महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 07:47 IST2025-09-29T07:42:16+5:302025-09-29T07:47:59+5:30
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?

महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
सुमारे ६० वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ डेन्मार्क. मानवतेला काळिमा फासणारी एक घटना त्यावेळी घडली होती. ग्रीनलँडमधील हजारो महिलांची त्यावेळी बळजबरी ‘नसबंदी’ करण्यात आली होती. त्यांना जबरदस्तीनं गर्भनिरोधक साधनं बसवण्यात आली होती. यातल्या काही तर केवळ बारा वर्षांच्या मुली होत्या ! बहुसंख्य महिलांना नंतर प्रचंड वेदना आणि रक्तस्त्राव झाला होता. काही महिला यामुळे आयुष्यात कधीच माता बनू शकल्या नाहीत..
या घटनेच्या ‘बळी’ ठरलेल्या, आता वृद्ध झालेल्या काही महिलांनी सांगितलं, गर्भनिरोधक साधनं बसवण्यासाठी आमच्यावर जबरदस्ती तर झालीच, पण ही साधनं बसवताना कुठली काळजीही घेण्यात आली नाही. आम्हाला प्रचंड वेदना होत होत्या. रक्तस्त्राव होत होता. तक्रार केल्यावर डॉक्टरांनी मदत, उपचारही केले नाहीत. कमालीच्या वेदना होत असल्यानं काही महिलांनी स्वत:च ही साधनं काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे त्यांच्या वेदनांत आणखीच वाढ झाली आणि आराेग्याच्याही अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. या नसबंदीचा उद्देश ग्रीनलँडची लोकसंख्या नियंत्रित करणं हा होता, ज्याला आता वांशिक भेदभावाचं प्रतीक मानलं जातं.
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी ६० वर्षांपूर्वीच्या याच घटनेबद्दल ग्रीनलँडची राजधानी न्यूक येथे नुकतीच महिलांची बिनशर्त माफी मागितली. त्यावेळी जवळपास ४५०० महिलांना जबरदस्तीनं गर्भनिरोधकं बसवण्यात आली होती. ‘स्पायरल केस’ या नावानंही ही घटना ओळखली जाते. ही घटना दुर्दैवी होतीच, पण ग्रीनलँडमध्ये झालेल्या या घटनेबद्दल डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी का माफी मागावी?
कारण तेव्हा ग्रीनलँड हा डेन्मार्कचाच भाग होता. नंतर टप्प्याटप्प्यानं त्यांना काही अधिकार दिले गेले. अर्थात, आज ग्रीनलँडचा स्वतंत्र पंतप्रधान असला, तरी ग्रीनलँड अजूनही स्वतंत्र राष्ट्र नाही, मात्र आता ते बऱ्याच प्रमाणात स्वायत्त आहे.
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन म्हणाल्या, ग्रीनलँडच्या महिलांना आज मला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे माफी! ग्रीनलँडच्या रहिवासी असल्यामुळे तुमच्यावर जो अन्याय झाला, तुमच्याकडून जे हिरावून घेण्यात आलं आणि त्यामुळे तुम्हाला जो त्रास, मनस्ताप सहन करावा लागला, त्यासाठी डेन्मार्कच्या वतीनं मी मनापासून माफी मागते!
याप्रसंगी ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक नील्सन महिलांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला काहीही विचारलं गेलं नाही. तुम्हाला बोलायची आणि ऐकून घ्यायचीही संधी दिली गेली नाही. आमच्या इतिहासातला हा सगळ्यात काळा अध्याय आहे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका महिलेनं म्हटलं की, डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी माफी मागितली ही चांगली गोष्ट आहे, पण आम्हाला सत्य आणि न्याय हवा आहे. या भाषणात नुकसानभरपाईचा साधा उल्लेखही नसल्यामुळे आम्ही अतिशय निराश आहोत. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी पीडित महिलांसाठी एक ‘नुकसानभरपाई फंड’ उभा करणार असल्याचं म्हटलं, पण हा निधी कधी, किती महिलांना मिळेल हे अजून स्पष्ट नाही. १४३ महिलांच्या एका गटानं मात्र ५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी खटला दाखल केला आहे.