विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

By सीमा महांगडे | Updated: June 16, 2025 07:59 IST2025-06-16T07:57:25+5:302025-06-16T07:59:24+5:30

दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश.

Education Department fails in 11th admission! | विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

सीमा महांगडे,प्रतिनिधी: दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश. मात्र, प्रवेश प्रक्रिया राबवणारी शिक्षण विभागाची सुस्त आणि नादुरुस्त यंत्रणा पालक-विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप देत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आहेतच. शिवाय अल्पसंख्याक कोटा आणि अंतर्गत कोट्याबाबत शिक्षण संचालनालयाने आयत्यावेळी घेतलेल्या निर्णयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे. अल्पसंख्याक संस्थांमध्ये सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वीही मागे घ्यावा लागल्याचा अनुभव असताना पुन्हा प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लवकर लागला असला तरी अकरावी प्रवेश सुकर होतील, अशी परिस्थिती नाही.  

 राज्याचा शिक्षण विभाग दरवर्षी आपल्या नियोजन शून्यतेची प्रचिती देतो. नियोजनात हा विभाग दरवर्षी नापास का होतो, अपयशी का ठरतो, असा प्रश्न आहे. मुळातच यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभरात ऑनलाईन राबविण्याचा निर्णय आयत्यावेळी घेण्यात आला. मात्र, त्यातील तांत्रिक अडचणींची शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.   

वेबसाइट बंद पडणे, प्रवेशाच्या वेळापत्रकात पुन्हा पुन्हा बदल करणे आदी अडचणींचे विद्यार्थ्यांमागील शुक्लकाष्ट कायम आहे. त्यामुळे याही वर्षी अकरावीचे वर्ग उशिरा सुरू होण्याची लक्षणे आहेत. या उशिरामुळे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार?  प्रवेशात सध्या फक्त तारीख पे तारीख प्रकार सुरू आहे. अर्ज भरण्यापासून ते यादी जाहीर होईपर्यंत फक्त नवीन तारखांचे वेळापत्रक दिले जात आहे. मग राज्यभक एकाच वेळी  ऑनलाइन प्रवेश हा निर्णय घेताना सेवा देणाऱ्या कंपन्यांना तांत्रिक अडचणी किंवा येणाऱ्या भाराची कल्पना नव्हती का?, किंबहुना शिक्षण विभागाने याची चाचपणी आधीच का केली नाही?, जर नियोजन नसताना प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असेल, तर शिक्षण विभागाच्या ‘शिक्षणा’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते.   
प्रवेशाच्या अनेक फेऱ्या होऊनही महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने जागा रिक्त राहणे आणि दुसरीकडे विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित राहणे, हा विरोधाभास अनाकलनीय आहे. विशेष म्हणजे असा विरोधाभास का निर्माण होतो ते शोधण्याची तसदीही शिक्षण प्रशासनातला कुणी तज्ज्ञ घेताना दिसत नाही.  

शेवटी काय, दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवूनही येरे माझ्या मागल्या घडत असेल आणि अकरावी प्रवेशासाठी एक फूलप्रूफ, अचूक व्यवस्था शिक्षण विभाग निर्माण करू शकत नसेल तर याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाहीतर सब चलता हैं च्या नावाखाली सुरू झालेली अकरावी प्रवेशाची ही ढकलगाडी पुढे जाऊन वर्षभर चालली आणि विद्यार्थ्यांनी अकरावी ऐवजी इतर वाटा निवडल्या तर नवल वाटायला नको!

Web Title: Education Department fails in 11th admission!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.