संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:14 IST2025-10-10T07:12:21+5:302025-10-10T07:14:30+5:30
पंतप्रधान यांच्या मुंबईतील दोन दिवसांच्या भेटीकडे केवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि भूमिगत मेट्रोच्या टप्प्याचे लोकार्पण एवढ्या मर्यादित हेतूने बघून चालणार नाही.

संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे’ असा आरोप सातत्याने होत असताना याच मुंबईत आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी आणि वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित केली जाईल, अशी घोषणा केली. नवी मुंबई ही दुसरी मुंबई. पनवेल, उरण आणि नैना हा परिसर तिसरी मुंबई म्हणून ओळखला जाऊ लागला. आता वाढवण बंदरामुळे आजूबाजूचा परिसर आणि पालघरचा काही भाग चौथ्या मुंबईत समाविष्ट होईल. पालघर गुजरात सीमेवर येणारा महाराष्ट्रातला जिल्हा आहे. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचे एक स्टेशन पालघरदेखील आहे. त्यामुळे भविष्यात चौथ्या मुंबईचा व्यापार उदीम गुजरात सीमेवर होऊ लागला तर आश्चर्य नाही.
पंतप्रधान यांच्या मुंबईतील दोन दिवसांच्या भेटीकडे केवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि भूमिगत मेट्रोच्या टप्प्याचे लोकार्पण एवढ्या मर्यादित हेतूने बघून चालणार नाही. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्य शासनाचा स्वतःचा हँगर नाही. आता नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर तरी तो असावा. त्याचा वापर सरकारला स्वतःच्या अधिकारात कोणती विमाने कधी उतरवायची यासाठी करता येतो. अन्य राज्यांमध्ये अशी व्यवस्था आहे. पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर दोघांच्या मुंबई भेटीत झालेल्या चर्चेत आर्थिक व व्यापारी सहकार्याचे नवे मार्गही मोकळे झाले आहेत. ‘व्हिजन २०३५’ या माध्यमातून तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फिनटेक सहकार्याचा उल्लेख केला गेला. मुंबईतील वाहतुकीचे अराजक, झोपडपट्ट्यांचे वाढते प्रमाण, रस्त्यांची बिकट अवस्था, कितीही नवे प्रकल्प आले तरी मुंबईकरांच्या जीवनमानात बदल होत नाहीत अशी नैराश्याची भावना यावर फुंकर घालण्याचे काम पंतप्रधानांच्या भेटीने झाले आहे. ‘मुंबई वन’मुळे मेट्रो, रेल्वे, बस, मोनोरेल या सगळ्या गोष्टी एका ॲपवर आल्या आहेत. मुंबई ही स्वप्नांची नगरी नाही तर जनतेच्या आयुष्यात बदल घडवणारी महानगरी आहे, या भावनेला बळ देणारी ही भेट होती.
कीर स्टार्मर यांनी पहिल्या दिवशी यशराज स्टुडिओला भेट देऊन तीन मोठ्या चित्रपटांची निर्मिती ब्रिटनमध्ये करण्यासाठीचा करारही केला. ब्रिटनमध्ये येऊन चित्रीकरण करणाऱ्यांसाठी आपण सकारात्मक भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे चित्रीकरण करणाऱ्या निर्माता दिग्दर्शकांना त्रास देणाऱ्या राजकीय नेत्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका डोळे उघडे ठेवून बघितली पाहिजे. भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार आहेत अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी दोन देशांच्या संबंधांवर भाष्य केले. दोन देशांच्या व्यापक आर्थिक व्यापार कराराला गती देण्याचे आश्वासनही यावेळी दिले गेले. स्कॉच व्हिस्कीवरील शुल्क, ऑटोमोबाइल क्षेत्रातील टेरिफ, वित्तीय सेवांचे नियम यांसारख्या गुंतागुंती जरी शिल्लक असल्या तरी दोन्ही देशांनी ‘व्हिजन २०३५’च्या निमित्ताने आर्थिक धोरणात्मक मार्गावर पुढे जाण्याची तयारी दाखवली आहे. ब्रिटनमध्ये भारतीय कंपन्यांनी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतात ही ब्रिटिश कंपन्यांचा वाढता प्रवेश ही दोन देशातील संबंधांसाठी आशादायक चिन्हे आहेत. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी राजभवनातील भेटीत ब्रिटनमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांचे केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली. ही केवळ शिक्षणासाठीची संधी नाही, तर संशोधन, नवकल्पना, रोजगारनिर्मिती आणि सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी दोन देशांनी आपापले दरवाजे उघडण्याचा घेतलेला निर्णय आहे. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या व्हिसा धोरणातील अडथळे दूर झाले पाहिजेत. तर या भागीदारीचे स्वरूप अधिक व्यवहार्य व उपयोगी ठरेल.
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प भारतीय विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे निर्णय घेत असताना भारत आणि ब्रिटन यांच्यामधील हा संवाद अधिक परिणामकारक झाला तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी ते अधिक फायद्याचे होईल. यावेळी जगतार सिंग जोहेल प्रकरणावर ब्रिटिश पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. अशा विषयांवर पारदर्शकता ठेवणे हे दोन्ही देशांच्या लोकशाहीसाठी विश्वासाचे खरे मोजमाप असेल. आर्थिक करारांसोबत मानवी हक्कांचा आदर राखणे हीसुद्धा या भागीदारीची कसोटी ठरणार आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या मुंबई भेटीने देशपातळीवर तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा आणि संस्कृती या क्षेत्रांना गती देण्याविषयी एकमत झाले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी विविध योजनांच्या लोकार्पणातून मुंबईलाही गती देण्याचे काम केले आहे.