डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास मांडणीचा आधारवड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 05:34 IST2026-03-27T05:34:11+5:302026-03-27T05:34:58+5:30
महाराष्ट्रात इतिहास संशोधनाची कास धरणे म्हणजे वैचारिक वादळांना सामोरे जाणे ! डॉ. जयसिंगराव पवारांनी ससंदर्भ इतिहास मांडणी करून हे आव्हान पेलले.

डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास मांडणीचा आधारवड!
इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक
कोल्हापूर महाराष्ट्राने आपल्या कर्तृत्वाने इतिहास निर्माण केला आहे. या मराठी भूमीत शिवछत्रपतींपासून ते आधुनिक काळातील राजर्षी शाहू महाराजांपर्यंत अनेक महामानव जन्माला आले. परंतु, इतिहास घडवणाऱ्या महाराष्ट्राने इतिहास लेखन आणि संशोधनाकडे मात्र काही प्रमाणात दुर्लक्ष केलेले दिसते. इतिहासाची साधने शोधून काढणे, त्यांची चिकित्सा करणे आणि त्यांना प्रासादिक भाषेत मांडणे हे अत्यंत अवघड कार्य. इतिहास कथा, कादंबऱ्या, नाटके, चित्रपट, चित्र, शिल्प अशा विविध माध्यमांतून मांडला जातो; परंतु सत्य इतिहास मांडायचा असेल, तर तो कागदपत्रांच्या साक्षीवरच मांडावा लागतो.
महाराष्ट्राने इतिहासाच्या मांडणीत जेवढी मतमतांतरे आणि वादळे पाहिली, विशेषतः मध्ययुगीन इतिहासाच्या संदर्भात, तेवढी मतभेदांची वादळे जगभरात फारच कमी आढळतात. महाराष्ट्रात इतिहास संशोधनाची कास धरणे म्हणजे वैचारिक वादळांना सामोरे जाण्यासारखे आहे. डॉ. जयसिंगराव पवार या व्यक्तीने ससंदर्भ इतिहास मांडणी करताना या मतभेदांच्या वादळांवर स्वार होत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराबाई साहेब अशा महान व्यक्तींच्या इतिहासाची चिकित्सक मांडणी केली. त्यांनी मांडलेल्या काही भागांवर मतभेद असले, तरी बहुतांश मांडणीवर महाराष्ट्रातील संशोधकांचे एकमत झालेले दिसते. याचे श्रेय त्यांच्या सत्यान्वेषी वृत्तीला आणि 'नो डॉक्युमेंट नो हिस्टरी' या त्यांच्या भूमिकेला जाते.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि नामवंत इतिहास संशोधक डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधनाचे आणि लेखनाचे धडे घेतले. तब्बल ५० वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठातून सुरू केलेले संशोधन कार्य त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने पुढे नेले. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात एखादा संशोधक मध्ययुगापासून ते आधुनिक काळापर्यंत प्रभावीपणे कार्य करू शकतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डॉ. पवार यांचे लेखन होय.
डॉ. पवार यांचा संशोधन विषय शिवपुत्र राजाराम महाराजांच्या इतिहासाशी संबंधित होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर स्वराज्याची धुरा जवळपास ११ वर्षे समर्थपणे सांभाळणाऱ्या आणि औरंगजेबाला झुंज देणाऱ्या या शिवपुत्राचे कार्य त्यांनी संशोधनातून प्रकाशात आणले. यासाठी त्यांनी रायगड ते जिंजी किल्ला प्रवास करून अभ्यास केला. राजाराम महाराजांच्या अभ्यासादरम्यान त्यांचे लक्ष करवीर संस्थानाच्या संस्थापिका महाराणी ताराबाई साहेबांच्या इतिहासाकडे गेले. त्यामुळे त्यांनी 'महाराणी ताराबाई' हा ग्रंथ लिहिला. पुढे अधिक सखोल अभ्यास करून 'मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई' या नावाने त्यांनी त्यांच्या जीवनकार्याचे विस्तृत चरित्र सादर केले.
डॉ. पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' हा ग्रंथ संपादित केला. बखरी,
कथा, चित्रपट आणि कादंबऱ्यांमुळे निर्माण झालेल्या संभाजी महाराजांच्या प्रतिमेवरील गैरसमज दूर करून त्यांनी त्यांच्या पराक्रमाचे खरे स्वरूप लोकांसमोर आणले. इतिहास संशोधन करत असतानाच त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा सखोल अभ्यास करून 'राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' तयार केला. हा ग्रंथ संशोधन, संपादन आणि लेखन यांचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. शाहू महाराजांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देश-विदेशात पोहोचावेत, यासाठी त्यांनी त्यांच्या चरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर व्हावे, यासाठी प्रयत्न केले.
इतिहास लेखन आणि संशोधनापुरते मर्यादित न राहता त्यांनी 'महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी' सारखी संस्था स्थापन केली आणि अनेक संशोधक घडवले. शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी अनेक ऐतिहासिक कागदपत्रे पुन्हा प्रकाशित करून संशोधकांसाठी उपलब्ध करून दिली. ताराबाईकालीन आणि जिजाबाईकालीन कागदपत्रांचे पुनःप्रकाशन तसेच विविध ग्रंथांचे संपादन आणि प्रकाशन हे त्यांच्या कार्यातील महत्त्वाचे पैलू आहेत. अनेक संशोधक आणि इतिहासप्रेमींना त्यांचा मायेचा धाक होता. डॉ. पवार हे महाराष्ट्राच्या इतिहास मांडणीचे खरे आधारवड होते. त्यांच्या निधनाने हा आधार आता हरपला आहे।
indraswords@gmail.com