..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 06:30 IST2026-05-09T06:29:19+5:302026-05-09T06:30:42+5:30

लोक घाबरतात, कारण यंत्रणा क्रूर आणि निरंकुश झाल्या आहेत. ‘मी काही बोललो, तर पुढे काय होईल?’ ही भीती. मग लोक स्वत:च सेन्सॉरशिप स्वीकारतात.

Editorial Special Articles so songs of rebellion will definitely hit the streets! | ..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!

..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!

‘विद्रोही साहित्य’ ही संकल्पना आजच्या काळात नेमकी कशाविरुद्ध उभी आहे?

- विद्रोही साहित्य ही केवळ एखाद्या सत्तेविरोधातील भूमिका नाही; ती माणसाला माणूस म्हणून नाकारणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेविरुद्धची लढाई आहे. सांस्कृतिक अधिसत्ता तळागाळातील माणसांना स्वीकारत नाही, त्यांचं साहित्य, कला, अभिव्यक्ती यांना स्थान देत नाही. उलट त्यांना ‘दलित साहित्य’, ‘आदिवासी साहित्य’ अशा चौकटींत बंदिस्त केलं जातं. माणूस म्हणून त्यांची ओळखच नाकारली जाते. त्यामुळे ही लढाई माणुसकीच्या मान्यतेसाठी आहे.

मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण

विद्रोही साहित्य संमेलनं ही मुख्य प्रवाहातील संमेलनांची ‘पर्यायी’ आवृत्ती आहे का?

- आधी “मुख्य प्रवाह” कोणाचा, हे ठरवलं पाहिजे. हजारो वर्षे काही मोजक्या लोकांनीच साहित्याचे मापदंड ठरवले.

मी नेहमी म्हणतो -“विषाची जिथे लावली रोपटी, त्या गावातले दूध प्यावे कसे?

मुबारक तुला बेईमानी तुझी,

पंगतीला तुझ्या मी बसावे कसे?”

म्हणजे बाळाच्या आकाराने पाळणा तयार करा. पाळण्याच्या आकाराने बाळं तयार करता येत नाहीत. साहित्य-कलेचे जे मापदंड आहेत, ते तुमचे आहेत. विद्रोही संमेलन हे पर्यायही आहे आणि विरोधही. ज्यांना मुख्य प्रवाहात स्थान नाही, त्यांच्यासाठी हा मंच उभा राहतो. साहित्य संमेलनांच्या मंडपाबाहेर कामगार घाम गाळतात; पण त्यांच्या आयुष्याविषयी साहित्यिक चर्चांमध्ये किती बोललं जातं? हा खरा प्रश्न आहे.

कलाकाराने भूमिका घ्यावीच का, की ‘निरपेक्ष’ राहणं हीसुद्धा एक भूमिका आहे?

- भूमिका न घेणं हीसुद्धा भूमिका असते. प्रश्न एवढाच आहे की, तुम्ही कुणाच्या बाजूने उभे आहात. समाजात विषमता असताना दबलेल्यांच्या बाजूने उभं राहणं आवश्यक आहे; अन्यथा तुम्ही आपोआप सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभे राहता. महात्मा फुल्यांनी ग्रंथकार सभेला पत्र लिहून स्पष्ट सांगितलं होतं - “तुमच्या साहित्यात माझ्या माणसाचं प्रतिबिंब नाही.” समरसतेची भाषा वरच्या लोकांची आहे; आम्हाला समता हवी आहे. कलाकाराला भूमिका घ्यावीच लागते. कलाकार “हेही बरोबर आणि तेही बरोबर” असं म्हणत दोन्हीकडे जाऊ शकत नाही.

आजचा लेखक किंवा कलाकार पुरेसा धाडसी आहे का, की तो स्वतःच सेन्सॉरशिप स्वीकारून ‘सेफ’ खेळतोय?

