‘मराठीप्रेमी’ म्हणून जी जमात असते, यात इंग्रजी येत नसल्याने मराठीचे प्रेम उफाळून येणारे पुष्कळ असतात. वास्तविक मातृभाषा म्हणजे आईचंच रूप.  जो स्वत:च्या आईवर प्रेम करतो, तो दुसऱ्याच्या मातेचाही आदर करतो. सर्वच भाषिकांनी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. दुसरा गट असतो तो स्वत:ला इंग्रजी न आल्यामुळेच आपल्या आयुष्याचे मातेरे झाले, यावर ठाम विश्वास असणाऱ्यांचा. ही मंडळी आटापिटा करून त्यांच्या लेकरांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये भरती करतात. ‘माँटेसरी’ वगैरेपर्यंत ‘येस बेबी... नो बेबी’ करत या पालकांचे निभावते, पण ही लेकरं जसजशी वरच्या इयत्ता चढू लागतात, तेव्हा पालकांची भंबेरी उडायला लागते आणि मुलांचीही. इंग्रजीच्या मागे धावताना मातृभाषाही जड जाऊ लागते. तिसरा गट एक-दोन पिढ्यांपासून इंग्रजाळलेल्यांचा. हे ‘लोक्स’ केवळ नावापुरते मराठी उरलेत. ब्रिटिशांनी आधुनिक शिक्षण देणारी शाळा-महाविद्यालये उघडली, त्याला आता सुमारे पावणेदोनशे वर्षे होऊन गेली.

Mumbai Confidential: A Dash of Science | Cities News,The Indian Express

अव्वल इंग्रजी काळातल्या मराठी कुलोत्पन्न विद्वानांचे वैशिष्ट्य हे होते, की लंडनच्या ब्रिटिशाला लाजवणारी इंग्रजी ते लिहित-बोलत आणि त्यांची मायमराठीही बलदंड होती. महात्मा फुले, नामदार गोखले, टिळक, आगरकर, डॉ. आंबेडकर, बॅ. सावरकर अशा एक ना अनेक थोरांची नावे घेता येतील. इंग्रजीत रुळल्यानंतरही त्यांनी ज्ञानोबा-तुकोबांच्या शब्दांशी असणारी सलगी सोडली नाही. ही परंपरा तितक्याच समर्थपणे चालवणारे मोजके ‘लिहिते’ सारस्वत येत गेले. त्यात डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. मराठी कुलोत्पन्न असूनही वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे शिक्षण परप्रांतात झाले. उच्चशिक्षणासाठी ते ब्रिटनला गेले. खरे तर या पार्श्वभूमीमुळे ‘सॉरी हं. आय कान्ट स्पीक ऑर राईट मराठी प्रॉपरली. बट आय कॅन अंडरस्टँड लिटलबिट,’ असे सांगण्याची सोय डॉ. नारळीकरांना मिळाली होती. पण मायमराठीचे नशीब थोर म्हणून तसे घडले नाही. मराठी भाषा डॉ. नारळीकरांसाठी परकी झाली नाही. एवढेच नव्हे, तर मराठी भाषेत क्षीण असलेला विज्ञान लेखनाचा प्रवाह डॉ. नारळीकरांनी जोमदार केला, खळाळून सोडला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मराठी साहित्यिक म्हणूनही उंच असलेल्या डॉ. नारळीकरांची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने व्हावी, हे अगदी कालसुसंगत झाले.

Dr Jayant narlikar selected as president for 94th Akhil Bhartiya Marathi sahitya sammelanAapla Mahanagar

मोबाईल इंटरनेटमुळे जग एकीकडे मुठीत आले असताना त्याच मोबाईलमध्ये भविष्य पाहणारे उदंड आहेत. समाज त्या अर्थाने विज्ञानाधिष्ठित झालेला नाही. अर्थात तो व्हायलाच हवा असा अट्टहास कशासाठी आवश्यक आहे? यावर डॉ. नारळीकर यांच्याच अध्यक्षतेखाली नाशिकच्याच साहित्य संमेलनात एक खास चर्चा व्हायला हवी. अंधश्रद्धेच्या पायावर चालत आलेल्या अनिष्ट चालिरीती, शोषणाला पायबंद बसला पाहिजे याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. मात्र श्रद्धेच्या बळावर चार बऱ्या गोष्टी घडत असतील तर त्याचे काय, याबद्दल डॉ. नारळीकर या अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. नारळीकरांनी विज्ञान मराठीत आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. राज्य शासनापासून ते थेट खुर्द-बुद्रूकमधल्या शिक्षकांपर्यंत आणि तमाम मराठी पालकांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने हा मनोदय गांभीर्याने घेतला पाहिजे.

Mumbai hosts astrobiology conference on life in space
Mumbai hosts astrobiology conference on life in space

‘इंग्रजी हिच ज्ञानभाषा’ असल्याचा भ्रम आणि न्यूनगंड बाळगण्याची प्रथा पडल्याने मराठी भाषा समृद्धी आणि वर्धनाकडे लक्ष दिले जात नाही. स्वत: डॉ. नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे या मोजक्या विज्ञान लेखकांनी  मराठीत पर्यायी शब्द रुळवले. त्यापुढे जात आता विज्ञान विषयांच्या मराठीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम सरकारनेच आखला पाहिजे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांवर याची जबाबदारी सोपविली पाहिजे. केवळ मातृभाषेतूनच विज्ञान-तंत्रज्ञान शिकणारे युरोपीय व आशियाई देश गणित, विज्ञान, तंत्रज्ञानात आघाडी घेत आहेत. जगात अकराव्या क्रमांकाची भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रालाही हे अवघड जाऊ नये. खगोलशास्त्रज्ञ असलेल्या डाॅ. नारळीकर यांना ग्रह-ताऱ्यांच्या युत्या पाहण्याची सवय आहे. त्यामुळेच बहुधा ‘वैज्ञानिक व साहित्यिकांना एकत्र आणणार,’  अशी  ‘दुर्दम्य आशा’ त्यांनी व्यक्त केली. ती सफल होवो, इतकेच यावर म्हणता येईल. एरवी संमेलनाध्यक्षपद म्हणजे औट घटकेचे मिरवणे असते, पण डॉ. नारळीकर यांच्यामुळे शालेय विद्यार्थी-तरुण विज्ञान वाचन-लेखनाकडे वळण्याची शक्यता निर्माण होणे हे आश्वासक आहे. गोदाकाठी विज्ञानगंगेत डुंबण्याची संधी मराठी विश्वाला मिळेल ही निराळी पर्वणीच.

Web Title: Editorial on Dr Jayant Narlikar appointed chariperson on Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.