Efforts to span the classroom, not just education from infant material | शिशुसाहित्यातून फक्त शिक्षण नव्हे, तर कक्षा रुंदावण्याचे प्रयत्न
शिशुसाहित्यातून फक्त शिक्षण नव्हे, तर कक्षा रुंदावण्याचे प्रयत्न

- राजीव तांबे (शिक्षणतज्ज्ञ)

साहित्य या शब्दाचा अर्थ मी माझ्या सोयीने दोन प्रकारे घेतला आहे. एक छापील साहित्य आणि दुसरे, मुलांच्या भवतालात, परिसरात सहजी उपलब्ध असणारे साहित्य. कारण या दोन्ही साहित्यांचा मुलांच्या शिकण्याशी जवळून संबंध आहे. मुलांसाठी छापील साहित्याचा विचार करताना प्रथम त्यांच्या वयोगटाचा विचार करावा लागतो. शिशू गट म्हणजे 0 ते ५ असे समजूया. येथेही सुमारे साडेतीन ते चार वर्षांपासून मुलांना थोडीफार अक्षरे ओळखू येऊ लागतात. वारंवार येणारे शब्द ते सवयीने ओळखून (साइट रीडिंग) वाचू शकतात. त्यामुळे या शिशू गटात आणखी एक उपगट तयार होतो तो म्हणजे साडेतीन ते पाच वर्षांचा वयोगट.

शिशू गटातील पहिल्या गटासाठी म्हणजे शून्य ते साडेतीन वर्षांच्या मुलांसाठी दोन प्रकारची पुस्तके अभिप्रेत आहेत. एक wordless Books आणि दुसरी प्रत्येक पानावर सुमारे ९५% चित्रे आणि केवळ ५% मजकूर असणारी पुस्तके़ प्रथम एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, wordless Book  म्हणजे ‘चित्रवाचनाची पुस्तके’ नव्हे. चित्रवाचनाची पुस्तके आणि wordless Books  या दोहोंत जरी संपूर्ण चित्रेच असली तरी या दोघांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. तो आधी समजून घेऊया. चित्रवाचन पुस्तकात केवळ चित्रेच आहेत आणि ती चित्रे ही मुलांना परिचित असणारी. त्यांच्या भवतालाशी निगडित. प्रत्येक चित्रात भरपूर क्रिया,action packed pictures. ज्यामुळे ही चित्रे दाखवून मुलांना खूपशा माहितीच्या असणाऱ्या गोष्टी दाखवता येतात. ही चित्रे दाखवून, कोण काय करते आहे? कुठे काय होत आहे? असे प्रश्न पालक किंवा शिक्षक विचारतात किंवा त्यांनी तसे विचारावेत अशी अपेक्षा असते. काही चित्रवाचनाच्या पुस्तकांसोबतच मुलांना कुठले प्रश्न विचारावेत याची एक सूचीही मिळते.

या वयोगटातील मुलांच्या मनात काही अजब प्रश्न असतात, असे प्रश्न जे ते मोठ्या माणसांना विचारायला घाबरतात. उदा. सगळ्या झाडांची पानं वेगवेगळी का असतात? समुद्राचं पाणी खारट का असतं? मांजरं गाणी म्हणतात का? मगरी कशा हसतात? अशा प्रश्नांची टिंगल न करता, त्यांना मुलांच्याच गमतीशीर भाषेत मजेशीर उत्तरे देणाऱ्या गोष्टींची पुस्तके फारच कमी आहेत.
या वयोगटातील मुलांना वाहने आणि महाकाय वाहन प्रकार यात प्रचंड रस आहे. खेळण्यांच्या दुकानात गेलं तर हे सहजी लक्षात येईल. उदा. टँकर, कंटेनर, ट्रक, जेसीबी, सिमेंट मशीन्स, रोड रोलर आणि इंजीन्स याचे फारच आकर्षण मुलांना आहे. आणि मग थोडं वय वाढल्यावर गाड्या, गाड्यांचे प्रकार आणि फास्ट जाणा-या गाड्या.

मुख्य म्हणजे, टँकर, ट्रॅक्टर, जेसीबी हीच मुख्य पात्रे असणारी आणि त्यांच्या अनुषंगाने उलगडत जाणाºया फँटसी कथांची पुस्तके मराठीत बहुधा नसावीत असं मला वाटतं. (अशा गोष्टी सध्या मी लिहितो आहे.) इथं शिकणं दोन पातळ्यांवर होत असतं. चित्रातून परिचित गोष्टींचा आढावा घेत आणि अपरिचित विलक्षण गोष्टी समजून घेत. याचवेळी मुलाला गोष्ट वाचून दाखवणारा आणि गोष्ट सांगणारा याची महत्त्वाची भूमिका सुरू होते. महत्त्वाची कारणं, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही एकमेकांकडून शिकत असतात.
बोलून, प्रश्न विचारून, समजून घेऊन, तर्क करून, वाढणाºया शब्द संपत्तीचा उपयोग करत, नव्यानेच समजलेल्या संकल्पनांना, जाणिवांना आपलेच वेगळे शब्द जोडत शिकण्याची निरंतर प्रक्रिया सुरू होते.

विनोबांनी शिक्षणाची चांगली व्याख्या केली आहे, ‘जे देता येत नाही ते शिक्षण.’ ज्या पालकांना किंवा शिक्षकांना असं वाटतं की, आपण मुलांना शिकवतो, मुलांना घडवतो किंवा आपण मुलांवर सुसंस्कार करतो तर तो त्यांचा भ्रम आहे. आपण कुणालाही शिकवू शकत नाही तर शिकण्यासाठी प्रेरित करू शकतो हे एकदा समजून घेतलंच पाहिजे.
बालसाहित्याचं किंवा साहित्याचं नेमकं प्रयोजन काय? मुलांना शिकवणं, उपदेश करणं, तात्पर्य सांगणं, संस्कार करणं किंवा त्यांना घडवणं हे तर नव्हे आणि नव्हेच. बालसाहित्याचं प्रयोजन आहे, मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य हे मुलांना शिकवत नाही तर शिकण्याच्या अनेकानेक पद्धती, विविध पर्याय मुलांसमोर सहजी उलगडून ठेवतं आणि मुलाला त्याच्यातील सुप्त शक्ती व सर्जनशीलता यांची जाणीव करून देतं. कारण बालसाहित्याचा पाया हा ‘मुलांना गृहीत धरणं’ हा नसून ‘मुलांवरचा अपार विश्वास आणि मुलांवर निरपेक्ष प्रेम’ हा आहे.


Web Title:  Efforts to span the classroom, not just education from infant material
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.