प्रभू चावला
उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेपुढे गुडघे टेकले गेल्याने अमेरिकन राज्यसत्ता दुर्बल झाली आहे, याविषयी अमेरिकेचे पुन्हा अध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात बिल्कुल संदेह नसावा. दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या काळात अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी युरोप आणि ब्रिटनमधील घडामोडींपासून अमेरिकेला दूर ठेवले होते. ट्रम्प अमेरिकेला पुन्हा त्या काळात नेऊ पाहत आहेत. ट्रम्प अमेरिकेचे अनभिषिक्त सम्राट असल्यासारखे वागत असून त्यांची नजर सगळीकडे फिरते आहे. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या या सार्वभौम सम्राटाला विलीनीकरण करणे, बळजबरीने ताबा मिळवणे अशा मार्गांनी आपले साम्राज्य वाढवायचे आहे. कोणाची पंचगिरीही त्याला अमान्य आहे.
सर्वभक्षी ट्रम्पवादाला आता आंतरराष्ट्रीय आयाम प्राप्त झाले आहेत. ‘ट्रम्प यांचे तोंड वाईट आहे’ असे त्यांचे शत्रू म्हणत असले तरी त्यांच्या वेडेपणाचीही एक पद्धत आहे. त्यांना कधी ग्रीनलँड विकत घ्यायचे असते, पनामा कालवा ताब्यात घ्यायचा असतो किंवा कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य घोषित करावयाचे असते. त्यांची नजर आता युद्धग्रस्त गाझावर पडली आहे. अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेईल आणि भूमध्य समुद्रातील सुंदर किनाऱ्यात रूपांतरित करील असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले असले तरी त्यांचे ज्येष्ठ सहकारी आता त्यावर सारवासारव करत आहेत. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू त्यांना व्हाइट हाउसमध्ये भेटायला आले असताना ट्रम्प यांनी हा अजब बेत जाहीर केला. ‘हा काही गमतीने घेतलेला निर्णय नाही. मी ज्यांच्याशी बोललो त्यांना कल्पना आवडली आहे’, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
डोनाल्ड ट्रम्प आपला विस्तारवादी स्वभाव पहिल्यांदाच दाखवत आहेत, असे मात्र नाही. आपण काय करणार आहोत याच्या घोषणा ते समाज माध्यमांवरून करत असतात. ‘ट्रूथ सोशल’ या त्यांच्या मालकीच्या माध्यमात त्यांनी असे म्हटले की, कॅनडावर अमेरिका अब्जावधी डॉलर्स खर्च करते. हे पैसे मिळाले नाहीत तर कॅनडाचे अस्तित्वच धोक्यात येईल. ग्रीनलँडबाबतही ट्रम्प सतत बोलत आहेतच! जागतिक सुरक्षिततेसाठी आणि धोरणात्मक कारणांनी अमेरिकेचे जगावर नियंत्रण अत्यंत गरजेचे आहे, असे ट्रम्प यांनी २०१९ साली म्हटले होतेच. डॉलरच्या साम्राज्यवादालाही ट्रम्प यांनी तोंड फोडले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाणिज्य व्यवहारासाठी हेच मुख्य चलन असले पाहिजे, यावर ते सतत भर देताना दिसतात. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांवर वर्चस्व प्रस्थापित करून हवे तसे सूत्रसंचालन करण्यासाठी एक अत्यंत ताकदवान शस्त्र म्हणून डॉलर हे त्यांनी ‘ट्रम्पकार्ड’ केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून अन्य चलनाने डॉलरची जागा घ्यावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या जागतिक समूहाचे नेतृत्व चीनने घेतले आहे. अमेरिकेच्या नियंत्रणाखालील आर्थिक रचना त्यांना मोडायची आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका हे ‘ब्रिक्स’ या संघटनेचे मूळ सदस्य डॉलरला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अमेरिकन सत्ताधीशांना वाटते. भारताने या आरोपाचा कायमच इन्कार केला आहे. ‘ब्रिक्समधील देश डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील आणि आम्ही पाहत बसू, असे वाटत असेल तर तो भ्रम ठरेल’, असे ट्रम्प यांनी बजावले आहेच. अशी आगळीक कोण्या देशाने अगर देशांच्या समूहाने केलीच, तर सणसणीत आयात शुल्क लावण्याची तंबी द्यायलाही ट्रम्प विसरलेले नाहीत.
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’, अशी ट्रम्प यांची घोषणा होती. ती आता ‘मेक अमेरिका ग्लोबली ग्रेट अगेन’ अशी झाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारउदीमात त्यांनी पारंपरिक युक्त्या वापरण्याचा कमाल प्रयोग चालवला आहे. अध्यक्ष आणि त्यांचे कंपनी जगतातले मित्र ब्रिटिश साम्राज्याची नक्कल करू पाहतात. व्यापारउदीमातील जुन्या चाली खेळून व्यापार आणि भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करणारे हेच यशदायी प्रारूप ठरेल, असे त्यांना सांगण्यात आले असावे. १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी समुद्रमार्गे भारतामध्ये आली. १७५७ पर्यंत एवढ्या मोठ्या भूप्रदेशाची सत्ता त्यांनी मिळवली. १८८३ मध्ये ब्रिटिश इंडियाचे प्रशासन चालवण्यासाठी गव्हर्नर जनरल नेमण्यात आला. मनात येईल ते ताब्यात घेण्याची ट्रम्प यांची आकांक्षा, या प्रारूपाची हुबेहूब नक्कल नसेल, परंतु एलन मस्क, मार्क झुकरबर्ग आणि जेफ बेजोस यांच्यासारख्या धनाढ्य उद्योगपतींना त्यांनी राजकारणात खेचून कामाला लावले आहे.
कंपन्यांच्या माध्यमातून या मंडळींना अख्ख्या जगावर अमेरिकन जाळे पसरायचे आहे. त्यांच्या कंपन्या मतदारांच्या मनावर प्रभाव टाकतात, तंत्रज्ञानाचा छुपा वापर करून राजवटी बदलण्यात सक्रिय भूमिका बजावतात. ट्रम्प त्यांच्या धोरणात्मक उद्दिष्टांसाठी या मंडळींचा वापर करत आहेत. युक्रेनचे जेलेन्स्की, रशियाचे पुतीन आणि पश्चिम आशियाई नेत्यांशी मस्क वाटाघाटी करत आहेत. जग ताब्यात घेण्याचे ट्रम्प यांचे स्वप्न आहे. ज्या जागतिक साम्राज्यावरून सूर्य कधीच मावळत नाही अशी ‘ट्रम्पशाही’ त्यांना निर्माण करावयाची आहे.