे हे सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश आहे.
क्रांतीच्या नावाने भयंकर हिंसाचार घडविणाऱ्या नक्षल्यांची तथाकथित चळवळ शेवटच्या घटका मोजत असल्याचे हे चिन्ह आहे. देशाच्या ईशान्य टोकापासून मध्य भारतातून नैऋत्येकडे केरळपर्यंत पसरलेला 'रेड कॉरिडॉर' उद्ध्वस्त होत आहे. काही ठिपके अजून शिल्लक आहेत, पण महिनाभरात तेदेखील पुसले जातील.
टी. तिरुपती ऊर्फ देवजी, तसेच मल्लाराजू रेड्डी ऊर्फ संग्राम यांच्यासह चौदा नक्षलवादी तेलंगणामध्ये शस्त्रे खाली ठेवत असतानाच तिकडे काश्मीर खोऱ्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. त्यात कुख्यात कमांडर सैफुल्लाह याचाही समावेश आहे.
याशिवाय, दिल्लीत पुन्हा हल्ल्याची योजना आखणाऱ्या आठ संशयित दहशतवाद्यांना अटक झाली. या कारवायांच्या माध्यमातून सरकार, सुरक्षा दलांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे गौतम बुद्ध व महात्मा गांधींच्या या देशात हिंसाचाराला अजिबात थारा नाही. कोणी शस्त्रे हाती घेतली तर बसवाराजू व सैफुल्लाहचे झाले तेच होणार. शस्त्रे सोडा, शांततेचा मार्ग धरा.
राज्यघटनेनुसार चालणाऱ्या लोकशाही प्रक्रियेत, देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा. या मार्गाने जाल तर भूपती, तारक्का, सुजाता, देवजीसारखे अभय मिळेल, सामान्य भारतीय नागरिक म्हणून सन्मानाने जगता येईल. प्रश्न उरतो तो वर उल्लेख केल्यानुसार अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जीव वाचविण्याच्या भूपतीच्या मार्गाचा.
राज्यघटनेच्या चौकटीत, लोकशाही मार्गाने अन्यायाविरुद्ध लढण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. भूपतीने संकेत दिले आहेत तसे प्रसंगी यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेता येईल. सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर काम करण्याचा तो घटनादत्त मार्ग आहे. लोकांनाही हेच हवे आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम अरण्यप्रदेशाला देखील रक्तपात नको आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, दळणवळणाची साधने ही जनतेची खरी गरज आहे. ही जबाबदारी लोकनियुक्त सरकारची आहे. सरकारच्या प्रयत्नांमध्ये कोणी अडथळे आणील, व्यवस्था वेठीस धरील, तर त्यांच्या नशिबी एकतर मरण किंवा शरण येण्याशिवाय पर्याय नाही.