‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे उन्हाळा इतका असह्य झाला आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 06:40 IST2026-05-07T06:40:01+5:302026-05-07T06:40:45+5:30

शहरांचे शास्त्रशुद्ध नियोजन आणि तशी कृती अत्यंत गरजेची. अन्यथा या उष्म्यात शहरे आणि गावे राहण्याजोगी उरतील का, हा प्रश्न जास्त तातडीचा !

Editorial Special Articles Has summer become so unbearable because of 'global warming'? | ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे उन्हाळा इतका असह्य झाला आहे?

‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे उन्हाळा इतका असह्य झाला आहे?

अभिजित घोरपडे, संस्थापक, भवताल पर्यावरण मंच

साधारण दोन आठवड्यांपूर्वी (२५ एप्रिल) विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा येथे तर ४६ अंशांच्याही पुढे. सर्वाधिक, ४६.९ अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदवले गेले. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच ठिकाणी तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला होता. हे केवळ दिवसाच्या तापमानापुरतेच नव्हते, तर रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी मिळणारा दिलासासुद्धा अनुभवायला मिळत नव्हता. अशा परिस्थितीत शारीरिक - मानसिक त्रास, आरोग्याचे प्रश्न, अस्वस्थता हे सारे घडते.

या अस्वस्थतेला सामोरे जाताना त्यामागच्या कारणांचा मागोवा घेतला जातो. मात्र, त्यात काहीसा गोंधळ होतो आणि अनेक चुकीच्या, अवैज्ञानिक, एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या आणि भीतीदायक गोष्टी पसरतात, पसरवल्या जातात. त्यात समाज माध्यमांवरून, विशेषत: व्हाॅट्सॲपवरून पसरवल्या जाणाऱ्या काही मेसेजेसचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, या स्थितीमागची कारणे, विज्ञान आणि संभाव्य परिणाम जाणून घेणे गरजेचे ठरेल.

महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल, मे हे महिने, तर विदर्भासारख्या काही प्रदेशांसाठी या दोन महिन्यांसोबतच जून महिना हा तीव्र उकाड्याचा कालावधी असतो. याच काळात ठिकठिकाणचे कमाल तापमानही नोंदवले जाते. पण या सर्वच काळात उष्मा एकसारखा नसतो. त्यात काही कारणांमुळे चढ-उतार होत असतात. कधी उत्तरेकडून वाहत येणारे उष्ण-कोरडे वारे तापमानात भर घालतात, कधी प्रति-चक्रवाती (अँटी-सायक्लॉन) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थितीमुळे हे घडते, तर कधी हवेतील आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण उष्म्याला असह्य बनवते. सध्या राज्यभर अनुभवायला मिळणाऱ्या उष्म्याच्या स्थितीमागे प्रति-चक्रवाती वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे.

वातावरणात विशिष्ट उंचीवर (सध्या ३ ते ५ किलोमीटर उंचीवर) वारे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहत आहेत. अशा स्थितीत वरच्या थरातील हवा खालच्या बाजूला ढकलली जाते. परिणामी, तो प्रदेश कसल्या तरी आवरणाने झाकल्यासारखी स्थिती निर्माण होते. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होते. शिवाय, हवा फारशी वाहत नाही. त्याच वेळी आकाश निरभ्र असल्याने सूर्याची किरणेसुद्धा प्रखर असतात. या सर्वांचा परिणाम म्हणून तापमानात वाढ होते आणि हवा खेळती राहत नसल्याने रात्रीच्या वेळीसुद्धा उकाड्याचा त्रास जाणवतो. ही स्थिती जितके जास्त दिवस कायम राहील, तितकी त्याची तीव्रता वाढते.

