उण्यापुऱ्या साडेतीन-चार दशकांपूर्वी जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आदी संकल्पना परवलीचे शब्द बनले होते. त्यातूनच जागतिक खेडे ही संकल्पना उदयास आली होती. त्यापूर्वी जेमतेम पाच-सहा वर्षे आधी तत्कालीन सोव्हिएत रशियाचे महासचिव मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ग्लासनोस्त (पारदर्शकता) आणि पेरिस्त्रोइका (पुनर्रचना) या दोन सुधारणांच्या आधारे, साम्यवादाचा पोलादी पडदा उखडून फेकत, शीतयुद्धाची अखेर करून रशियाला उर्वरित जगाशी जोडले होते.
पुढे इंटरनेटच्या प्रसारामुळे जग खरोखरच एक मोठे खेडे होऊ लागले होते; पण चालू दशकाच्या प्रारंभी कोविड महासाथीने जगाला कवेत घेतले आणि त्यातून बाहेर पडताच, पुन्हा एकदा खंडित जगाकडे प्रवास सुरू झाल्याचे वाटायला लावणाऱ्या घडामोडी घडू लागल्या आहेत.
अलीकडे जागतिक राजकीय, लष्करी आणि सामाजिक पटलांवर जे घडत आहे, त्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही खोलवर विचार करायला भाग पाडले आहे. प्रत्यक्षात येऊ लागलेली जागतिक खेडे ही संकल्पना आता पुसट होताना दिसत आहे.
आज जगाच्या एका टोकाला जे घडते, त्याचा परिणाम दुसऱ्या टोकाला त्वरित जाणवत असला तरी, त्या परस्पर संबंधांत विखंडन, अविश्वास आणि संघर्षाची छाया गडद होत आहे. युरोपात मागील काही वर्षांपासून युद्धाचे पडसाद उमटत होतेच; पण रशिया-युक्रेन युद्धाने संपूर्ण जगालाच हादरवून सोडले आहे.
आशियातही अनेक देश युद्धाच्या धुमश्चक्रीत ओढले गेले आहेत. मध्यपूर्वेत पुनःपुन्हा संघर्ष उफाळत असतानाच, चीन-तैवान, भारत-पाकिस्तान, कोरिया द्वीपकल्प हेदेखील तणावाचे केंद्रबिंदू ठरले आहेत आधनिक कालखंडात अमेरिका खंद्र यदापासन लांब राहिला ठरले आहेत.
आधुनिक कालखंडात अमेरिका खंड युद्धापासून लांब राहिला होता; पण गेल्या काही महिन्यांत तिथेही अंतर्गत संघर्ष, सामाजिक हिंसाचार आणि प्रादेशिक युद्धज्वराची चिन्हे उमटू लागली आहेत. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोजच जगाला संघर्षाकडे ढकलत आहेत. या केवळ अपघाती घडामोडी, की मोठ्या जागतिक समीकरणांची नांदी, हा प्रश्न अभ्यासकांना सतावतो आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने भीषण शस्त्रास्त्र स्पर्धा अनुभवली होती. शीतयुद्ध काळात अमेरिका व सोव्हिएत रशियातील शर्यतीमुळे अण्वस्त्रसाठे वाढले, पण थेट संघर्ष टळला. आज त्याच शर्यतीची नवी आवृत्ती समोर येत आहे.
अण्वस्त्रांच्या जोडीला कृत्रिम बुद्धिमत्ताधारित शस्त्रास्त्रे, ड्रोन, उपग्रहाधारित क्षेपणास्त्रे विकसित होत आहेत. त्यातून तिसऱ्या महायुद्धाचे मळभ दाटत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी म्हणाले होते, मानवजातीने युद्ध संपवले पाहिजे; अन्यथा युद्ध मानवजातीचा अंत करील ! आज त्या वचनाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवत आहे.
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिकीकरण, उदारमतवाद, मानवाधिकार या संकल्पनांचा उदोउदो होत होता; पण आता जग उलट दिशेला धावताना दिसते आहे. अनेक देशांमध्ये कडवा राष्ट्रवाद, धार्मिक कडवटपणा, वृथा वंशाभिमान वाढीस लागला आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारखे पुढारलेले देशही 'आमचा देश प्रथम' यासारख्या घोषणांकडे वळताना दिसत आहे.
स्थलांतरितांचाच देश असलेल्या अमेरिकेला आज स्थलांतरितच नकोसे झाले आहेत. जागतिक खेडे या संकल्पनेला माहिती-तंत्रज्ञान क्रांतीने गती दिली होती. समाजमाध्यमे, वेगवान संवाद साधनांनी जग जवळ आणले; पण विडंबना अशी, की त्याच साधनांचा वापर आज द्वेष, असहिष्णुता, दुष्प्रचारासाठी होत आहे. शेजारच्या नेपाळने कालपरवाच त्याचा अनुभव घेतला.
लोकशाहीचा गोडवा अनुभवलेले देश आज असहिष्णुता, संकुचितपणा आणि वांशिक-धार्मिक द्वेषांत गुरफटले आहेत. त्यातून काही देशांमध्ये राजवटी उलथून पडल्या आणि बऱ्याच देशांमध्ये तसे प्रयत्न सुरू आहेत. आज ऊर्जा संकट, पुरवठा साखळीतील व्यत्यय, महागाई, चलनाचे चढ-उतार, बेरोजगारी यामुळे अनेक देशांतील जनता त्रस्त आहे. अशावेळी संवाद, सहकार्य, पारदर्शकता, मानवतावाद या मूल्यांना पुन्हा बळकटी दिली नाही, तर युद्धज्वर जगाला संपवून टाकेल.
अहिंसा हीच मानवजातीची खरी शक्ती आहे, शस्त्रांनी आपण जग जिंकू शकत नाही; पण करुणेने आपण मने जिंकू शकतो, ही महात्मा गांधींची शिकवण जागतिक नेते अंगीकारतील तो जगासाठी सुदिन ठरेल! आज जगाला खऱ्या अर्थाने गरज आहे, ती 'वसुधैव कुटुंबकम' या भारतीय संस्कृतीमधील संकल्पनेची !