नरकात स्वागत आहे! इराण-अमेरिका संघर्षाचा भडका आणि जागतिक संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 05:12 IST2026-03-30T05:11:18+5:302026-03-30T05:12:21+5:30

एवढे सगळे सुरू असताना, ट्रम्प मात्र अद्यापही स्वतःला 'शांतिदूत' मानत आहेत.

Editorial on Iran Strikes Back A Defiant Response to US and Israeli Aggression | नरकात स्वागत आहे! इराण-अमेरिका संघर्षाचा भडका आणि जागतिक संकट

नरकात स्वागत आहे! इराण-अमेरिका संघर्षाचा भडका आणि जागतिक संकट

'Welcome to hell..' ही धमकी दिली आहे, इराणमधील 'तेहरान टाइम्स' या इंग्रजी वृत्तपत्राने. अमेरिकेला इशारा देताना या दैनिकाने म्हटले आहे-'नरकात तुमचे स्वागत आहे. अमेरिकी सैन्य इराणमध्ये घुसले, तर तुमचे सगळे सैनिक शवपेट्यांमध्ये परत जातील.' स्वर्ग वा नरक या कल्पना मानायच्याच तर, युद्धाने अवघ्या मानवी समुदायाला नरकात लोटले आहे। महिना झाला तरी, पश्चिम आशियातील संघर्ष थांबायला तयार नाही. स्वतःला 'शांतिदूत' म्हणवणारे डोनाल्ड ट्रम्प नव्या दमाने इराणला धमकावत आहेत आणि इराणही तेवढ्याच जोरकसपणे प्रत्युत्तर देत आहे. सौदी अरेबियातील लष्करी तळावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यात अमेरिकेचे पंधरा सैनिक जखमी झाले. तिकडे इस्रायलने इराणवर लढाऊ विमानांच्या साह्याने हल्ला केला. मग इराणने आणखी पाच देशांवर हल्ले चढवले. पहिल्यांदाच येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. काही पत्रकारही या युद्धात मारले गेले. 

एवढे सगळे सुरू असताना, ट्रम्प मात्र अद्यापही स्वतःला 'शांतिदूत' मानत आहेत. 'गेल्यावर्षी भारत-पाकिस्तानमधील संघर्षासह आठ युद्धे थांबवल्यामुळे माझी ओळख एक महान शांतिदूत म्हणून व्हायला हवी', असे त्यांना वाटते. 'होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांना पुन्हा खुली करा, या अटीवरच इराणशी कोणताही करार होऊ शकतो. तेल वाहतुकीसाठी हा सागरी मार्ग पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे', असेही त्यांनी म्हटले आहे. इराणवरील हल्ल्यांचे समर्थन करण्यात ट्रम्प आजही मग्न आहेत. त्यांच्या मते, 'नाटो' हा कागदी वाघ आहे. अमेरिकेने इराणवर हल्ले केले नसते, तर त्या देशाने दोन ते चार आठवड्यांत अण्वस्त्रे तयार केली असती आणि जग असुरक्षित झाले असते. धाकटे जॉर्ज बुश यांनी इराकवर हल्ला चढवताना आणि सद्दाम हुसेनला फासावर चढवताना, अशीच कारणे दिली होती. ती किती धादांत खोटी होती, हे कालांतराने सिद्ध झाले!

