मुंबईचे मारेकरी; काळजी घ्यावी वाटत नाही हेच शहराचे मोठं दुर्दैव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 07:41 IST2025-05-28T07:41:34+5:302025-05-28T07:41:43+5:30
मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या २४ वर्षांत प्रथमच मे महिन्यात पाऊस झाल्याचे सांगत पावसाच्या नावाने खडे फोडले.

मुंबईचे मारेकरी; काळजी घ्यावी वाटत नाही हेच शहराचे मोठं दुर्दैव
मुंबई जेव्हा तिच्या नेहमीच्या वेगाने धावत असते तेव्हा ती सर्वांनाच प्रिय असते. मात्र अल्पावधीत झालेल्या मुसळधार पावसाने तिच्या फुप्फुसात पाणी शिरून महामार्ग व गल्लीबोळ बंद होतात, मुंबई ज्या उपनगरीय लोकलच्या कण्याच्या आधारावर उभी असते तो कणा मोडून पडतो तेव्हा आचके देणारे, विव्हळणारे हे शहर पाहवत नाही. दरवर्षी पावसाळ्यात दोन-चारवेळा मुंबईच्या बाबतीत हे घडतेच. यंदा मे महिन्यात आंबे खाऊन मुंबईकरांचे मन अद्याप भरले नसतानाच आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आणि अनपेक्षितपणे धो धो पाऊस कोसळू लागला. घरातील छत्र्या, रेनकोट, पावसाळी बूट शोधताना मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाने केवळ मुंबईलाच फटका दिला नाही, बारामती, इंदापूर, सातारा वगैरे भागातही हाहाकार उडवून दिला. उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सोमवारी मुंबईत पावसाने कहर केला. वेगवेगळ्या भागात १०० ते २५० मिमी पाऊस झाल्याने मुंबईने अंथरूण धरले. एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या कफ परेड ते आरे या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेवर ठिकठिकाणी पाणी साचले. वरळीच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाची तर भयावह अवस्था झाली. पावसाच्या पाण्याचे धबधबे, कोसळलेला स्लॅब, पाण्यात पडलेल्या वायर, जिन्यावरून धो धो वाहणारे पाणी, पाण्याखाली गेलेले फलाट आणि वाहिन्यांच्या पत्रकारांना बाहेर हुसकावून लावण्याकरिता धडपडणारे सुरक्षारक्षक हे चित्र पाहून मुंबईतील मेट्रोची कामे सुमार दर्जाची झाल्याचा निष्कर्ष काढणे चूक नाही. वरळी नाका येथील ॲनी बेझंट रोडलगत असलेल्या नाल्यातून आलेल्या सांडपाण्यामुळे हे घडल्याचा दावा करीत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तिकडे भायखळा, मस्जिद, शीव, कुर्ला, दादर वगैरे भागात रेल्वेमार्गात पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. लागलीच रेल्वे प्रशासनाने काखा वर केल्या आणि महापालिकेच्या ड्रेनेज लाइन ओव्हरफ्लो झाल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचले, असा कांगावा सुरू केला.
मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या २४ वर्षांत प्रथमच मे महिन्यात पाऊस झाल्याचे सांगत पावसाच्या नावाने खडे फोडले. विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या नावाने शिमगा केला, तर महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्षानुवर्षे करून ठेवलेल्या भ्रष्टाचाराच्या डोंगरामुळे मुंबई बुडाल्याचा जावईशोध लावला. ज्या मुंबईची सत्ता काबीज करण्याकरिता पुढील चार-सहा महिन्यात यांच्यात चुरस लागेल त्या मुंबईवर संकट येते तेव्हा त्याची जबाबदारी स्वीकारण्यास मुंबईचा एकही सुपुत्र तयार होत नाही, हेच मुंबई बुडण्याचे खरे कारण आहे. मुंबईच नव्हे तर राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यामध्ये कसा भ्रष्टाचार होतो, याच्या सुरस व चमत्कारिक कहाण्या साऱ्यांनीच ऐकल्या आहेत. नालेसफाईची कामे ही तर उघड दरोडेखोरी आहे. मिठी नदीतील गाळ काढण्यातील भ्रष्टाचार सध्या गाजत आहे. या भ्रष्टाचारात नोकरशहा, सत्ताधारी व विरोधक सारेच वर्षानुवर्षे सामील आहेत. महापालिका हद्दीतील नालेसफाईत भ्रष्टाचार आहे आणि रेल्वे हद्दीतील नाले साफ करणारे कुणी हरिश्चंद्राचे अवतार आहेत, हेही खरे नाही. अचानक आलेल्या मुसळधार पावसाला सक्षमपणे सामोरे जाण्यास कुठलीही यंत्रणा तयार नव्हती हेच वास्तव आहे. गेल्या काही वर्षात मुंबईतील इंचन् इंच जमिनीवर बांधकाम करून ते विकण्याची स्पर्धा लागली आहे. डांबरी रस्त्यांना खड्डे पडतात म्हणून सिमेंट काँक्रिट रस्ते बांधले आहेत. मैदाने, बगिचे गिळून तेथेही बांधकाम करण्याचा भस्म्या रोग राजकारणी, बिल्डर यांना जडला आहे. पाणी झिरपण्याकरिता मातीच शिल्लक नाही. महामुंबईकरदेखील या आपत्तीला जबाबदार आहेत. बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्याचा मोह आवरत नाही. घरातील नको असलेल्या वस्तू नाले, गटारात फेकून देण्याची खोड सुटत नाही. जी मुंबई कोट्यवधी लोकांची भूक भागवते त्या मुंबईची काळजी घ्यावी, ती बकाल होऊ नये याकरिता काही बंधने पाळावी, असे महामुंबईकरांना वाटत नाही हेही या शहराचे मोठे दुर्दैवच आहे.