आपले पूर्वज आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान खरेच जाणत होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:08 IST2025-05-21T10:07:25+5:302025-05-21T10:08:09+5:30

विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली.  फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. 

Did our ancestors really know modern science and technology | आपले पूर्वज आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान खरेच जाणत होते?

आपले पूर्वज आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान खरेच जाणत होते?

विसावे शतक हे विज्ञानाचे शतक. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्त्वाचे मूलभूत सिद्धांत या शतकात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे निघाली.  विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पाहायला मिळत आहे. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवी जीवन अधिक प्रगत करायला कारणीभूत ठरली. विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली.  फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. 

  अशा पार्श्वभूमीवर आपल्याकडे विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात? विज्ञान  आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह असतो. वाचक किंवा श्रोतेदेखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत, असा ग्रह बाळगतात. आपल्या समाजात विज्ञानाचे पाय रोवलेले नाहीत, याची पदोपदी जाणीव होते.  खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांनादेखील कळत नाही, हे पाहून मन खिन्न होते.  ‘तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही, याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे,’ असा आरोप जेव्हा माझ्यासारख्या वैज्ञानिकावर केला जातो तेव्हा हसावे की रडावे, हे कळत नाही.  विज्ञानाची शाखा म्हणवून घेऊ इच्छिणाऱ्या विषयाला काही कसोट्यांवर उत्तीर्ण व्हावे लागते. त्या कसोट्या फलज्योतिषाला लावून पाहिल्यावर त्यात तो विषय अनुत्तीर्ण ठरतो.  हे अनेक प्रयोगांती अनेक वैज्ञानिकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.  असे असून भारताच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय मेळाव्यांत फलज्योतिषावर मंत्री लोक समर्थनपर भाषणे देतात, यावरून आपल्या समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे, याची जाणीव होते.

सर्वसामान्य माणसांची (अर्थात भारतातील) एक अशी गोड गैरसमजूत आहे की, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना माहीत होते आणि ते पुरातन वाङ्मयात समाविष्ट आहे. या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे? आपला पुरातन समाज वैज्ञानिकदृष्ट्या अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब पुरातन साहित्यात सापडले पाहिजे. पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे आदींची उदाहरणे पुराणात सापडतात. परंतु ती गोष्टीरूपाने आहेत, ज्याला आपण गणितीय विज्ञान वाङ्मय म्हणतो त्या स्वरूपात नाहीत.

हा फरक एका आधुनिक उदाहरणाने स्पष्ट करतो.  अपोलो ११ या अंतराळ स्वारीत मानवाने चंद्रावर जाऊन दाखविले.  या स्वारीचे सविस्तर वर्णन अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. चंद्रावरच्या स्वारीची अशीच हकीकत जूल्स व्हर्नच्या लिखाणात सापडते.  समजा, इतर कुठलीही माहिती उपलब्ध नसेल तर या दोन स्वाऱ्यांपैकी वास्तविक कुठली आणि काल्पनिक कुठली ते सांगता येणार नाही.  परंतु जर अधिक खोलात शिरलो तर? - अंतराळ तंत्रज्ञानाला वाहिलेले विज्ञान आणि गणिताच्या भाषेत लिहिलेले अनेक प्रबंध, अहवाल आणि अभिलेख सापडतील ज्यावरून अपोलो ११चे यान कसे तयार केले वगैरे सर्व तांत्रिक माहिती मिळेल. या दुसऱ्या प्रकारच्या माहितीवरून कुठल्याही तंत्रसमृद्ध संस्कृतीला तशी अंतराळ यात्रा आखता येईल.  पुराणांतील वर्णने पहिल्या प्रकारची आहेत, दुसऱ्या प्रकारची नाहीत.  पुष्पक विमान तयार करायची नियमपुस्तिका (मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही.  वायव्यास्त्र, अग्नेयास्त्र वगैरे कसे बनवले जाते, याची कृती महाभारतात सापडत नाही. पौराणिक वाङ्मयातून  इतकेच निदान करता येते की, ते लिहिणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचाट होती. परंतु त्यापलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. हा पुरावा का उपलब्ध नाही? याचे कारण असे सांगण्यात येते की, आपल्या पूर्वजांनी ती माहिती सांकेतिक भाषेत लिहून ठेवली किंवा ती माहिती नष्ट झाली. अशी विधाने तपासून पाहता येत नसल्याने त्यांना काही महत्त्व राहत नाही. तो केवळ ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न उरतो.  

(नाशिक येथे झालेल्या ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. नारळीकर यांनी केलेल्या भाषणातील संपादित अंश)

Web Title: Did our ancestors really know modern science and technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.