अग्रलेख: विश्वविजेतेपदाचा ‘दागिना’! पुरुषांच्या बरोबरीचा अभिमान तमाम महिलांच्या अंगावर सजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:53 IST2025-11-04T10:52:43+5:302025-11-04T10:53:10+5:30
हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नुसताच सोनेरी अक्षरांनी लिहून भागणार नाही, तो हिरेमोत्यांनी मढवलाही जाईल

अग्रलेख: विश्वविजेतेपदाचा ‘दागिना’! पुरुषांच्या बरोबरीचा अभिमान तमाम महिलांच्या अंगावर सजला
रविवार, २ नोव्हेंबर २०२५ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नुसताच सोनेरी अक्षरांनी लिहून भागणार नाही, तो हिरेमोत्यांनी मढवलाही जाईल. हे जास्तीचे हिरेमोती यासाठी की भारताच्या मुलींनी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून प्रथमच वन-डे विश्वचषक जिंकला. महिलांसाठी जल्लोष झाला. पुन्हा दिवाळी साजरी झाली. फटाके फोडले गेले. पुरुषांच्या बरोबरीचा अभिमान तमाम महिलांच्या अंगावर दागिन्यासारखा सजला. हा क्षण २५ जून १९८३ रोजी कपिल देवच्या नेतृत्वात पुरुषांनी जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकासारखा होता.
अर्थात, तेव्हा भारतीय संघ अंडरडाॅग म्हणून हिणवला गेला होता. हा संघ जग जिंकू शकतो यावर कुणाचाही विश्वास नव्हता. काल महिलांबाबत मात्र तसे नव्हते. अकरापैकी दहा जणी पहिलाच वर्ल्डकप खेळत असूनही महिला आयपीएलमधील त्यांच्या कामगिरीमुळे अपेक्षा होत्या. साखळी सामन्यांत ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध जिंकता-जिंकता हरल्याने भारतीय पोरी व त्यांचे चाहते हिरमुसले. कर्णधार हरमनप्रीत काैर व सहकाऱ्यांना ‘चोकर्स’ म्हणून हिणवले गेले. तरीदेखील चमत्काराची अपेक्षा होतीच. टाइमिंगची क्वीन स्मृती मानधना जबरदस्त फाॅर्मात होती. जखमी प्रतिका रावल स्पर्धेबाहेर गेल्याने थोडा धक्का बसला तरी शफाली वर्माने तिची उणीव भासू दिली नाही. वाइल्ड कार्ड एन्ट्रीच्या दैवी संधीचे तिने सोने केले. उपांत्य सामन्यात जेमिमा राॅड्रिग्जच्या ऐतिहासिक शतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. विजेतेपदाच्या आशा पल्लवीत झाल्या, स्वप्नाला धुमारे फुटले.
विश्वविजयाची चाहूल लागली होती. म्हणूनच अंतिम सामना पाहायला सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, रोहित शर्मा हे दिग्गज पुरुष खेळाडू तसेच भारतात महिला क्रिकेटचा पाया रचणाऱ्या डायना एडलजी, मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासह आयसीसी व बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. अंतिम सामना दोन उसळी घेतलेल्या संघांमध्ये झाला. पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून अवघ्या ६९ धावांमध्ये गुंडाळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेने तशी नामुष्की पुन्हा येऊ दिली नाही आणि उपांत्य सामन्यात त्याच इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. सेमीफायनल व फायनलमध्ये लागोपाठ शतक ठाेकणारी कर्णधार लाॅरा वोलवार्ट जगातील पहिली खेळाडू बनली.
अंतिम सामन्यात दीप्ती शर्मा व शफाली वर्मा यांच्या फिरकीपुढे सहकारी बाद होत असताना लाॅरा खेळपट्टीवर ठाण मांडून होती. लाॅरा किंवा आधीचा सामना भारताच्या हातून हिसकावून घेणारी नादिन डी क्लर्क या दोघींची शेवटच्या षटकांतील हाणामारीची योजना भारतीय गोलंदाजांनी यशस्वी होऊ दिली नाही आणि अरबी समुद्राच्या साक्षीने देश जल्लोषांच्या लाटांवर स्वार झाला. महिलांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पुरुषांच्या स्पर्धेपेक्षा जुनी. महिलांचा पहिला विश्वचषक १९७३ साली खेळला गेला आणि पुरुषांचा त्यानंतर दोन वर्षांनी, १९७५ मध्ये. पहिल्या दोन स्पर्धा लिंबूटिंबू होत्या. विजेत्यांची निवड गुणांच्या आधारे झाली. २००० साली न्यूझीलंडच्या विजयापर्यंत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हेच आलटून-पालटून जिंकत गेले. त्यातही तेरापैकी सात वेळा ऑस्ट्रेलिया, तर चार वेळा इंग्लंड जगज्जेता झाला.
२००५ साली दक्षिण आफ्रिकेत भारताला पहिल्यांदा सूर गवसला. अंतिम फेरी गाठली. पण, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने ९८ धावांनी हरवले. २०१७ साली इंग्लंडमध्ये भारताने यजमानांविरुद्ध अंतिम सामना खेळला. तथापि, विजेतेपद अवघ्या ९ धावांनी हुकले. दोन्ही वेळा ‘भारतीय क्रिकेटची राणी’ मिताली राज फॉर्मात होती. पण, क्रिकेटमध्ये एकटे कोणी फॉर्मात असून भागत नाही. हा सांघिक खेळ आहे. प्रत्येकाचे योगदान लागते. झोकून द्यावे लागते. थंड डोक्याने डावपेच लढवावे लागतात. साखळी सामन्यात संयम ढळल्यामुळेच पराभव वाट्याला आले.
प्रशिक्षक अमोल मुजुमदार व सहकाऱ्यांनी त्या पराभवापासून उपांत्य व अंतिम सामन्यात धडा घेतला. चुकांची पुनरावृत्ती टाळली आणि इतिहास घडला. हे विजेतेपद महिला क्रिकेटच्या भविष्याला वळण देणारे, परीघ विस्तारणारे ठरेल. पहिल्या पुरुष विश्वविजेतेपदाच्या ग्लॅमरने महेंद्रसिंह धोनी, झहीर खान आदी खेळाडू छोट्या गावांमध्ये घडले. त्यांनी जगाचे क्षितिज व्यापले. महाराष्ट्रातील सांगलीची स्मृती मानधना, मध्य प्रदेशातील छत्तरपूरची क्रांती गाैड, आंध्र प्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यातील श्रीचरणी यांच्या रूपाने महिला क्रिकेट सध्याच खेड्यापाड्यात झिरपले आहे. विश्वविजेत्या मुलींमुळे ते आणखी रुजेल. नव्या वंडरगर्ल, चॅम्पियन्स घडतील.