शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 07:01 IST

परप्रांतीयांची थोबाडे रंगवण्याचे ‘सांस्कृतिक कार्य’ महाराष्ट्रात जोरावर असताना अमेरिकेत ‘स्थलांतरित’ ममदानींच्या ‘हाताने जेवण्या’वरून चर्चा उसळली आहे.

अपर्णा वेलणकर, कार्यकारी संपादकलोकमत

आठवडाभरापूर्वीची गोष्ट. न्यू यॉर्क महापौरपदाच्या प्रायमरीत बरीच मजल मारल्याने सध्या चर्चेत असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे तरुण उमेदवार झोहरान ममदानी हे एका बागेतल्या बाकावर बसून गप्पा मारता मारता काटे-चमचे वगैरे सरंजाम न वापरता हाताने बिर्याणी खात असल्याचा एक व्हिडीओ प्रसारित झाला. ती क्लिप आपल्या ट्वीटला चिकटवून टेक्सासचे रिपब्लिकन काँग्रेसमन ब्रॅन्डन गिल यांनी लिहिले, ‘अमेरिकेतले सुसंस्कृत लोक हे अशा रीतीने खात नाहीत. तुम्हाला आमची पश्चिमी संस्कृती स्वीकारायची नसेल, तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड.’ 

ममदानी यावर शांत राहिले; पण गिल यांच्या या तिरकस टोमण्याने अमेरिकेत चर्चा उसळली. हाताची बोटे वापरून जेवण्याची हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आशियाई -आफ्रिकन वंशाचे लोक चिडले. ‘आमच्या भाषेत बोलता येत नाही’ म्हणून परप्रांतातून आलेल्यांची थोबाडे रंगविण्याचे ‘सांस्कृतिक कार्य’ महाराष्ट्रात जोरावर असताना दहा हजार मैलांवरच्या अमेरिकेत एका ‘स्थलांतरित’ तरुण नेत्याला ‘आमच्यासारखे जेवता येत नसेल तर तू (तुझ्या त्या मागास) थर्ड वर्ल्डमध्ये परत जा’ असे सांगितले जाणे यात एक विचित्र साम्य आहे... आणि हेही खरे, की ‘बाहेरून’ आलेले स्थलांतरित राजकीय / सामाजिक / आर्थिकदृष्ट्या सबळ होत गेले की त्यांना त्यांच्या संस्कृतीसह  सामावून घेण्यावरून प्रसंगोपात राजकीय वाद उकरून काढले गेले, तरी कालौघात घट्ट होत गेलेला समाजातल्या मिश्रसंस्कृतीचा धागा ‘राजकारणा’ला पुरून उरेल इतका चिवट ठरतो.

झोहरान ममदानी हे जन्माने मुसलमान. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर ही त्यांची आई आणि आफ्रिकामार्गे अमेरिकेत आलेले वडील भारतीय वंशाचे मुसलमान. स्थलांतरविरोधी, इस्लामद्वेषी, कडव्या उजव्या संकुचित राजकारणाचा जोर असताना, सगळ्या ‘बाहेरच्यां’ना हाकलून देऊन ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा आग्रह धरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून हा फक्त ३३ वर्षांचा तरुण अमेरिकेच्या सद्य राजकारणाची दिशा बदलून पुन्हा तिच्या मूळ स्वभावाकडे नेऊ पाहतो आहे. समाजवादी, सहिष्णू आणि उदारमतवादी भूमिका मांडणाऱ्या ममदानी यांच्या सभांना तरुण अमेरिकन्स प्रचंड गर्दी करीत आहेत.

‘धनाढ्यांवर कर लावून बेघरांसाठी निवारे बांधण्याची वचने देणाऱ्या या (मूर्ख) माणसाकडे जगातल्या सर्वात श्रीमंत शहराचे नेतृत्व आले तर न्यू यॉर्कची नाचक्की होईल’ इतका विषारी प्रचार करणाऱ्या रिपब्लिकन राजकारणाला ममदानी आजवर पुरून उरले आहेत. न्यू यॉर्कच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठीच्या प्रायमरीजमध्ये त्यांची आगेकूच जोराने चालू असताना हा ‘हाताने खाणे असंस्कृत असल्या’चा टोमणा आला आणि उलटेच झाले.

