- टेकचंद सोनवणे, खास प्रतिनिधी, लोकमत, दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प भारताचा दौरा संपवून मायदेशी परतले. प्रसारमाध्यमांमधून भेटीचे वृत्तांकन ओसंडून वाहिले. अर्थात आशियातील आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी ही भेट महत्त्वाची होतीच. कदाचित त्यामुळेच की काय अमेरिकन प्रसारमाध्यमांनी याकडे राष्ट्रप्रमुखांचा रूटीन दौरा म्हणून पाहिले. कोरोनामुळे चिनी अर्थव्यवस्थेला मंदीचा संसर्ग होण्याची शक्यता असताना ट्रम्प यांचे भारतात येणे महत्त्वाचेच आहे. त्यांच्या दौऱ्याआधी सॉफ्ट डिप्लोमसीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या एका जागतिक संघटनेची प्रमुख व्यक्ती भारतात आली. ऑड्रे ऑझुलाय. युनेस्कोच्या महासंचालक. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात त्या भारतात आल्या होत्या.जागतिक वारसास्थळांचे जतन, संवर्धन, जाहिरात, मान्यतेसाठी युनेस्को ही आपल्यासाठी सर्वसाधारण ओळख. पण शिक्षण, गरिबी निर्मूलन, माहिती तंत्रज्ञान, फेक न्यूज, सोशल मीडियावरून होणारा अपप्रचार अशा असंख्य विषयांवर युनेस्को आपले म्हणणे मांडत असते. त्याला डिप्लोमसीत महत्त्वही आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत दौऱ्याचे नियोजन झाले. शिक्षण गुणवत्ता, सांस्कृतिक विकास व कृत्रिम बुद्धिमत्ता हेच ऑड्रे ऑझुलाय यांच्या भारतभेटीचे उद्दिष्ट होते. युनेस्कोचे प्रमुखपद स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिलीच भारतभेट.दिल्ली-जयपूरचा दौरा त्यांनी केला. दोन्ही शहरांनी उत्तम स्वागत केले. महासंचालकांची धोरणात्मक भेट झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्याशी. अजमेरच्या शाळेलाही त्यांनी भेट दिली. स्त्रीभू्रणहत्या करणाऱ्यांचा देश ही भारताची परदेशातील ओळख. ही पुसण्याचा प्रयत्न भारताने या दौऱ्यात केला. ऑड्रे ऑझुलाय यांना शाळा दाखवून. ‘मुलींना शिकवणे हा तिच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या उत्थानासाठी सर्वांत प्रभावी मार्ग आहे,’ ही ऑड्रे यांची प्रतिक्रिया त्यासाठीच महत्त्वाची ठरते.

यूएन एड्स, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र महासंघ, गेट्स फाउंडेशन, ग्रीन पीस... अशी असंख्य नावे आहेत जी कोणत्याही देशाचे अर्थकारण, राजकारण प्रभावित करू शकतात. थोडाबहुत हस्तक्षेप या संघटनांचा असतोच. युनेस्कोने तर भारतीय प्रसारमाध्यम प्रतिनिधींवर होणारे हल्ले, फेक न्यूजचा ऊहापोह अनेकदा केला. भारतात किती फेक न्यूज पसरवल्या जातात, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशी गदा आली वगैरे वगैरे- लेखांना युनेस्कोचे अनुमोदन असतेच. आता हे दुरुस्त करायला हवे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यासाठी अर्धा दिवस बैठक घेतली. सहा विषयांच्या तज्ज्ञ समित्यांचे सदस्य, मनुष्यबळ विकास मंत्री, राज्यमंत्री, सचिव उपस्थित होते. फेक न्यूज, सोशल मीडिया, भारताची प्रतिमा, सोशल सायन्सविषयी असलेली उदासीनता, नवतंत्रज्ञानासाठी प्रोत्साहन, परदेशात भारतीयांविषयी असललेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी युनेस्कोचे सहकार्य - अशा असंख्य मुद्द्यांवर चर्चा झाली.महासंचालकांनी मात्र भर दिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर. नव्या युगाची हीच परिभाषा आहे. चीन, अमेरिका, रशिया, जर्मनीच्या बरोबरीने एकही देश नाही. एक जीबी डेटा मिळाल्यावर सभोवतालचे सारे प्रश्न विसरणाऱ्या आशिया खंडात तर त्यावर बोलायला नको. ब्लॉक चेन, औद्योगिक क्रांती ४.०, आयटी क्षेत्रात बूम की वास्तव? जागतिक अर्थकारणात तंत्रज्ञानाचा वाढणारा दबदबा - हे सारे चिंतेचे मुद्दे. यापुढे ज्याच्याकडे ‘डेटा’ जास्त त्याच्याकडे जास्त लक्ष- नव्या तंत्राचे हेच समीकरण आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंडाची लोकसंख्या पाहता विकसित देशांसाठी हाच भूभाग मोठी बाजारपेठ ठरेल.जागतिक बाजारात विकला जाणारा, विशेषत: आशिया खंडातील परवलीचा शब्द दहशतवाद.दहशतवादाचा बीमोड करायचा तर आम्हीच शक्तिशाली हे वारंवार सांगावे लागेल. ही शक्ती वाढवावी लागेल. ट्रम्प यांनी भाषणात तेच केले. शस्त्रास्त्र व्यापारासाठी मोठी घोषणा केली. भारताच्या दोन उपद्रवी शेजाऱ्यांना त्यातून योग्य संदेश गेलाच. खरा प्रश्न उरतो तो आशिया खंडातील रोजगारनिर्मितीचा! ट्रम्प यांच्या भेटीचा अन्वयार्थ काढण्याची घाई नको.युनेस्को महासंचालकांची भेट संपवून पंधरा दिवस झालेत. त्यातून काय साधले - हे मात्र शोधता येईल. शिक्षण, संस्कृती व कृत्रिम बुद्धिमत्ता- असा त्रिवेणी संगम किमान कागदावर झाला. पण जागतिक अर्थकारणाचे भान देणारी शिक्षणपद्धती, संस्कृतीची पुनर्मांडणी व
कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान - यावर त्यांच्याही भेटीत चर्चा झालीच नाही. सॉफ्ट डिप्लोमसीत गमावलेली संधी- हेच त्यांच्या भेटीचे फलित!

Web Title: Director General of UNESCOs visit to india gets neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.