महाराष्ट्रात सध्या तरी याच स्थितीमुळे उष्म्याची दाहकता वाढली आहे. त्याची तीव्रता कमी झाली, तरी ती कायम राहील. काही ठिकाणी कदाचित, वादळी पाऊसही होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हे इतकेच आहे, पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात. काही जणांनी या उष्म्याचा संबंध पुढील काही दिवसांतच येऊ घातलेल्या ‘एल-निनो’ या घटकाशी जोडला आहे. पण, वस्तुस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी आहे. ती समजून घेणेही महत्त्वाचे आहे.

‘एल-निनो’ हा भारतासह जगाच्या हवामानावर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक. तो दर २ ते ७ वर्षांनंतर सक्रिय होतो. तो सक्रिय होतो तेव्हा विषुववृत्तावरील प्रशांत महासागराच्या (पॅसिफिक ओशन) काही भागांतील पृष्ठभागाचे तापमान वाढते. त्याचा परिणाम म्हणून वातावरणाचे तापमानही वाढते, ही वस्तुस्थिती आहे. काही जणांनी त्याचा संबंध महाराष्ट्रात आता वाढलेल्या तापमानाशी जोडला आहे. हे मात्र वस्तुस्थितीला धरून नाही. याचे कारण ‘एल-निनो’ हा घटक या वर्षीच्या पावसाळ्यात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत, अजून तो सक्रिय झालेला नाही. त्यामुळे, त्याचा संबंध आताच्या वाढलेल्या तापमानाशी जोडणे हे परिस्थितीचा विपर्यास करण्याजोगे आहे. तसेच, आताच्या उकाड्याचा संबंध लगेच जागतिक तापमानवाढीशी जोडणेही घाईचे ठरेल. कारण, अशा एखाद्या वर्षावरून ते सिद्ध करता येत नाही. काही दशके तसा कल पाहायला मिळाला, तर त्यावर शिक्कामोर्तब होते, केवळ काही वर्षे किंवा एक-दोन दशकांच्या आकडेवारीवरून नाही.

एक मात्र निश्चित. याचा थेट संबंध आपण करत असलेल्या अनेक कृत्यांशी आहे. त्यातले एक - ‘अर्बन हीट आयलंड’.  एकाच शहरात काही ठिकाणी तापमान तुलनेने कमी-जास्त नोंदवले जाते. त्याचा संबंध त्या भागात वाढलेली बांधकामे, काँक्रिटीकरण, मोकळ्या मैदानांची-जागांची कमतरता, झाडांचे कमी झालेले प्रमाण, इमारती-घरांची चुकीची रचना या घटकांशी नक्कीच आहे. 

एखाद्या प्रदेशावर प्रति-चक्रवाती परिस्थिती निर्माण होणार का? हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढणार का? उत्तरेकडून उष्ण वारे येणार का?.. या गोष्टी आपल्या हातात नाहीत, पण झाडांचे आवरण, सिमेंट-काँक्रीटचे आच्छादन, हवा खेळती राहील अशी रचना करणे या गोष्टी निश्चितच आपल्या हातात आहेत. त्या केल्या तर उष्म्याची दाहकता काही प्रमाणात कमी करता येते. पण, त्यासाठी ‘तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे’ वागून चालणार नाही. उन्हाळा असो वा हिवाळा, शहरांचे शास्त्रशुद्ध नियोजन करणे आणि तशी कृती करणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर, शहरे आणि गावेसुद्धा राहण्याजोगी उरतील का, हे प्रश्न पुढेही पडत राहील.

Web Title : क्या ग्लोबल वार्मिंग ही असहनीय गर्मी का एकमात्र कारण है?

Web Summary : भीषण गर्मी प्रति-चक्रवाती हवाओं के कारण है, न कि केवल एल नीनो या ग्लोबल वार्मिंग। शहरी योजना और हरित आवरण शमन के लिए महत्वपूर्ण हैं। तत्काल कार्रवाई की जरूरत है।

Web Title : Is global warming solely to blame for the extreme heat?

Web Summary : Extreme heat is due to anti-cyclonic winds, not El Nino or global warming alone. Urban planning and green cover are key to mitigation. Action needed now.