बी. व्ही. जोंधळे, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व पुरोगामी, समविचारी, दलित - वंचित उपेक्षित वर्गास एकत्रित करून भारतीय रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा विचार १९५६ साली केला. यासंदर्भात अनेक पुढाऱ्यांशी त्यांची चर्चाही सुरू होती; पण ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांच्या हयातीत पक्ष उभा राहू शकला नाही.
रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला तो ३ ऑक्टोबर १९५७ रोजी. तत्कालीन अध्यक्ष होते एन. शिवराज; पण पक्षात लवकरच फूट पडली. ॲड. बी. सी. कांबळे यांनी १४ मे १९५९ ला नागपूर मुक्कामी स्वतंत्र अधिवेशन भरवून वेगळा रिपब्लिकन पक्ष काढला. तेव्हा त्यांच्याबरोबर दादासाहेब रुपवते, हरिदास आवळे, ए. जी. पवार हे नेते होते. या पहिल्या फुटीपासून रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले आहे. मधल्या काळात ऐक्याचे प्रयत्नही झाले. काही वेळा ऐक्य झालेही; पण ते अल्पजीवी ठरले.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थाच्या प्रमुखपदी माईसाहेब आंबेडकरांना नेमावे, असा एक प्रस्ताव समोर आला होता; पण अनेकांनी तो फेटाळला. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी अध्यक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले; पण पक्षात लवकरच फूट पडली. रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर असो की दलित साहित्य चळवळ; यातील फाटाफुटीस आंबेडकरवाद की मार्क्सवाद हे वाद जरी निमित्त ठरले तरी फाटाफुटीस नेत्यांचे अहंकारही कारणीभूत ठरले. रिपब्लिकन पक्षातील पहिल्या फुटीनंतर पक्षाची शकले झाली. १९६२च्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातून रा. धो. भंडारेचा पराभव झाल्यावर त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष काढला. १९६७ साली दादासाहेब गायकवाड यांनी काँग्रेसशी युती केली. दरम्यान रा. सु. गवई - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्यातही अंतर वाढून १९७० मध्ये दोघांनीही स्वतंत्र गट स्थापन केले.
गवई व शांताबाई दाणी यांच्यात वाद होऊन शांताबाईंनी दादासाहेब गायकवाड यांच्या नावे स्वतंत्र रिपब्लिकन गट काढला. दादासाहेबांच्या पत्नी गीताबाईंनी (जीजी) आपल्या पतीच्या नावे स्वतंत्र गट उभारला. याच काळात अनेक गट काँग्रेसमध्ये विलीन झाले.
या पार्श्वभूमीवर १९७२ साली दलित पँथरचा जन्म झाला. देशभर दलित समाजावरील अत्याचारात वाढ झालेली असताना दलित पँथर म्हणजे एक विद्रोहाचे स्वप्न होते; पण पँथरमध्येही २४ ऑक्टोबर १९७४ रोजी फूट पडली. मार्क्सवाद - आंबेडकरवाद निमित्त होते; पण राजा ढाले, नामदेव ढसाळ आदी नेत्यांमधील व्यक्तिगत संघर्षही होता. पँथरची रीतसर बांधणी झाली नव्हती. शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा संच नव्हता. राजा ढालेंनी पँथर बरखास्तीचा निर्णय घेतल्यानंतर रामदास आठवले, अरुण कांबळे, टी. एम. कांबळे, गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर, दयानंद मस्के, उमाकांत रणधीर आदींनी औरंगाबादच्या बैठकीत भारतीय दलित पँथरची स्थापना केली; पण पुढे बरेचसे पँथर्स कधी काँग्रेसशी, तर कधी शिवसेनेशी आणि पुढे भाजपशी मैत्री करून सत्तेचा तुकडा मिळविण्यात धन्यता मानू लागले.
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी १९८२ पासून काँग्रेसचा दलित मतदार भारिपकडे वळविला. आता ते वंचितचे स्वतंत्र राजकारण करीत आहेत. दलित चळवळीचा इतिहास जरी फाटाफुटीचा असला तरी नवबौद्धांच्या राखीव जागांचा प्रश्न, गायरान जमिनीचे लढे, मंडल आयोगाची अंमलबजावणी, रिडल्सचे प्रकरण, नामांतर, अन्याय-अत्याचारांचा प्रतिकार करण्यात दलित चळवळीचे मोठे योगदान राहिलेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकत्रित येणारा लाखोंचा जनसमुदाय सत्तेच्या राजकारणात एकेकाळी दखलपात्र होता; पण फाटाफुटीमुळे आज तो बेदखल झाला आहे. काही अपवाद वगळले तर दलितांच्या राजकारणात यशाचा आलेख घसरतच गेलेला दिसतो. सत्ताकारणात रिपब्लिकन वा अन्य दलित पक्ष संघटनांना नगण्य स्थान मिळते. ज्यांच्याशी लढावयाचे, त्यांच्याच मांडीवर रिपब्लिकन नेते जाऊन बसलेले दिसतात. या पार्श्वभूमीवर दलितांची संघटित शक्ती उभारण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. तरुण नेतृत्वही पुढे येण्याची गरज आहे. ‘आपण राजकारणात एकटे कदापि यशस्वी होऊ शकत नाही. आपणाला मित्रांची गरज आहे’- असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटले आहे. आंबेडकरी चळवळीला समविचारी मित्र मिळवावे लागतील. आघाडीचे राजकारण करावे लागेल. अर्थात तेही स्वाभिमानाने आणि सन्मानाने!