अमेरिकाभरचे स्थलांतरित समूह तर ब्रॅन्डन गिल यांच्यावर चिडलेच पण ‘कुणी कसे जेवावे यावर तिसऱ्या कुणी टिपण्णी करणे’ हेच मुळात असंस्कृत आहे, असा सूर (विचारी) रिपब्लिकन गोटातही उमटला. खुद्द ब्रॅन्डन यांची पत्नी डॅनियेला भारतीय वंशाची. ‘माझे कुटुंब भारतातून आले असले तरी मी कधीच हाताने करी-राइस खाल्लेला नाही. मी कायम फोर्कच वापरते’ अशा फणकाऱ्याने या पतिपरायण डॅनियेलाबाई नवऱ्याच्या मदतीला धावल्या. तर लोकांनी तिच्या वडिलांसह हाताने जेवणाऱ्या ब्रॅन्डन गिल कुटुंबाचे फोटो शोधून शोधून सोशल मीडियावर टाकले. ‘हाताने खाणे असंस्कृत म्हणता, तर अमेरिकन लोक पिझ्झा-बर्गर आणि वेफर्स काय काट्या-चमच्याने खातात की काय?’ असे प्रश्न विचारले गेले. ‘पहिला घास घेण्यापूर्वी आपल्या बोटांनी अन्नाला स्पर्श करणे ही आध्यात्मिक अनुभूती असून, त्यामुळे मेंदूमध्ये अन्नग्रहणासाठी आवश्यक ती द्रव्ये   पाझरतात. हाताने जेवणे हीच खरी आरोग्यपूरक पद्धत आहे’ असे पौर्वात्य संस्कृतीचे दाखले दिले गेले. 

या सगळ्या गदारोळावर खुद्द ममदानी (अद्याप) काही बोललेले नसले तरी अनाहूतपणे त्यांच्याकडून झालेल्या एका कृतीने स्थलांतरित समूहांच्या ‘आयडेंटिटी पॉलिटिक्स’मधला एक मोठा डाव मात्र ते जिंकले आहेत. ज्ञान, कौशल्ये, कुवत, बंडखोरी या सगळ्यांच्या स्वागतासाठी दारे उघडणाऱ्या आधुनिक अमेरिकेने सर्वच आघाड्यांवर मोठी मजल मारली, त्यात मोठा वाटा अर्थातच स्थलांतरितांच्या समूहांचा. हे सारे भिरकावून देऊन ‘एक देश-एक भाषा-एक वंश-एक वर्ण’ असले भलते काही अमेरिका नावाच्या भांड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी शिजवायला घेतले, तेव्हा स्थितीवादी, रुढीप्रिय स्थानिक सुखावले होते हे खरे; पण आता अमेरिकेतले वारे बदलताना दिसते.

गेली अनेक दशके अमेरिकेच्या प्रगतीला हातभार लावून स्वत:ची पाळेमुळे बळकट केलेले अन्य/मिश्रवंशीय स्थलांतरितांचे गट राजकारण आणि समाजकारणात पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. ममदानी हे त्या ठाम विरोधाचा तरुण चेहरा. ‘आम्ही आहोत ते हे असे आहोत आणि अन्य कुणाचे नियम/ संकेत/सक्ती मानून ते लपविण्याची गरज आम्हाला वाटत नाही’ असे सांगण्याचा आत्मविश्वास ‘आत’ आलेल्या ‘बाहेरच्यां’मध्ये येणे; हा फार नाजूक तसेच स्फोटक टप्पा! हे स्फोटक रसायन जिरवण्यासाठी स्थानिकांच्या संस्कृतीमध्ये समंजस संयम लागतो. ‘एकरूप’ होणे म्हणजे ‘आधीचे सारे पुसून टाकणे’ नव्हे; हा स्थलांतरितांच्या ‘आयडेंटिटी पॉलिटिक्स’चा गाभा! झोहरान ममदानी यांनी नकळत त्या गाभ्यालाच हात घातला आहे. भरकटलेल्या अमेरिकेला ‘सहिष्णू’ वाटेवर पुन्हा ओढून आणणे सोपे नव्हे; पण ‘त्यासाठी मी निदान प्रयत्न करीन’ असे म्हणणारे तरुण नेतृत्व अमेरिकेत घडते आहे. ... महाराष्ट्रानेही आशा ठेवायला हरकत नाही!      aparna.velankar@lokmat.com