Editorial view on Corona Virus The Ground Reality of Our Healthcare Workers | Corona Virus : 'या' फोटोंनी जीव कासावीस होतोय...! 

Corona Virus : 'या' फोटोंनी जीव कासावीस होतोय...! 

- अतुल कुलकर्णी

पुण्याच्या हॉस्पिटलमधील हे फोटो आहेत असे म्हणत एका मित्राने मला हे फोटो पाठवले. हे फोटो पाहून मन सुन्न झाले... जीव कासावीस झाला.... कोण आहेत हे लोक..? कोणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळे काम करत आहेत...? ज्यांच्यासाठी ते हे करत आहेत, त्या लोकांना काही पडलेली आहे का स्वतःची, स्वतःच्या घरच्यांची...?

कोरोना वॉर्डात नातेवाईकांना जात येत नाही. त्यावेळी हेच डॉक्टर्स त्यांचे नातेवाईक होतात. त्यांच्यावर औषधोपचार करतात. मानसिक आधार ही देतात. पहिल्या लाटेच्या वेळी अनेक डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पीपीई किट घालून डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आम्हाला त्याची गंमत वाटली, काहींना डॉक्टर, नर्सेस मजा करत आहेत असेही वाटले असेल. पण ते त्याहीवेळी स्वतः सोबतच रुग्णांना मानसिक आधार देत होते, त्यांना दिलासा देत होते... आम्ही आहोत तुमच्यासाठी असे सांगत होते...

माझे मित्र आणि नाट्य दिग्दर्शक आणि लेखक चंद्रकांत कुलकर्णी व प्रशांत दळवी दोघे गोरेगावच्या मुंबई महापालिकेने बनवलेल्या कोविड सेंटरमध्ये ऍडमिट होते. त्यावेळी तिथे त्यांना मिळालेली सेवा आणि वागणूक पाहून आपण परदेशात तर नाही ना, असा भास त्यांना पदोपदी होत होता. मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये देऊन जी सेवा मिळणार नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त, समरसून डॉक्टर काम करत होते. हा त्यांचा अनुभव होता. माझा एक सहकारी दहिसरच्या कोविड सेंटर मध्ये ऍडमिट होता. तेथे त्याच्या सतत घाबरून जाण्याच्या स्वभावामुळे डॉक्टर त्यावर बारीक लक्ष ठेवून होते. तो बरा झाल्यानंतर त्यानेच त्याला मिळालेल्या ट्रीटमेंटचा विचार केला. तेव्हा तो अनंत उपकाराच्या भावनेने ओक्साबोक्सी रडायचा बाकी होता... 

ना नात्याचे... ना ओळखीचे... असे शेकडो, हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. रुग्णसेवा देताना ते काय खात असतील, कुठे झोपत असतील, याचा विचार तरी हे फोटो पाहण्याआधी आमच्या मनात आला होता का..?

फोटो कुठले का असेनात, पण हे डॉक्टर्स ज्या जाणिवेने काम करत आहेत त्यांना शतशः नमन..! त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. ते त्यांची जबाबदारी विसरले नाहीत. आम्ही मात्र अत्यंत बेजबाबदारपणे मास्क न लावता बाहेर फिरत आहोत, सगळे नियम धाब्यावर बसवत आहोत, आणि त्यातून कोरोना वाढला की जे कोणते सरकार असेल त्यांच्या नावाने बिल फाडून मोकळे होत आहोत. आमची काहीच जबाबदारी नाही का..? आम्हाला जगाची सोडा, आमच्या परिवाराचीही काळजी नाही का..? मला काही होत नाही असे म्हणणाऱ्यांना कोरोनाने सोडले नाही. सर्वात सुरक्षित असणाऱ्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देखील कोरोनाने सोडले नाही. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत... राष्ट्रपतींनी आणि त्यांच्या स्टाफने काय कमी काळजी घेतली असेल का...? पण त्यांनादेखील कोरोना झाला. त्यातून ते बरे होऊन परत आले. मात्र आपण कसल्या ढेकीत वावरतो आहोत कळत नाही. सरकारने घालून दिलेले नियम मोडण्यात आम्हाला धन्यता वाटते. आम्ही कसे पोलिसांना उल्लू बनवून फिरून आलो याच्या कथा आणि रंगवून सांगत राहतो. मुंबईत एका व्यक्तीने पोलिसांना भर रस्त्यात शिवीगाळ केली. नंतर हात जोडून माफी मागितली. पण त्या माफीला अर्थ काय..? 

