मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 09:08 IST2025-08-14T08:42:31+5:302025-08-14T09:08:57+5:30
ट्रम्प-मुनीर आणखी काही काळानंतर पडद्याआड जातील; पण पाकिस्तानची मनोवृत्ती मात्र कायमस्वरूपी राहणार असल्याचे लक्षात ठेवूनच, भारताने पुढील पावले उचलली पाहिजेत.

मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून भारताविरोधात केलेली वक्तव्ये केवळ राजनैतिक संकेतांचा भंग करणारीच नव्हे, तर असभ्य या श्रेणीत मोडणारी आहेत. भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देताना, 'जर आम्हाला असे वाटले की आम्ही बुडत आहोत, तर आम्ही अर्ध्या जगाला घेऊन बुडू', या भाषेत त्यांनी जगालाही गर्भित इशारा दिला आहे. मुनीर यांची भाषा अण्वस्त्रधारी देशाच्या लष्करप्रमुखाच्या तोंडी शोभत नाही. गल्लीतले गुंड या भाषेत पोकळ धमक्या देत असतात. मुनीर यांच्या धमक्यांमुळे जगाला त्यांची लायकी नक्कीच कळली आहे. मुनीर केवळ अण्वस्त्र वापराची भाषा करूनच थांबले नाहीत, तर रिलायन्सचा जामनगरस्थित खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प, तसेच सिंधू नदीवरील प्रस्तावित धरणे क्षेपणास्त्रांनी उडवून देण्याचे विधान करून, त्यांनी मर्यादांचा पूर्ण भंग केला आहे. मुनीर यांच्या या धमक्या ही केवळ चिथावणी नव्हे, तर 'न्यूक्लिअर ब्रिक्मनशिप'चा तो उघड नमुना आहे.
पाकिस्तानी राजकीय नेते आणि लष्करशहांना, भारताला पोकळ धमक्या देण्याची जुनीच खोड आहे; पण यावेळी चक्क तिसऱ्या देशाच्या भूमीवरून धमक्या देण्याची हिंमत मुनीर यांनी केली आहे! यापूर्वी कोणत्याही पाकिस्तानी नेत्याने अशी हिंमत कधीच केली नाही आणि केली असती, तर त्याला लगोलग तो देश सोडण्याचा आदेश मिळाला असता; पण विद्यमान अमेरिकन प्रशासन भारताला झुकवण्याच्या प्रयत्नात असून, त्यासाठी पाकिस्तानला उघड वा मूक पाठिंबा देत आहे. अमेरिका व भारतादरम्यान तणाव निर्माण झाल्याने आपल्याला अमेरिकेकडून अभय मिळणार असल्याचे मुनीर यांना पक्के ठाऊक आहे. म्हणूनच अमेरिकेच्या भूमीवरून भारतालाच नव्हे, तर चक्क जगाला धमकावण्याची त्यांची हिंमत झाली. अमेरिका आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा 'आका' झाला आहे.
मध्यंतरी अमेरिकेने पाकिस्तानला वाऱ्यावर सोडल्यानंतर, बरीच वर्षे चीन हाच त्या देशाचा एकमेव 'आका'होता. आता पाकिस्तान जेव्हा भारतासोबत अर्धे जग बुडवेल, तेव्हा त्यात 'आका'चाही नक्कीच समावेश होईल; कारण चीनच्या सीमा भारत व पाकिस्तानला भिडलेल्या आहेत. तेव्हा आता असा प्रश्न निर्माण होतो, की एका 'आका'च्या भूमीवरून असे वक्तव्य करण्यापूर्वी, मुनीर यांनी दुसऱ्या 'आका'ची परवानगी घेतली होती का? मुनीर किती बाष्कळ आहेत, हे यावरून स्पष्ट होते. अमेरिका अधिकृतरीत्या 'भारत आणि पाकिस्तानसोबत संतुलित संबंध' असल्याचा दावा करत असली, तरी प्रत्यक्षात पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला भारताविरोधात गरळ ओकण्यासाठी आपल्या भूमीचा वापर करू देण्याची अमेरिकेची कृती, त्या दाव्याला उघडपणे खोटे ठरवते. अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या देण्याची हिंमत मुनीर यांच्यात अमेरिकेच्या मूक सहमतीमुळेच आली, हे स्पष्ट आहे. अमेरिकेचे हे वर्तन केवळ भारतविरोधीच नाही, तर जागतिक शांततेला नख लावणारे आहे. 'पेंटागॉन'चे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी यासंदर्भात अत्यंत कठोर शब्दांत ट्रम्प प्रशासनाचे कान उपटले आहेत.
मुनीर यांना 'सुटा-बुटातील लादेन' संबोधत, अमेरिकेने अस्वीकारार्ह व्यक्ती घोषित करून त्यांना कधीच व्हिसा देता कामा नये, असे ते म्हणाले. अर्थात, मस्तवाल ट्रम्प रुबिन यांचे कधीच ऐकणार नाहीत. भारताशी युद्धजन्य वातावरण कायम ठेवणे, जनतेचे लक्ष अंतर्गत आर्थिक व राजकीय संकटांवरून हटवणे आणि परकीय मदतीसाठी धोक्याची प्रतिमा वाढवणे, हा खेळ पाकिस्तान जन्मापासून खेळत आला आहे; परंतु यावेळी मुनीर यांनी जे शब्द वापरले, ते केवळ भारतापुरते नव्हते. भारताने पाकिस्तानचा हा भेसूर चेहरा जगासमोर उघडा पाडायला हवा. अण्वस्त्रांच्या धमक्या हा गंभीर प्रमाद असल्याने, पाकिस्तानच्या विरोधात आर्थिक निर्बंध लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे. सोबतीला सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व उपाय योजले पाहिजे आणि पोकळ धमक्यांना भीक घालत नसल्याचे दाखवून देण्यासाठी सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर धरणे बांधण्याचे काम तातडीने हाती घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे अण्वस्त्रांच्या विरोधात असलेल्या सर्व देशांची मोटही बांधायला हवी. ट्रम्प-मुनीर आणखी काही काळानंतर पडद्याआड जातील; पण पाकिस्तानची मनोवृत्ती मात्र कायमस्वरूपी राहणार असल्याचे लक्षात ठेवूनच, भारताने पुढील पावले उचलली पाहिजेत.