संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 06:19 IST2025-12-15T06:19:05+5:302025-12-15T06:19:26+5:30
विधिमंडळाचे यंदाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन सातच दिवसांचे असले, तरी रोज बातम्यांमध्ये राहिलेल्या नावांमध्ये सुधीर मुनगंटीवार सर्वांत पुढे राहिले.

संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
महायुती सरकारची कामगिरी आणि राज्याच्या समृद्धीसाठी भविष्यातील योजनांचा लेखाजोखा नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधूनमधून सत्ताधारी व विरोधी बाकांवरील काही सदस्यांची नावे घेऊन पुढे जात होते. त्यात जयंत पाटील, भास्कर जाधव या विरोधी नेत्यांसोबतच सत्ताधारी बाकांवरील एक नाव वारंवार उच्चारले जात होते. ते होते माजी वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. शेतीसाठी सौर पंप योजनेचे यश सांगताना मुख्यमंत्र्यांनी थेट नदीतून पाणी उचलण्यासाठी बूस्टर पंपाच्या नावीन्यपूर्ण कल्पनेचा उल्लेख केला आणि ती कल्पना कुठे कुठे राबवत आहोत, हे सांगताना मुनगंटीवारांच्या चंद्रपूरचे नाव घेताना 'सुधीरभाऊ स्वतः एक बूस्टर आहेत', अशी टिप्पणी केली. अशीच टिप्पणी गडचिरोलीच्या प्रस्तावित विमानतळाविषयी बोलताना झाली.
फडणवीस म्हणाले, 'चंद्रपूरवरून गडचिरोली विमानतळावर जाण्यासाठी एक डेडिकेटेड रस्ता तयार करू, जेणेकरून सुधीरभाऊंना नागपूरऐवजी गडचिरोलीवरून विमान पकडता येईल.' मंत्रिपदाविना एक वर्ष काढलेल्या मुनगंटीवार यांच्या संदर्भातील हे उल्लेख व टिप्पण्यांना एक रंजक कडा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी मिळून महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आधीच्या तीन मंत्रिमंडळांमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कटेल, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती.
पण, त्यांच्यासह छगन भुजबळ यांच्यासोबत ते घडले खरे. भुजबळ काही महिन्यानंतर कॅबिनेटमध्ये आले. मुनगंटीवार मात्र अजूनही प्रतीक्षेत आहेत. तेव्हा, मनातील नाराजी दाबून धरतानाच आमदार म्हणून आपण संसदीय आयुधे वापरून जनतेच्या समस्यांना वाचा फोडू, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. विधिमंडळाचे यंदाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन सातच दिवसांचे असले, तरी रोज बातम्यांमध्ये राहिलेल्या नावांमध्ये सुधीर मुनगंटीवार सर्वांत पुढे राहिले. अर्थात यात वृत्तमूल्य हेच की, सत्ताधारी भाजपचे असूनही मुनगंटीवार यांनी मंत्र्यांची वारंवार कोंडी केली.
विदर्भ, मराठवाड्याच्या वैधानिक विकास मंडळांचा मुद्दा उचलताना त्यांनी 'आमचे प्रश्न सोडवत नसाल तर ते हुरडा पार्टीसारखे अधिवेशन घेताच कशाला?' असे आसूड ओढले. 'तुम्ही सगळे अतिथी आहात. विदर्भाचा पाहुणचार सुपरिचित आहे. पण, तुम्ही देवासारखे वागा', असे सर्वांना सुनावले. आपला प्रश्न चर्चेला आला, पण त्यावर उत्तर द्यायला मंत्रीच उपस्थित नाहीत हे पाहून त्यांनी मंत्र्यांवर बिबट्या सोडा', अशी मिश्किल टीका केली. पिंपरी-चिंचवड येथे पाकिस्तानात उत्पादित सौंदर्य प्रसाधने जप्त झाल्याच्या मुद्द्यावर त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची कोंडी केली. 'आता सौंदर्यप्रसाधने आली, उद्या पाकिस्तानातून मंत्रीही येतील', अशा शब्दांत त्यांनी यंत्रणेचे वाभाडे काढले.
सभागृहात आणि बाहेरही मुनगंटीवार तुफान टोलेबाजी करत राहिले. संसदीय आयुधांचा वापर कसा असतो, याचा जणू एक वस्तुपाठ घालून दिला. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा मुनगंटीवार यांचा उल्लेख करण्यामागे आठवडाभरातील हा दणदणाट कारणीभूत आहे. त्यातील 'बूस्टर' शब्द महत्त्वाचा आहे. विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, भास्कर जाधव वगैरे विरोधी नेते सरकारला धारेवर धरण्याचे प्रयत्न करत असताना ३० वर्षांचा संसदीय अनुभव असलेले सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते अधिक आक्रमक असणे, त्यांनी सरकारला, मंत्र्यांना अडचणीचे प्रश्न विचारणे या सगळ्याला अनेक राजकीय संदर्भ आहेतच.
मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुनगंटीवार यांनी भेट घेतली. मंत्रिपद किंवा कारकिर्दीला साजेशी अन्य महत्त्वाची जबाबदारी देऊन मुनगंटीवार यांचा विजनवास संपवला जाईल, अशी चर्चा त्या भेटीनंतर होती. अजूनही त्याविषयी बरेच दावे त्यांच्या समर्थकांकडून केले जातात. असे काही प्रत्यक्ष घडून येईल तेव्हाच या दाव्यांची सत्यासत्यता सिद्ध होईल. घरचा आहेर वगैरे गुळगुळीत शब्द बाजूला ठेवू, महत्त्वाचे हे की, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीमधील तीन घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे खरे विरोधी पक्ष झाकोळून गेले. तशीच ही व्यूहरचना असावी का? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांची आक्रमकता पाहून पडावा. १९९९ ते २०१४ या लोकशाही आघाडी सरकारच्या काळात दोन्ही काँग्रेस याच मार्गाने विरोधकांची जागा खाऊन टाकायच्या. ती क्लृप्ती महायुतीनेही स्वीकारल्याचे दिसते. त्याचा प्रत्यय आता थेट सभागृहात आला.