पाच राज्यांच्या निवडणुका, भाजपसाठी तीन पेपर कठीण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:51 IST2026-03-17T07:51:18+5:302026-03-17T07:51:54+5:30

भाजपसाठी उरलेल्या तीन राज्यांचा पेपर मात्र कठीण आहे. त्यातही केरळ व तामिळनाडू ही दक्षिणेची राज्ये म्हणजे जेमतेम मते आणि खाते उघडण्यापुरती जागा अशीच अवस्था आहे...

Elections in five states, three papers difficult for BJP | पाच राज्यांच्या निवडणुका, भाजपसाठी तीन पेपर कठीण 

पाच राज्यांच्या निवडणुका, भाजपसाठी तीन पेपर कठीण 

पुढच्या महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य हे की, ९ एप्रिलला आसाम, पुदुचेरी व केरळचे मतदान आटाेपले की पश्चिम बंगाल व तामिळनाडू या दोन राज्यांच्या अधिक कठीण पेपरच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाला पंधरा दिवसांचा वेळ मिळेल. गाैरव गोगोईंच्या नेतृत्वात काँग्रेसने आसाममध्ये सत्ताबदलाची जोरदार तयारी केली आहे. अत्तरनिर्मितीचे शहेनशहा माैलाना बद्रुद्दीन अजमल यांचा ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट पक्ष काँग्रेसशी युती करणार का ही उत्सुकता आहे. गोगोई यांनी भाजप व एआययूडीएफ हे दोन्ही पक्ष जातीयवादी असल्याने आघाडी शक्य नसल्याचे म्हटले आहे. तरीदेखील ही आघाडी झाली तर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना भाजपची हॅटट्रिक साधणे अधिक सोपे जाईल. पुदुचेरीचे एन. रंगास्वामी यांचा एआयएनआरसी व भाजपपुढे काँग्रेसचे आव्हान आहे. भाजपसाठी उरलेल्या तीन राज्यांचा पेपर मात्र कठीण आहे. त्यातही केरळ व तामिळनाडू ही दक्षिणेची राज्ये म्हणजे जेमतेम मते आणि खाते उघडण्यापुरती जागा अशीच अवस्था आहे. 

लोकसभा निवडणुकीत थ्रीसूरमध्ये सुरेश गोपी यांच्या रूपाने भाजपने खाते उघडले आणि अलीकडे त्रिवेंद्रम महापालिका जिंकली. पण, तेवढ्या बळावर विधानसभेत यश मिळेल असे नाही. सध्या भाजपची मदार प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांचे परिश्रम व काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या छुप्या मदतीवर आहे. परिणामी, डाव्या पक्षांची एलडीएफ व काँग्रेस नेतृत्वातील यूडीएफ यांच्यातच खरी लढाई होईल, असा अंदाज आहे. या आघाड्यांना आलटून-पालटून सत्ता देणाऱ्या केरळने गेल्यावेळी ती परंपरा मोडली. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफला सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली. लोकसभेच्या वीसपैकी अठरा जागा जिंकणाऱ्या  यूडीएफची नजर आता केरळच्या सत्तेकडे आहे. तामिळनाडूमध्ये सगळा खेळ द्रविडी अस्मितेभोवती फिरतो. 

गेल्यावेळी अण्णा द्रमुकसोबत युतीमुळे भाजपने कसेबसे खाते उघडले. तेदेखील कमल हासन यांचा पराभव करणाऱ्या श्रीमती वनथी श्रीनिवासन यांच्या रूपाने. जयललितांच्या काळात यशाच्या शिखरावर असलेल्या अण्णा द्रमुकची अवस्था आता केविलवाणी आहे. थेवर समुदायावर प्रभाव असणारे माजी मुख्यमंत्री ओ. पनिरसेल्वम द्रमुकमध्ये दाखल झाले आहेत. शशिकला यांनी स्वतंत्र पक्ष काढला आहे. अण्णा द्रमुकच्या पटावर केवळ एडप्पडी के. पलानीस्वामी हा एकमेव मोहरा उरला आहे. तेवढ्यावर सत्ता तर सोडा, दखलपात्र अस्तित्वही शक्य नाही, याची पुरती कल्पना भाजपला असल्यानेच अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेट्टी कझगम म्हणजे टीव्हीकेसाेबत युतीचे प्रयत्न सुरू आहेत. विजय यांनी युतीची शक्यता नाकारली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत टीव्हीकेला घेण्यास खुद्द भाजपचे के. अण्णामलाई तसेच अण्णा द्रमुकचा विरोध आहे. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यूहरचनेत टीव्हीके आहे. 

गेल्या सप्टेंबरमधील करूर चेंगराचेंगरीचा सीबीआयकडून तपास, विजय यांचे एक जुने इन्कम टॅक्सचे प्रकरण किंवा नुकत्याच त्यांच्या पत्नीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज, अशा प्रकरणांमध्ये विजय यांच्यावर दबाव वाढेल. गेल्यावेळी कमल हासन व त्यांचा मिक्कल निधी मय्यम म्हणजे एमएनएम हा पक्ष केंद्रस्थानी होता. आता विजय यांचा टीव्हीके आहे. स्वतंत्र लढल्यास अण्णा द्रमुकला मागे टाकून प्रमुख विरोधी पक्ष बनण्याची संधी विजय यांना आहे. तामिळनाडूप्रमाणेच भाजपसमोर पश्चिम बंगालमध्ये सांस्कृतिक, भाषिक अस्मितेचे कडवे आव्हान आहे. गेली बारा वर्षे भाजपला पश्चिम बंगाल खुणावतो आहे. दोन-तीन वर्षांच्या अंतराने येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयश्री भाजपच्या जवळ येते आणि  हुलकावणी देते. २०१९ च्या लोकसभेवेळी भाजपने मुसंडी मारली. दोन वर्षांत राज्यही जिंकणार असे वातावरण तयार झाले. पण, ममतादीदींनी जबरदस्त पुनरागमन केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आधीच्या यशाची पुनरावृत्ती साधली नाही. आता पुन्हा इशारे, हाकारे, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

ममता बॅनर्जी व त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष किती आक्रमकपणे भाजपच्या आक्रमणाचा सामना करतो याचे ताजे उदाहरण म्हणजे मतदारयादीच्या एसआयआर पडताळणीचा मुद्दा. अशीच आक्रमकता आता एप्रिलच्या अखेरपर्यंत होत राहील. पाचही राज्यांमध्ये मतदारांच्या, विशेषत: महिलांच्या खात्यावर थेट रकमा जमा करण्याची स्पर्धा आहे. रेवडी संस्कृतीची भरभराट सुरू आहे. प्रादेशिक अस्मिता, थेट रकमांची खिरापत आणि युद्धजन्य स्थितीत एलपीजी गॅस व इंधनाची टंचाई हे मुद्दे किती प्रभावी ठरतात, यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून असतील.

Web Title: Elections in five states, three papers difficult for BJP