या युद्धाने जगाला खाईत लोटले आहे. सर्वदूर युद्धाची झळ पोहोचली आहे. 'या संकटाचा मुकाबला भारत खंबीरपणे करेल,' असे पंतप्रधानांनी आश्वस्त केले असले तरी, स्थिती वाटते तेवढी साधी नाही. युद्ध आणखी सुरूच राहिले तर आपल्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. हा ताण कमी करण्यासाठी आपले पंतप्रधान सौदी अरेबियाशी बोलत आहेत. तिकडे सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानात पोहोचले आहेत. तणाव कमी करण्याचा प्रयत्न सर्व बाजूंनी सुरू असला तरी अद्यापही त्याला यश येत नाही. इराण लगेच शरण येईल आणि तिथे आपल्याला हवे तसे सत्तांतर सहजपणे होईल, हा ट्रम्प यांचा उद्दाम आत्मविश्वास आता संपला आहे. इराण तेवढ्याच आक्रमकपणे उभा ठाकला आहे. शिवाय, ट्रम्प यांना अपवाद वगळता, कोणाचाही पाठिंबा नाही. खुद्द अमेरिकेत त्यांना विरोध होतो आहे. त्यामुळे आता त्यांची कोंडी झाली आहे. तरीही ते माघार घ्यायला तयार नाहीत. त्यातून संघर्ष धुमसतच चालला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. पर्यावरणाचे होणारे नुकसान आणखी वेगळेच. अमेरिका आणि इस्रायल या दोघांचा इराण हा समान शत्रू असला तरी इस्रायलला हे युद्ध दीर्घकाळ हवे आहे.

अमेरिकेला मात्र एक संदेश देऊन ते संपवून टाकायचे होते. या गोंधळामुळे आता हा संघर्ष कोणाच्याच आवाक्यात नाही. इलॉन मस्कही या रणांगणात उतरल्याची चर्चा आहे. नक्की कोणाच्या हितसंबंधांसाठी युद्धे होतात, हे काही आता गुपित राहिले नाही. त्यात भरडला जातो तो मात्र सामान्य माणूस. युद्धाला महिना होत असताना, सुमारे पन्नास लाख कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचे अभ्यासक सांगत आहेत. ही आकडेवारी थोडीथोडकी नाही. भारताच्या एका वर्षाच्या अर्थसंकल्पाची रक्कम आहे ही! एवढ्या पैशात पाकिस्तानचा तीन वर्षे उदरनिर्वाह होतो. युद्ध संपण्याचे चिन्ह तर नाहीच; पण ते आज संपले तरीही, या अरिष्टातून बाहेर पडायला जगाला दोन वर्षे लागतील. पर्यावरणाचे विचाराल, तर या युद्धाने जी हानी केली आहे, त्याच्या भरपाईसाठी जगाला वीस ते तीस वर्षे लागतील. नऊ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. ते कधीच परत येऊ शकणार नाहीत. ३४ हजार लोक जखमी झाले आहेत. चौदा देशांवर थेट हल्ले झाले आहेत. भारतासारख्या तीस देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर १९५३ मध्ये म्हणाले होते - 'युद्ध म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय नाही. कामगारांच्या घामाचा, वैज्ञानिकांच्या बुद्धीचाही अपव्यय आहे. चिमुकल्यांच्या स्वप्नांचा मृत्यू आहे.' आयसेनहॉवर तेव्हा म्हणाले, ते त्यांच्या आजच्या राष्ट्राध्यक्षांना समजणार आहे का?

Web Title : ईरान-अमेरिका संघर्ष से वैश्विक संकट: नरक में आगमन?

Web Summary : ईरान-अमेरिका संघर्ष बढ़ रहा है, जिससे वैश्विक स्थिरता खतरे में है। ईरान ने अमेरिका को गंभीर परिणाम भुगतने की चेतावनी दी। फिर भी, ट्रंप खुद को शांतिदूत कहते हैं। संघर्ष वैश्विक अर्थव्यवस्था और पर्यावरण को प्रभावित करता है, जिससे भारी वित्तीय और मानवीय नुकसान होता है। तनाव अभी भी अधिक है, जिससे शांतिपूर्ण समाधान बाधित हो रहे हैं।

Web Title : Iran-US Conflict Sparks Global Crisis: A Descent into Hell?

Web Summary : The Iran-US conflict escalates, threatening global stability. Iran warns America of dire consequences. Despite this, Trump calls himself a peacemaker. The conflict impacts global economy and environment, with devastating financial and human costs. Tensions remain high, hindering peaceful resolutions.