संपादकीय: एकमेव किल्ली नव्हे! बारावी यशाची कवाडे खुली करते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:58 AM2023-05-26T11:58:41+5:302023-05-26T11:59:26+5:30

हल्ली या परीक्षेच्या निकालाचा पूर्वीचा दिमाख बराच कमी झाला असला तरी, अजूनही महत्त्व बऱ्यापैकी टिकून आहे.

Editorial: hsc pass is Not the only key! XII 12th class result opens the door to success, but... | संपादकीय: एकमेव किल्ली नव्हे! बारावी यशाची कवाडे खुली करते, पण...

संपादकीय: एकमेव किल्ली नव्हे! बारावी यशाची कवाडे खुली करते, पण...

googlenewsNext

आयुष्यातील सर्वात महत्त्वाची परीक्षा असा बहुमान अगदी अलीकडील काळापर्यंत मिरविणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. हल्ली या परीक्षेच्या निकालाचा पूर्वीचा दिमाख बराच कमी झाला असला तरी, अजूनही महत्त्व बऱ्यापैकी टिकून आहे. गत काही वर्षांत जवळपास सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होतात. त्या परीक्षांमधील गुणांच्या आधारे प्रवेश निर्धारित होत असल्याने बारावीच्या परीक्षेचे महत्त्व आपसूकच कमी झाले आहे. अर्थात बव्हंशी प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षेतील चांगल्या गुणांसोबतच, इयत्ता बारावीतील किमान गुणांची अट असल्याने, अजूनही बारावीच्या परीक्षेचे गांभीर्य टिकून आहे. पूर्वी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मक्तेदारी होती. अलीकडे सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई), इंडियन स्कूल सर्टिफिकेट (आयएससी) या संस्थादेखील राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतात. शहरी भागांतील बरीच खासगी शाळा-महाविद्यालये त्यांच्याशी संलग्न झाली आहेत. त्यामुळेही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे महत्त्व कमी होण्यास हातभार लागला आहे.

यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी सुमारे तीन टक्क्यांनी घटली आहे. गतवर्षीच्या परीक्षेवर कोविडचे सावट असल्याने केवळ ७५ टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा घेण्यात आली होती. शिवाय परीक्षार्थ्यांना अतिरिक्त वेळही देण्यात आला होता. यावर्षी मात्र अशा कोणत्याही विशेष सवलती देण्यात आल्या नव्हत्या. स्वाभाविकच त्याचा परिणाम परीक्षेच्या निकालावर झाल्याचे दिसते. गत अनेक  वर्षांच्या प्रथेनुसार यावर्षीही सावित्रीच्या लेकींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत तब्बल ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे. विभागनिहाय निकाल विचारात घेतल्यास, एकूण नऊ विभागांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे, तर मुंबई विभाग तळाशी आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद हे चारच विभाग होते, तेव्हा दहावी व बारावीच्या निकालांमध्ये मुंबई व पुण्याच्या तुलनेत, नागपूर व औरंगाबादची टक्केवारी बरीच कमी असे. गत काही वर्षात विभागांची संख्या चारवरून नऊपर्यंत गेली आणि निकालातील तफावतही खूप कमी झाली. यावर्षीही तेच चित्र दिसते. एक मुंबई विभाग वगळता उर्वरित सर्वच विभागांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे चित्र सुखावणारे असले तरी, गुणवत्तेत खरोखर वाढ झाली आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. काही वर्षांपूर्वी ज्या विभागांचा निकाल ४० टक्क्यांच्या आतबाहेर लागत असे, त्या विभागांचा निकाल गत काही वर्षांत ९० टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळेच गुणवत्तेत खरोखर वाढ झाली की वाढलेली टक्केवारी ही केवळ सुज आहे, हा अलीकडे दरवर्षीच उपस्थित होणारा प्रश्न यावर्षीही कायम असेल. त्या प्रश्नाचे उत्तर, शिक्षण व्यवस्थेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांनी शोधायचे आहे. तो प्रश्न उपस्थित होतो म्हणून परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचे यश झाकोळता येणार नाही. सोबतच ज्यांना दुर्दैवाने या परीक्षेत यश प्राप्त करता आले नसेल, त्यांनी निराश होण्याचेही अजिबात कारण नाही. एका परीक्षेतील यशापयश हा कुणाच्याही आयुष्याचा अंतिम निकाल असू शकत नाही.

इयत्ता बारावीची परीक्षा ही आयुष्यातील यशाची कवाडे खुली करण्याची किल्ली निश्चितच आहे; पण ती एकमेव किल्ली नव्हे!  बारावीच्या परीक्षेत पदरी अपयश आल्यानंतर अथवा मनाजोगते यश न मिळता माफक यश मिळाल्यानंतर वेगळ्या वाटा चोखाळून आयुष्यात यशस्वी झालेल्या व्यक्तींची किती तरी उदाहरणे आपल्या आजूबाजूलाच असतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत अपयश आले अथवा मनाजोगते यश मिळाले नाही, म्हणून सर्व काही संपलेच, असे मानण्याचे अजिबात कारण नाही. अलीकडे तर नवनवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे नवनव्या क्षेत्रांची कवाडे खुली होत आहेत. वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला तरच आयुष्याचे सार्थक होते, असे मानण्याचे आता अजिबात कारण उरलेले नाही. त्यामुळे ज्यांना परीक्षेत मनाजोगते यश मिळू शकले नसेल त्यांनी खचून जाण्याची बिलकुल गरज नाही. ज्यांना अपयश आले असेल ते पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करून यश मिळवू शकतात आणि ज्यांना मनाजोगते यश मिळाले नसेल ते पारंपरिक वाटांऐवजी वेगळ्या वाटा चोखाळू शकतात!

Web Title: Editorial: hsc pass is Not the only key! XII 12th class result opens the door to success, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.