तुम्हाला बोलायला काय जातंय, आमच्या पोट हातावर आहे. आम्ही बाहेर जाऊन काम केल्याशिवाय आम्हाला रोजीरोटी मिळणार नाही. असा पवित्रा काही जण घेतीलही. त्यात त्यांची चूक नाही, मात्र गेल्या वर्षी कडेकोट लॉकडाऊन असताना देखील कोणी उपाशी राहिले नाही. पूर्ण जेवण भले त्यांना मिळाले नसेल, पण काही ना काहीतरी खायला मिळाले... त्या एक वर्षाच्या लॉकडाऊनने आम्हाला खूप काही शिकवलं. आज ज्यांची ऐपत आहे त्या आहे रे वर्गाने, नाही रे साठी मदतीचा हात पुढे केला, तर हा जगन्नाथाचा गाडा आम्ही रेटून नेऊ शकतो... या संकटकाळात अनेकांनी जिवापाड मेहनत घेतली, अनेकजण आजही ती मेहनत घेत आहेत. स्मशानभूमीत शेकडो प्रेतांना अग्नी देणाऱ्या किंवा दफन करणाऱ्या व्यक्तीच्या भावना काय असतील याचा विचार मनात आणून पाहा... बेवारस पडलेली डेड बॉडी आठवून पहा... भरपूर संपत्ती असूनही जग कायमचे सोडून जाताना जाताना शेवटचा निरोप द्यायला देखील कोणी येत नाही हे लक्षात घेतले तर अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील...

दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने एकमेकांच्या विरुद्ध आरोपांची राळ सुरु केली आहे, त्याला तोड नाही... कारमध्ये एकटा माणूस जात असेल, तरीही त्याच्या तोंडाला मास्क पाहिजे, असे उच्च न्यायालय सांगते. पोलिसही अशा लोकांना दंड ठोठावतात. मात्र पाच राज्यात निवडणुकांसाठी हजारोंच्या संख्येने जाहीर सभा होतात. त्या ठिकाणी नेतेच मास्क लावत नाहीत, त्यांचे पाहून कार्यकर्तेही तसेच वागतात. त्यांना दंड ठोठावण्याचा विचारही कोणत्या यंत्रणेच्या मनात येत नाही. हे सगळे विदारक आहे. इकडे आपल्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष, केंद्र सरकारच्या बचावासाठी महाराष्ट्रद्रोही भूमिका घेताना दिसत आहे तर महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्ष नेते संधी मिळेल तेथे वाटेल ती आणि नको ती विधाने करत आहेत. या नेत्यांनी तरी हे फोटो नीट पाहावेत आणि स्वतःच्या तोंडाला मास्क लावून गप्प कसे बसता येईल याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा केली तर ती चुकीची ठरेल का..? जागा मिळेल तेथे काही काळ विश्रांती घेणाऱ्या या डॉक्टर्सना, नर्सेसना अंतःकरणातून सलाम...! येशू ख्रिस्ताच्याच भाषेत सांगायचे तर, राजकारणी आणि बेजबाबदार नागरिक जे काही वागत आहेत, ते त्यांना कळेनासे झाले आहे... हे प्रभू, त्यांना माफ कर...! सद्बुद्धी दे... त्याहीपेक्षा हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस आणि विविध शासकीय यंत्रणेतून काम करणाऱ्या देशभरातील कर्मचारी अधिकाऱ्यांना चांगले काम करण्याचे बळ दे... या सदिच्छांसह...

(लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

English summary :
Editorial view on Corona Virus The Ground Reality of Our Healthcare Workers

Web Title: Editorial view on Corona Virus The Ground Reality of Our Healthcare Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.