- लोक घाबरतात, कारण यंत्रणा अधिक क्रूर आणि निरंकुश झाल्या आहेत. “मी काही बोललो तर पुढे काय होईल?” ही भीती आहे. एका कवीने नेहरूंसमोर त्यांच्याविरोधात कविता म्हटली होती. त्यावर नेहरू म्हणाले, “कविता चांगली आहे. मला सुधारायला संधी आहे.” आज कुणाविरोधात कविता लिहिलीत तर तुम्हाला ते अभय आहे का? आज निर्भयतेचा अवकाश संकुचित होत चाललाय. सोशल मीडियावर एखादी पोस्ट लिहिली, तरी झुंडी मागे लागतात. त्यामुळे लोक स्वतःच सेन्सॉरशिप स्वीकारतात. हा निर्भयतेच्या अवकाशाचा प्रश्न आहे. खरे विद्रोही मात्र किंमत चुकवायला तयार असतात. खरी कविता ही राजकीय विधान असते. ती योग्य वेळी योग्य घाव घालत असेल, तर तिची किंमत मोजावीच लागते.

विद्रोही चळवळींवर ‘फक्त विरोध, ठोस पर्याय नाही’ असा आरोप होतो. त्याबद्दल तुमचं मत?

- जोपर्यंत विरोध जनमानसात उतरत नाही, तोपर्यंत तो विरोधच राहतो. आता व्यवस्था इतकी बधीर झाली आहे की तिला काही फरकच पडत नाही. त्यामुळे तो विरोध संघटित चळवळीत रूपांतरित होत नाही. मी लिहिलंय - “नव्यानं गाणं गातो, धक्का चावडीला देतो...” पण चावडीपर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. मग तो विरोधच राहतो.

तुमच्या गाण्यांनी अनेक चळवळींना आवाज दिला. पण, आजच्या तरुणाईला रस्त्यावर उतरवण्याइतकी ती ऊर्जा अजूनही आहे का?

- जिथे लढा आहे, तिथे गाणी आहेत. पण लढा फक्त गाण्यांनी उभा राहत नाही. अमर शेखांच्या गाण्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ऊर्जा दिली, पण अत्रे, डांगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांची राजकीय चळवळ नसती, तर एकट्या गाण्यांनी काही झालं नसतं. आज यूट्यूबमुळे गाणी मोठ्या प्रमाणावर तरुणांपर्यंत पोहोचत आहेत. पण एक सत्य मान्य करावंच लागेल - आजचा तरुण चळवळींपासून काही प्रमाणात तुटलेला आहे. मात्र उद्या आंदोलनं उभी राहिली, तर ही गाणी नक्कीच पुन्हा रस्त्यावर ऐकू येतील.

अध्यक्ष म्हणून या संमेलनातून एखादा एकच ‘अस्वस्थ करणारा’ प्रश्न समाजासमोर ठेवायचा झाला, तर तो कोणता असेल?

- आज माणूसपणाचं भान वारंवार हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. काहीही करा, काहीही सहन करा; पण माणूसपण हरवू देऊ नका. माणूसपण जिवंत राहिलं, तरच उद्याची सकाळ उगवेल. आज माणूसपण मारण्याचंच काम सुरू आहे.

Web Title : विद्रोही गाने आंदोलनों के साथ सड़कों पर जरूर आएंगे!

Web Summary : विद्रोही साहित्य केवल सत्ता के खिलाफ नहीं, अमानवीयता के खिलाफ है। कला में दबे हुए लोगों का प्रतिबिंब होना चाहिए; तटस्थता अत्याचारियों की मदद करती है। डर के कारण आज के कलाकार आत्म-सेंसरशिप करते हैं। गाने आंदोलनों को बढ़ावा देते हैं, लेकिन राजनीतिक कार्रवाई महत्वपूर्ण है। इंसानियत न खोएं।

Web Title : Rebellious songs will surely hit the streets if movements rise!

Web Summary : Rebellious literature fights against dehumanization, not just authority. Art must reflect the oppressed; neutrality aids oppressors. Today's artists self-censor due to fear. While songs fuel movements, political action is vital. Don't lose humanity.