बडे बडे देशोंमे जब छोटी छोटी बाते होती है...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 08:00 AM2024-02-24T08:00:03+5:302024-02-24T08:00:16+5:30

आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सिनेमाचा वापर पूर्वीपासून होत आला आहे. भारतीय सिनेमा आपल्या देशाचा ‘सांस्कृतिक राजदूत’ होता, आणि राहील!

Editorial Article Shah Rukh Khan | बडे बडे देशोंमे जब छोटी छोटी बाते होती है...

बडे बडे देशोंमे जब छोटी छोटी बाते होती है...

अमोल उदगीरकर, चित्रपट समीक्षक, अभ्यासक

कतार या देशामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारतीय नागरिकांची सुटका झाली, तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी या नागरिकांच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरुख खानने मध्यस्थी केली, असा दावा समाजमाध्यमांवर करून काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडवून दिली होती. शाहरुखने लगेच हा दावा नाकारला.   या सुटका प्रकरणात शाहरुखचा मर्यादित का होईना सहभाग होता का यासंबंधीचं सत्य कदाचित कधीच समोर येणार नाही किंवा काही काळानंतर समोर येईलही; पण यानिमित्ताने लोकप्रिय अभिनेत्यांचा परराष्ट्र मुत्सद्देगिरीमध्ये होणारा वापर हा रोचक मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सिनेमाचा वापर खूप पूर्वीपासून होत आला आहे .

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला होता, की कारगिल युद्धाच्या वेळेस तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अभिनेते दिलीप कुमार यांचा नवाज शरीफ यांच्याशी वार्तालाप करून दिला होता. दिलीप कुमार यांनी फोनवरूनच नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या आक्रमक दुःसाहसाचे परिणाम उभय देशांवर किती गंभीर होतील आणि त्याची किंमत भारतीय मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात मोजावी लागेल हे सुनावलं होतं. दिलीप कुमार यांनी याहीपूर्वी भारत सरकारचा दूत म्हणून पाकिस्तान सरकारशी संपर्क केला होता, असंही कसुरी लिहितात.  भारतीय चित्रपटांच्या पाकिस्तानी जनमानसावर असणाऱ्या प्रभावाची वाजपेयींना पुरेपूर कल्पना होती. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या ‘दिल्ली-लाहोर’ बसमधून पाकिस्तानला जाताना वाजपेयींनी  जावेद अख्तर, देव आनंद आणि शत्रुघ्न सिन्हा यांना आपल्या सोबत नेलं होतं.  अर्थात सिनेमा आणि अभिनेत्यांचा वापर हा फक्त पाकिस्तानकेंद्री नाही. हिंदु बहुसंख्य असणाऱ्या देशातले काही मोठे फिल्मस्टार्स हे मुस्लीम असल्याचा वापर मुत्सद्देगिरीमध्ये केला जातोच. जागतिक नेत्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ होणाऱ्या मेजवान्यांसाठी भारतीय सिनेकलाकारांना हमखास बोलावणं असतं. ‘ग्लॅमर’ पेक्षाही ते  एक  ‘सांस्कृतिक विधान’ असतं.

बराक ओबामा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असताना भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीला फिल्मस्टार्स होते. ओबामांनी  आपल्या भाषणात  ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधला ‘बडे बडे देशो में छोटी छोटी बाते होती रहती है’ हा शाहरुखचा संवाद वापरला होता. काही वर्षांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान  भारतात आले त्यावेळी ते ताजमहलपासून गांधीजींच्या आश्रमापर्यंत  फिरून आले. पण, माध्यमांनी प्रसिद्धी दिली ते ‘शालोम बॉलिवूड’ला! या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि परिवार, करण  जोहर, विवेक ओबेराय आणि अनेक कलाकारांना इस्रायली पंतप्रधान भेटले. इस्रायलमध्ये बॉलिवूड लोकप्रिय आहे. या ‘सॉफ्ट पॉवर’चा वापर भारतीय परराष्ट्रखात्याने पुरेपूर करून घेतला होता. 

सॉफ्ट पॉवर’ ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली. कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकद न वापरता राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे  ‘सॉफ्ट पॉवर’. देशाची सांस्कृतिक मूल्ये, देशाची कला आणि संस्कृती, खाद्य संस्कृती आणि यासारखे अनेक घटक ‘सॉफ्ट पॉवर’मध्ये अंतर्भूत असतात.

 ‘विकिलिक्स’मध्ये जे हजारो दस्तावेज लोकांसाठी उघड झाले, त्यातले काही भारतीय सिनेमासंबंधीही होते. हॉलीवूडचं भारतात वाढत जाणारं प्रस्थ आणि त्याचा भारतीय सिनेमावर होणारा परिणाम, भारतीय सिनेमाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन याबाबतचा तपशील त्यात होता. भारतीय सिनेमाचा इतर जगात वाढणारा प्रभाव जितका सांस्कृतिक आहे, तितकाच आर्थिकही आहे. जगभरात पसरलेले अनिवासी भारतीय आणि इतर देशांमधली आपल्या सिनेमाची वाढती बाजारपेठ हा चित्रपट विश्वासाठी कमाईचा स्रोत आहे. इतर देशांचे दूतावास  आपल्या मनोरंजन विश्वाकडे बारीक नजर ठेवून असतात. अमेरिकन दूतावासामधले काही अधिकारी द्रविडीयन राजकारणाचा अभ्यास करून सतत स्वतःला अपडेट ठेवतात, अशी एक बातमी मध्यंतरी वाचनात आली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी ‘बाहुबली ‘सिनेमा असंख्य वेळा पाहिला होता. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने हॉलीवूडचा अतिशय परिणामकारक वापर केला आणि सध्या चीन त्यांच्या चित्रपटांचा जागतिक पातळीवर प्रभाव वाढवण्यासाठी किती परिणामकारक वापर करत आहे याची उदाहरणं डोळ्यासमोर आहेतच .

आपल्या देशाचा ‘सांस्कृतिक राजदूत’ म्हणून भारतीय सिनेमा आपल्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका सतत बजावत राहील. भारतीय सिनेमावर असलेली ही निसर्गदत्त जबाबदारी आहे.

Web Title: Editorial Article Shah Rukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.