गेल्या काही वर्षांत आपल्या समाजात ‘सिंघम वृत्ती’चं अप्रूप फार वाढलं आहे. व्यवस्थात्मक बदल न करता केवळ एक व्यक्ती आपला उद्धार करेल, तोच आपला हिरो आणि तोच व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन भोवतालचं जग पालटून टाकेल असं भाबडेपणानं स्वीकारणं हा तसा आपला राष्ट्रीय स्वभाव. एक माणूस हिरो होतो, व्यवस्था मात्र तशाच कमजोर कचकड्या राहतात. भारतीय क्रिकेटने मात्र या भाबड्या आशावादाला नकार देत व्यवस्थात्मक बदल करत अगदी तळागाळापासून काम करायला सुरुवात केली आणि त्याची उत्तम फळं भारतीय क्रिकेटला मिळत आहेत. निर्विवाद ‘क्रिकेट महासत्ता’ असल्याच्या ताठ्यातून आलेल्या उर्मट वर्तनाची काही अपवादात्मक उदाहरणं बाजूला ठेवू, पण आज १४ वर्षांचा भोजपुरी मुलगा ‘वैभवी’ कामगिरी करतो, मुंबईपासून जवळ पण श्रीमंत मुंबईच्या खिजगणतीतही नसलेल्या नालासोपाऱ्याचा आयुष म्हात्रे ‘अंडर नाइन्टीन’ संघाचा कप्तान होतो आणि तो संघ विश्वविजेता ठरतो हे या व्यवस्थात्मक सुधारणांचं, लहान शहरं-गावखेड्यात जाऊन गुणवत्ता शोधणाऱ्या ‘टॅलेंट आयडिन्टिफेकेशन’ सूत्राचं यश आहे.
बीसीसीआयने गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट संरचनेत बदल केले. रणजीपासून आयपीएलपर्यंत गुणी मुलांना योग्य वयात स्थान मिळेल अशी व्यवस्था तयार करण्यात आली. वयानुसार गुणी मुलांना संधी देऊन पुढे सरकण्याचा मार्ग प्रशस्त करून देणारी ही ‘एज ग्रुप इको-सिस्टम.’ गुणवत्ता लाख असेल पण योग्य वयात संधी मिळाली नाही तर खेळाडू मागे पडतात. केवळ संधी मिळाली नाही म्हणून खेळाडूंचं आंतरराष्ट्रीय करिअर घडलं नाही, अशी उदाहरणं कमी नाहीत. त्यातलंच एक नाव म्हणजे महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडूनही त्यांना आंतरराष्ट्रीय संधीच मिळाली नाही. युवा विश्वचषकाचे प्रशिक्षक असलेले ऋषिकेश कानिटकर. ‘वन मॅच वंडर’ म्हणून त्यांच्यावर टीका होत आली. १९९८ साली ढाक्यात पाकिस्तानविरुद्ध अटीतटीचा सामना त्यांनी शेवटच्या चेंडूवर चौकार मारून जिंकवून दिला. पण त्यानंतर त्यांना फार संधी मिळाली नाही आणि जी मिळाली त्याचं सोनं ते करू शकले नाहीत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांच्याही नावे धावांचा डोंगर आहेच. पण २०१५ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली.
२०११ पासून त्यांनी काेचिंग करिअर सुरू केलं आणि पुढे भारतीय युवा संघाचं प्रशिक्षकपद त्यांना लाभलं. याच मानाच्या जागेवर एकेकाळी राहुल द्रविडने तरुण गुणवत्तेला योग्य दिशा देणं सुरू केलं. द्रविड गुरुजींच्या कडक शिस्तीच्या तालमीत तयार झालेल्या युवा संघानेही विश्वचषक जिंकला होता. पुढे त्यांची जागा व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी घेतली. दोघांचं सूत्र एकच - व्यक्ती नाही, व्यवस्था महत्त्वाची; खेळाडू नाही, खेळ महत्त्वाचा. द्रविड आणि लक्ष्मण यांनी देशांतर्गत क्रिकेटची एक नवीन व्यवस्था बांधली. देशात सर्वदूर तळागाळातल्या खेळाडूंनाही व्यवस्थेत स्थान मिळेल अशी निवड प्रणाली आणली. ‘स्ट्रक्चर प्लेअर डेव्हलपमेंट’ नावानं व्यवस्थेत आलेल्या खेळाडूला उत्तम प्रशिक्षक मिळेल अशी सोयही उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले. जय शाह यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स क्रिकेट’ या संस्थेचे लक्ष्मण प्रमुख. देशांतर्गत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षक मिळू लागले. क्रिकेट चोख व्यावसायिकतेनेच खेळलं जाईल याकडे लक्ष देणं सुरू झालं. मुलांच्याच नाही तर मुलींच्याही क्रिकेटला या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.
भारतीय युवा संघाचं ताजं यश त्या संघातल्या खेळाडूंच्या गुणवत्तेइतकंच या व्यवस्थात्मक प्रशिक्षणालाही द्यायला हवं. बीसीसीआयकडे प्रचंड पैसा आहेच, पण तो पैसा नव्या गुणवत्तेसाठी पेरणंही सुरू आहे. म्हणून तर भारतीय संघात आता मोठ्या शहरांबरोबरच किंवा त्याहूनही जास्त लहान शहरांतले, गावांतले खेळाडू दिसतात. गुणवत्ता असेल तर केवळ मोटिव्हेशन आणि व्यक्तिगत शिस्तीवर तरून जाण्याचे दिवस या खेळात आता उरलेले नाहीत. युवा खेेळाडूंना निरंतर प्रशिक्षण मिळेल अशा व्यवस्था उभ्या राहिल्या तरच नवे वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे तयार होतात. जेन झीचे हे प्रतिनिधी आपली प्रादेशिक ओळख अभिमानाने सोबत घेऊन फिअरलेस क्रिकेट खेळतात. ही बे-डर हिमतीची गोष्ट येते शक्तिशाली व्यवस्थांतून.. भारतीय क्रिकेटने व्यक्तिपूजा बाजूला ठेवून व्यवस्थात्मक सुधारणा स्वीकारली याचीच ही फळं आहेत..
Web Summary : Indian cricket prioritizes systemic changes over individual heroics, fostering talent from grassroots levels. BCCI's initiatives, including age-group systems and talent identification, empower players from smaller towns. Dravid and Laxman built a system focused on nurturing talent and providing international-level coaching, leading to youth team successes.
Web Summary : भारतीय क्रिकेट व्यक्तिगत नायकों की बजाय व्यवस्थित परिवर्तनों को प्राथमिकता देता है, जमीनी स्तर से प्रतिभाओं का पोषण करता है। बीसीसीआई की पहल, जिसमें आयु-समूह प्रणाली और प्रतिभा पहचान शामिल है, छोटे शहरों के खिलाड़ियों को सशक्त बनाती है। द्रविड़ और लक्ष्मण ने प्रतिभा को पोषित करने और अंतरराष्ट्रीय स्तर का प्रशिक्षण प्रदान करने पर केंद्रित एक प्रणाली बनाई, जिससे युवा टीम को सफलता मिली।