शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

‘क्लीन चिट’चे दुकान! आरोप असताना निर्दोष सोडणारी तपास यंत्रणा खोटारडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 7:35 AM

क्लीन चिटचे दुकान उघडून एकेकाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले जात असेल तर किरीट सोमय्या यांचा थयथयाट कशासाठी होता? या साऱ्याची चर्चा महाराष्ट्रात व्हायला हवी!

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा या गाजलेल्या घोटाळ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण सुमारे एक दशकभर गढूळ झाले आहे. आता राज्य सरकार, तसेच केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाच म्हणत आहेत की, या घोटाळ्यात काही घडलेलेच नाही, पर्यायाने कोणी दोषीच नाही; मात्र कोणत्या राजकीय परिस्थितीत या घोटाळ्यांचे आरोप झाले आणि ती राजकीय परिस्थिती बदलताच एकामागोमाग एकेका घोटाळ्यातील संशयित आरोपींना ‘क्लीन चिट’ देण्यात येत आहे. सरकारच्या तपास यंत्रणांनी क्लीन चिट देण्याचे दुकानच उघडले आहे का, असा प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य जनतेला पडला तर त्याचे आश्चर्य वाटायला नको.

राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असल्याने राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, ‘बारामती ॲग्रो’चे संचालक आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आदींची नावे घेतली जात होती. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पोलिसांनी या प्रकरणात काही तथ्य आढळत नाही, अशा निर्णयाप्रत येऊन तपासाची फाइल बंद करण्याचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. महायुती सत्तेवर येताच पोलिसांनी तपासाचा फणा काढून न्यायालयात अर्ज करून तपास करण्याची गरज व्यक्त केली. याआधारेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची खेळी केल्याच्या आरोपांना आता बळकटी मिळू लागली आहे. कारण, महायुती सरकारमध्ये अजित पवार चाळीस आमदारांसह सहभागी झाले.

गेल्या जानेवारी महिन्यातच आर्थिक गुन्हे शाखेने आपला फणा गुंडाळून ठेवला आणि सुनेत्रा पवार, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे आदींना क्लीन चिट देऊन टाकली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचे राजकीय परिणाम समोर आले. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनाच उभे राहावे लागले. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची संशयित सुई त्यांच्याकडे रोखून धरताच जानेवारीत तपास बंद करण्यात आल्याची आणि सुनेत्रा पवार यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याची बातमी तीन महिन्यांनंतर पेरण्यात आली. सिंचन घोटाळ्याची चर्चा आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच छेडली होती. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी थयथयाट करीत २०१४च्या विधानसभेत धिंगाणा घातला होता. ७० हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च करूनही सिंचनाचे क्षेत्र एक टक्क्यांनी देखील वाढले नव्हते, असा तो आरोप होता. मग हा पैसा कोठे खर्ची पडला की, हडप केला, अशी चर्चा होती.

वास्तविक, सिंचन हा महाराष्ट्राच्या दुखण्याचा डाग आहे. शेती संकटात येऊन हजारो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायचे एक महत्त्वाचे कारण आहे, असे अनेक अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिंचनाचा पैसा योग्य पद्धतीने खर्च होत नसेल तर त्याची कसून चौकशी व्हायला हवी होती. हा आरोप केल्यानंतर भाजप-शिवसेनेचे युतीचे सरकार पाच वर्षे सत्तेवर होते. त्या सरकारला या घोटाळ्यातील ‘घ’देखील शोधता आला नाही. घोटाळा झालाच नसेल तर सिंचनही वाढले नाही, याचा तरी शोध लावणे आवश्यक होते. महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपांचेदेखील असेच होताना दिसते आहे. तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दोन वर्षे तुरुंगात काढली. आता त्यातही तथ्य आढळत नसेल तर राजकीय सोयीनुसार तपास यंत्रणा काम करीत राहणार का? सर्वसामान्य जनतेच्या पैशाला काहीच किंमत नाही का? घोटाळे झालेच नाहीत, असा निष्कर्ष नेमका सत्तांतरानंतरच कसा काढला जातो? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राच्या राजकीय धुरिणांनी जनतेला देणे आवश्यक आहे.

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात काहीही तथ्य नाही, हा तपास थांबवीत आहोत, असे सांगून तीन महिने झाले. ही माहिती निवडणूक सुरू झाल्यावरच कशी काय पेरली जाते, आदी प्रश्न उपस्थित होतात. हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात कोणीच दोषी नसेल तर राज्य सहकारी बँकेवर प्रशासक का नेमण्यात आला? क्लीन चिटचे दुकान उघडून एकेकाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले जात असेल तर किरीट सोमय्या यांचा थयथयाट कशासाठी होता? या साऱ्याची चर्चा महाराष्ट्रात व्हायला हवी! नेमके दोषी कोण? आरोप करणारे खोटारडे की, आरोप असताना निर्दोष सोडणारी तपास यंत्रणा खोटारडी?

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस